ग्रहमान : १३ ते १९ मार्च २०२१

अनिता केळकर
सोमवार, 15 मार्च 2021

ग्रहमान : १३ ते १९ मार्च २०२१

मेष
मानसिक स्वास्थ जपलेत तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन केलेत तर यशाचे प्रमाण वाढेल. नवीन कार्यपद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल व फायदा वाढवण्याचा विचार करा. नोकरीत सहकाऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता कामे केलीत तर समाधान मिळेल. स्वतःची क्षमता ओळखून दगदग धावपळ करा. कामानिमित्ताने प्रवासयोग. घरात कामाची नवीन जबाबदारी पडेल.

वृषभ
नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात अनपेक्षितपणे चांगल्या घटना घडतील. पैशाची वसुली होईल. नवीन कामे मिळतील. मात्र दगदग, धावपळही वाढेल. नोकरीत आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा होईल. घरात शुभकार्ये ठरतील. कामाचा तणाव कमी झाल्याने मनोकामना सफल होईल. आरोग्याची चिंता मिटेल.

मिथुन
केलेल्या श्रमाचे चीज होईल. व्यवसायात जमा खर्च समसमान होईल, तरीही समाधान मिळेल. नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील परंतु सही करण्याची तूर्तास घाई नको. कार्यमग्न राहून घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळाल. नोकरीत आर्थिक आवक वाढेल. वरिष्ठांची मर्जी राहील. कामासाठी जादा सवलती व अधिकार मिळतील. वेगळया कामासाठी निवड होईल.

कर्क 
मनावर संयम ठेवून वागा, यश हमखास मिळेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी परिश्रम पडतील. महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. त्यामुळे पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल करून उरक पाडाल. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. कामातील बेत गुप्त राखा. घरात अनावश्यक खर्चाला फाटा द्या. कामाची योग्य आखणी करून वेळ व पैसा वाचवा.

सिंह
शनीचे वास्तव्य सजगता वाढवणारे आहे. त्यामुळे हळूहळू प्रगती होईल. व्यवसायात दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यास योग्य कालावधी आहे. अडचणी, अडथळ्यांवर मात करून यश मिळवण्याचा विशेष प्रयत्न राहील. नोकरीत, कामात सहकारी मदत करतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात शुभकार्ये ठरतील. वातावरण आनंदी राहील.

कन्या
कमी श्रमात जास्त यश मिळेल. व्यवसायात निर्णय अचूक ठरतील. चांगली घटना घडेल. महत्त्वाकांक्षा वाढेल. फायद्याचे प्रमाण वाढल्याने पैशाची ऊब मिळेल. नोकरीत पूर्वी काही कारणाने हुकलेली संधी पुन्हा मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची भिस्त तुमच्यावर राहील. घरात नवीन खरेदी कराल. वातावरण प्रसन्न राहील. आशावाद जागृत होईल त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.

तूळ
प्रगतीला पूरक ग्रहमान लाभल्याने कामाचा आलेख चढता राहील. आर्थिक स्थितीही समाधानकारक असेल. व्यवहारात पुढाकार घेऊन कामे मार्गी लावा. योग्य व्यक्तींची मिळालेली साथ उपयोगी पडेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत पूर्वी गमावलेल्या संधीचा लाभ घेता येईल. प्रवासयोग, बदली किंवा कामात बदल होण्याची शक्यता. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. घरात सुवार्ता कळेल.

वृश्‍चिक
क्षमता ओळखून पुढे जा. व्यवसायात कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याचा पडताळा घ्या. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. बोलण्यामुळे इतरांची मने दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्या. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मतलबासाठी खुशामत करतील तरी सावधगिरी बाळगा. कामात गुप्तता राखा. मनाविरुद्ध काम करावे लागले तरी वाच्यता करू नका. घरात खर्च वाढतील. 

धनू
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ ही म्हण तुमच्या बाबतीत सार्थ ठरेल. जसा विचार कराल तशीच फळे मिळतील. व्यवसायात कामांना वेग येईल. मनाप्रमाणे कामे होतील. पैशाची तजवीजही होईल. ईप्सित साध्य करू शकाल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्या. वरिष्ठांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने कामाला हुरूप येईल. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. घरात ताणतणाव कमी होईल. सलोख्याचे वातावरण राहील.

मकर
अत्यंत धोरणीपणे वागून कामाची आखणी करावी लागेल. स्वयंसिद्ध राहून कामे वेळेत हातावेगळी करावी लागतील. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून पुढे जावे लागेल. पैशाचा अपव्यय होत नाही याची काळजी घ्या. नवी दिशा तुमचे जीवन बदलून टाकेल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता शहानिशा करून मगच मते ठरवा. घरात योग्य वाटेल तेच कराल.

कुंभ 
संमिश्र फळ देणारे ग्रहमान. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चाकोरीबाहेरचा मार्ग स्वीकारावा लागेल. मात्र चुकीची संगत धरू नका. पैशाचा मोह टाळा. आजचे काम आजच करा म्हणजे वेळेत कामे पूर्ण होतील. नोकरीत कामात आवश्यक तेथे मदत घ्या. हितचिंतकांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. घरात प्रकृतीच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे लागेल.

मीन
आशावादी राहाल. व्यवसायात कामाचा हुरूप वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवाल. पैशाची आवक समाधान देणारी असेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वेगळ्या कामामुळे तुमच्या दैनंदिनीवर परिणाम होईल. बदलत्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. हटवादी स्वभावावर नियंत्रण ठेवून सामंजस्याने वागावे लागेल. घरात जुने प्रश्न पुन्हा डोके वर काढतील. तडजोडीने प्रश्‍नांची उकल करा.
 

संबंधित बातम्या