ग्रहमान : ३ ते ९ एप्रिल २०२१

अनिता केळकर
सोमवार, 5 एप्रिल 2021

ग्रहमान : ३ ते ९ एप्रिल २०२१

मेष 
 स्वभाव थोडा मूडी राहील त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. कृतीवर भर देऊन कामे वेळेत संपवा. तुमच्या उत्साही स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान लाभेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत सर्वजण कामाचे कौतुक करतील. स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. चांगल्या कामाचा मोबदला मिळेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. तरीही सर्वांना समाधानी ठेवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. सणानिमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. 

वृषभ 
 तुमच्या इच्छाआकांक्षा सफल होतील. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. उलाढाल वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत अनपेक्षित लाभ मिळेल. प्रवासाचे योग येतील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. पैशाची तजवीज होईल. घरात मोठी खरेदी होईल. सुवार्ता कळेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. प्रकृतीचे तंत्र तेवढे सांभाळा. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील.

मिथुन 
 ग्रहमान व वातावरणाची साथ राहील. कामाचा उत्साह वाढेल. कार्यपद्धतीत बदल करून व्यवसायाचा विस्तार कराल. फायद्याचे प्रमाण वाढेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. ईप्सित साध्य होईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सहकारी व वरिष्ठांना तुमचे म्हणणे कसे बरोबर आहे हे पटवू शकाल. घरात प्रियजनांच्या सहवासाने आनंद मिळेल.

कर्क 
 जसा चष्मा घालाल तसे दिसेल, तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात, कामात स्वयंसिद्ध रहा. वेळेचे व कामाचे गणित बसवून कामे संपवा. धावपळ दगदग जरी वाढली तरी आर्थिक लाभही वाढणार आहेत. नोकरीत उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रगती राहील. कष्टाशिवाय काहीही सहजसाध्य नाही हे लक्षात येईल. सभोवतालच्या व्यक्तींकडून अपेक्षा न ठेवता कामे संपवा. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील.

सिंह 
 तुम्हाला जे पटेल रुचेल तेच कराल. त्यामुळे थोडा विरोधही पत्करावा लागेल. व्यवसायात हटवादी स्वभावामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. नवीन कामे दृष्‍टिक्षेपात येतील. कामात प्रगती होण्यासाठी वेगळे प्रयत्न कराल. नोकरीत तुम्ही जे काम कराल त्यातून तुमची वेगळी प्रतिमा निर्माण होईल. सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. कामानिमित्ताने प्रवास योग. घरात नवीन वाहन, जागा खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. वृद्धांना आप्तेष्टांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल.

कन्या 
 पैशाशिवाय सर्व व्यर्थ हे लक्षात येईल. व्यवसायात जेवढे काम जास्त कराल तेवढा तुमचाच लाभ होईल. जुनी येणी वसूल करण्यावर लक्ष केंद्रित केलेत तर पैशाची ऊब मिळेल. मात्र पैशाच्या मोहापायी चुकीच्या व्यक्तींशी संगत टाळा. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा वापर योग्य कारणासाठीच करा. अतिविश्‍वास ठेवू नका. वरिष्ठ कामाची जबाबदारी सोपवतील. घरात बजेटपेक्षा खर्च जास्त होईल पण तरीही समाधान वाटेल. मुलांच्या हौसेमौजेसाठी वेळ द्याल. सुवार्ता कळेल. 

तूळ 
 अनुकूल ग्रहमान राहील. व्यवसायात कामाचा झपाटा राहील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. कधी शक्ती तर कधी युक्तीने उलाढाल व विक्री वाढवाल. नवीन कामे मिळतील. नोकरीत नवीन दिशा मिळेल. तुमची प्रतिष्ठा व मानमरातब वाढवणारे काम हातून घडेल. मानसिक समाधान मिळेल. घरात मोठी खरेदी होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 

वृश्चिक 
 मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात कामाचा व्याप व विस्तार वाढेल त्यामुळे खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. काही टाळता न येणारे खर्च करावे लागतील. भविष्यात त्यातून फायदाच होईल. नोकरीत ध्येय धोरणे ठरवून वाटचाल कराल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याकडे कल राहील. घरात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील.

धनू 
 मानले तर समाधान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन जीवनाला कलाटणी देण्यास उपयोगी पडेल. व्यवसायात वेळ व काळाचे बंधन पाळून चांगले काम करण्याचा मानस असेल. पैशाची चिंता मिटेल. त्यामुळे मोठी उडीही घेता येईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल. कामासाठी जादा सुविधा मिळतील. पैशाची स्थिती सुधारल्याने नवीन खरेदी व प्रवास यांचा आनंद घेता येईल. घरात सर्वांच्या आवडीनिवडी जपाल. घरातील व्यक्तींसमवेत छोटासा कार्यक्रम कराल.

मकर 
 'रात्र थोडी सोंगे फार' अशी तुमची अवस्था असेल. व्यवसायात काही उत्साहवर्धक घटना घडतील. कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल व फायदा वाढवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. नवीन योजना कार्यान्वित करण्याचा मानस राहील. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठ दखल घेतील. नवीन संधीसाठी तुमची निवड करतील. विचारापेक्षा कृतीवर भर ठेवलात तर कामाचा उरक पडेल. घरात प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न राहील.

कुंभ 
 प्रकृतीची तक्रार कमी झाल्याने तुम्ही मोठया उमेदीने व उत्साहाने कामाला लागाल. काम करताना जीवनाचा आस्वादही घ्याल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठोस पावले उचलाल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील ती मिळवण्यासाठी हितचिंतकांची मदत घ्या. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळून तुम्हाला हव्या त्या सुविधा व मागण्या मान्य करून घ्या. अपेक्षित कामे प्रगतिपथावर राहतील.

मीन 
फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन व्यवसायात यशस्वी वाटचाल कराल. अडीअडचणींवर मात करून यश मिळेल. बाजारातील चढउतारांकडे मात्र लक्ष ठेवावे लागेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत केलेल्या कामाचे श्रेय लगेच मिळणार नाही. गैरसमजुतीने होणारे वादविवाद टाळलेत तर सणांचा आनंद मिळेल. घरात स्वतःची हौस पुरवून घ्याल. तात्त्विक मतभेद झाले तरी दुर्लक्ष करा. तरुणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल.
 

संबंधित बातम्या