३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१

अनिता केळकर
रविवार, 31 जानेवारी 2021

३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१

मेष
तुमची कामाची जिद्द दांडगी राहील. व्यवसायात कामात अडथळे आल्याने काही बदल करावा लागेल. सरकारी नियम व इतर प्रश्नांकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागेल. दैनंदिन कामे हातावेगळी कराल. नोकरीत आपला मतलब साध्य करण्यासाठी सहकाऱ्यांची खुशामत करावी लागेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडतील. पैशाची चिंता मिटेल. घरात व संसारिक जीवनात वादविवाद टाळा. अतिविचार करू नका.

वृषभ 
फार मोठी उडी न घेता जमिनीवर पाय रोवून उभे राहा. व्यवसायात एक प्रकारचा तणाव जाणवेल. पण कामात हितचिंतकांची मदत मिळाल्याने कामे पूर्ण होतील. नको त्या कामात बराच वेळ जाईल. तुमच्या निर्णयात गल्लत होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

मिथुन
घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन मार्ग अवलंबावा लागेल. त्यासाठी जादा भांडवलाची गरज भासेल. पूर्वी केलेल्या कामाचे फायदे आता मिळतील. कर्जे घेऊन कामे कराल. नोकरीत योग्य पद्धतीने काम हाताळलेत तर कामाचा दर्जा उत्तम राहील. तरुणांचा हट्टी हेकेखोर स्वभाव उफाळून येईल.

कर्क
तुमचा स्वभाव भावनाप्रधान आहे. त्यामुळे मानसिकता जपा. या आठवड्यात सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष ठेवावे लागेल. कोणतीही कृती घाईने करून चालणार नाही. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या फसव्या गोड बोलण्यापासून सावध राहावे. ‘आपले काम बरे की आपण बरे,’ हे धोरण चांगले. घरात कामात वेळ जाईल.

सिंह
मंगळ, शुक्र यासारखे सकारात्मक विचार देणारे ग्रह अनुकूल असल्याने मनाप्रमाणे गोष्टी घडतील. व्यवसायात अडथळे, अडचणींवर मात करता आल्याने हायसे वाटेल. केलेल्या प्रयत्नांचे चीज होईल. खेळते भांडवल वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. नवीन कामे मिळतील, त्यामुळे चार पैसे हातात राहतील. सुखशांती लाभेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सुसंवाद साधता आल्याने मतभेद दूर करता येतील.

कन्या
प्रकाशाचा किरण दिसल्याने तुमचा आशावाद जागृत होईल. तुम्ही कामात सजग व्हाल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत परदेशगमन व परदेशव्यवहारातील कामांना चालना मिळेल. कंटाळवाण्या कामातून सुटका झाल्याने हायसे वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल.

तूळ
‘कळतं पण वळत नाही’, अशी तुमची स्थिती झाली असेल, तेव्हा ज्येष्ठांचा सल्ला घ्या. व्यवहारात मधेच निराशेचे झटके येतील. तसेच कामातील अडचणींमुळे वैतागाल. परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. अपेक्षित पैसे मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुम्हाला योग्य वाटेल त्याच पद्धतीने कामे करा. इतरांच्या कामात लक्ष न घालणे चांगले. कामातील बेत गुप्त ठेवा.

वृश्‍चिक
रवी, शनी तुमची महत्त्वाकांक्षा जागृत करतील, तेव्हा धैर्याने वाटचाल करा. व्यवसायात हातात पैसे आल्याने कामाचा उत्साह वाढेल. काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द निर्माण होईल. तुमच्या वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत कामाचे स्वातंत्र्य मिळाल्याने खूष असाल. मोठ्या कामासाठी तुमची निवड होईल. तुमची पत वाढेल. घरात इतर व्यक्ती तुमच्या विचारांचा आदर करतील. महिलांना मानसिक समाधान लाभेल.

धनू
एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल कराल. व्यवसायात नियमांचे पालन करून कामाची उलाढाल वाढवाल. प्रगतीचा आलेख चढता राहील. मात्र हे करताना प्रमाणाबाहेर जाऊन धावपळ दगदग करू नका. नोकरीत कार्यपद्धतीत बदल करून कामे वेळेत पूर्ण कराल. सहकारी कामात मदत करतील. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. घरात मोठ्या व्यक्तींच्या सूचनांचे पालन करावे लागेल.

मकर
ग्रहांची अनुकूलता तुम्हाला कार्यरत ठेवेल. व्यवसायात पूर्वी ज्या व्यक्तींनी विरोध केला होता त्यांच्याकडून सामंजस्याची भाषा ऐकू येईल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तेव्हा तुम्ही तुमचा दृष्टिकोन सावध ठेवा. कामात निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या. पैसे मिळाल्याने कामाचा आनंद मिळेल. नोकरीत बदली किंवा बदल पाहिजे असल्यास वरिष्ठांकडे शब्द टाका.

कुंभ
काळाबरोबर राहून प्रगती कराल, हेच खरे. व्यवसायात प्रगती साधण्यासाठी धोरणात बदल करावे लागतील. उलाढाल व विक्री वाढली तरी त्यातील फायदा कमी असेल. नवीन योजना कार्यान्वित करण्याचा मानस राहील. खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत प्रयत्न करूनही कामे न मिळाल्याने चिंता वाटेल. पैशाचे गणित बसवणे अवघड जाईल.

मीन
सभोवतालच्या माणसांचे नवीन अनुभव येतील. त्यामुळे कोड्यात पडल्यासारखे होईल. व्यवसायात भरपूर कामे करून भरपूर पैसे मिळवता येतील. कामगारांना युक्तीने सांभाळावे लागेल. नोकरीत अहोरात्र मेहनत कराल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत कामात मिळेल. घरात पैशाची क्षमता ओळखून इतर व्यक्तींना आश्वासन द्या. तरुणांनी संयम राखून वागावे. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या