ग्रहमान - १६ ते २२ मे

अनिता केळकर
सोमवार, 17 मे 2021

ग्रहमान - १६ ते २२ मे

मेष
या सप्ताहात नेहमीच्या मार्गाचा अवलंब न करता थोडासा वेगळा मार्ग अवलंबून पहाल. व्यवसायात, कामात अनपेक्षित कलाटणी मिळाल्याने थोडा ताण जाणवेल. काही महत्त्वाचे निर्णय घेणे भाग पडेल. नोकरीत आवश्यकतेनुसार कामात बदल कराल. कामात कार्यतत्पर राहाल. घरात महिलांनी हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे. तुमचे विचार इतरांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नये. आध्यात्मिक प्रगतीस उत्तम काळ आहे.

वृषभ
चाकोरीबाहेर जाऊन काही नवीन करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कामात इतर व्यक्तींकडून अपेक्षा ठेवणे अपेक्षाभंग करणारे ठरेल. व्यवसायात, कामात आवश्यकतेनुसार फेरफार कराल. बदलत्या वातावरणानुसार तुमची ध्येयधोरणे ठरवाल. नोकरीत वरिष्ठ कामाचा बोजा वाढवतील. कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होईलच असे नाही तरी झेपेल तेवढेच काम करा.

मिथुन
या सप्ताहात रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यात तुमचा बराच वेळ व पैसे खर्च होतील. धंदा, व्यवसाय, कामात सप्ताहाअखेर मनाप्रमाणे गती येईल. आर्थिक व्यवहारात मात्र काटेकोर रहा. नोकरीत स्वतःच्या कामाकडे जास्तच लक्ष द्या. त्यामुळे तुम्ही तुमचे काम व्यवस्थित पार पाडू शकाल व कमी श्रमात जास्त यश मिळवाल.

कर्क
महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी तुमच्यावर नाही; त्यामुळे ज्या कामांची पूर्तता करायला जाता त्याच कामांना विलंब होतो. तरी तूर्तास शांत रहा. धंदा व्यवसायात पैशाची चणचण भासेल. परंतु हितचिंतकांची मदत होईल. जुनी येणी वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. मनाविरुद्ध काम करावे लागले तरी रागावू नका. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा. तरुणांनी साहस धाडस करू नये.

सिंह
घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल, त्यामुळे तुमची तारांबळ होईल. धंदा, व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्या. रेंगाळलेल्या कामांना प्राधान्य  देऊन ती संपवण्याचा चंग बांधा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात फळ मिळेल. नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. नवीन प्रशिक्षण व कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील.

कन्या
‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.’ ही म्हण या सप्ताहात लागू पडेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नवीन करार मदार करण्यास अनुकूल वातावरण राहील. कामांना वेग येईल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांना योग्य कालावधी आहे. घरात वातावरण आनंदाचे राहील. 

तूळ
कामाबरोबर जीवनाचा आनंदही उपभोगण्याचा मोह तुम्हाला होईल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. व्यवसायात कामाचा उरक पाडाल. कामाच्या पद्धतीत बदल करून व आधुनिकीकरण करून उलाढाल वाढवाल. खर्चाचे प्रमाणही वाढेल परंतु खर्च करताना व्यवहारी दृष्टिकोन सांभाळा. भावनेच्या भरात खर्च वाढवू नका. परदेशगमनाची संधी चालून येईल.

वृश्‍चिक
ग्रहांची साथ लाभल्याने पैशामुळे थांबलेल्या कामांना आता वेग येईल. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुमच्यातील आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळवू शकाल. जागा बदल, नवीन वास्तू खरेदीचे बेत मनात येतील परंतु थोडा धीर धरा. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे नवीन प्रशिक्षण घ्यावे लागेल. वरिष्ठांची मर्जी राहील. जोडधंद्यातून फायदा होईल.

धनू
कामात आलेली मरगळ दूर करून नवीन उत्साहाने कामाला लागाल. नवीन आशावाद जागृत होईल. परिस्थितीशी समझोता करून कामांना दिशा द्याल. व्यवसायात, कामात तुमचा दृष्टिकोन सावध राहील. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता कामे हाती घ्याल. नोकरीत कामात सजग राहाल. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हितावह राहील. चालू नोकरीत चांगली घटना घडेल. घरात आनंदाची वार्ता कळेल.

मकर
सतत पुढचा विचार करता भविष्याची तरतूद करून मगच खर्च केल्यास त्याचा लाभ होईल. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला प्रेरित करतील. एखादे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कृती कराल. स्वप्न व सत्य यांचा ताळमेळ घालावा लागेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्याल. कामाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्यात बदल कराल.

कुंभ
तत्त्वांना मुरड घालून कामात लवचिकता आणलीत तर बरेच काही मिळवू शकाल. कामात बाजी माराल. व्यवसायात तुमच्या प्रगतीचा वेग वाखाणण्याजोगा असेल. बाजारातील चढउतारांचा अभ्यास नीट असेल तर सतर्क राहून फायदा उठवता येईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामापुढे सर्व फिके वाटेल. कामाचा आनंद मिळेल. घरात दिलेला शब्द पाळून इतरांना खूश कराल.

मीन
कामात नवीन बदल करून उलाढाल प्रगती व नवीन काहीतरी करण्याची तुमची मनीषा सफल होईल. व्यवसायात प्रगती उंचावण्याचा चंग बांधाल. त्यासाठी पडेल ते श्रम घेण्याची तुमची तयारी असेल. खेळत्या भांडवलाची तरतूदही होईल. नोकरीत वरिष्ठ नवीन संधीसाठी तुमची निवड करतील. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. जोडधंद्यातून लाभ होईल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांची गाठभेट होईल.

संबंधित बातम्या