ग्रहमान - २३ ते २९ मे 2021

अनिता केळकर
सोमवार, 24 मे 2021

ग्रहमान - २३ ते २९ मे 2021

मेष
कामामध्ये जरी अडचणी आल्या तरी त्यावर मात केल्याशिवाय यश मिळणार नाही. हातामध्ये मिळणाऱ्या पैशाचे गणित मागे पुढे झाल्यामुळे काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंदा व्यवसायात नियोजनबद्ध काम करा. प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवा. नोकरीमध्ये आपले काम पडताळून पाहून मगच ते वरिष्ठांपुढे ठेवावे. भावनेच्या भरात तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करू नका. घरामध्ये स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य द्याल.

वृषभ
तुम्हाला हवी तशी गती कोणत्याच कामात येत नसल्याने तुम्ही सध्या मनावर संयम ठेवणे गरजेचे आहे. ग्रहाची अनुकूलता लाभल्यावर आशेचा किरण दिसेल. धंदा, व्यवसायात कामांना चालना देण्यासाठी निश्‍चित निर्णय घेऊन कामाला लागाल. जादा पैशाची तरतूद करून ठेवा. नोकरीत वेगळे काम करण्याची इच्छा साकार होइल. पण तुमच्या कामात सावधगिरी व गुप्तता पाळा.

मिथुन
महत्त्वाचे ग्रह मनावर फुंकर घालणारे आहेत. ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण झाला होता तो आता कमी होईल. जीवनामध्ये वेगळेपण अनुभवण्याची इच्छा निर्माण होईल. धंद्यात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कर्ज मंजूर होण्यासाठी लक्ष ठेवा. नोकरीत वरिष्ठांपुढे जाताना त्यांच्या मूडचा विचार करा. घरात शुभसमारंभ पार पडतील. सुवार्ता कळेल.

कर्क
. सध्या थोडा तणाव कमी झाल्याने स्वास्थ्य अनुभवावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राकडे लक्ष देऊ शकाल. धंदा, व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींच्या भेटीगाठींनी कामे मार्गी लावा. नोकरीमध्ये सहकारी मित्रांचे बोलणे, वागणे, खिलाडूपणाने घ्या. त्याचा वेगळा अर्थ काढू नका. घरात किरकोळ कारणाने खटके उडाले तरी ते निवळतील. परदेश प्रवासाचे बेत ठरतील. सामूहिक कामात मानसन्मान मिळतील.

सिंह
या सप्ताहात तुमच्यातील सुप्त कलागुणांना दिशा मिळाल्याने तुम्ही उल्हसित व्हाल. त्यात इतरांनीही सामील करून घ्याल. धंदा, व्यवसायात भांडवलाची गरज असेल तर ती भागू शकेल. उत्पन्न वाढवण्यासाठी जोडधंद्याचा विचार मनात डोकावेल. नोकरीत जादा सुविधा मिळतील. परदेशगमनाचा विचार असेल तर तो मानस पुरा होईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. नवीन जागा खरेदीचे बेत पार पडतील. 

कन्या
ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल. एकेक गोष्ट मनासारखी घडत जाऊन तुमचा आनंद द्विगुणित होईल. धंद्यात मात्र पैशाच्या लोभाने चुकीचा निर्णय घेऊ नका. जुनी येणी वसुलीला प्राधान्य द्या. नोकरीत वातावरणामध्ये सुधारणा होईल. कामातील बदल तुम्हाला ताजेतवाने करेल. घरात एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा प्रसंग साजरा होईल. 

तूळ
तुमच्या मुत्सद्दीपणाला वाव मिळेल. तुमच्या प्रश्‍नांवर मार्ग निघेल. रोजची कामे नेहमीसारखी झाल्याने तुमच्यामध्ये कामाचा नवा उत्साह सळसळेल. व्यवसायात वेळ मारून नेण्यासाठी पैशाची तरतूद करून ठेवावी. कामाकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करा म्हणजे नवीन कामे मिळतील. नोकरीत वेळेत कामे उकरण्यासाठी शॉर्टकट शोधून काढाल.

वृश्‍चिक
या सप्ताहात पैशाची चिंता कमी झाल्याने थोडेसे स्वस्थ व शांत व्हाल. धंदा, व्यवसायात प्रगती समाधानकारक राहील. कामातील दर्जा व गुणवत्ता वाढवण्यासाठी  नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार कराल. नोकरीत पगार वाढीसाठी प्रयत्न करा. आवश्यक वाटल्यास बदल करा. चालू नोकरीत कामानिमित्त जादा सुखसुविधा मिळतील. तरुणांचे विवाह जमतील. घरात आवडीची वस्तू खरेदी कराल.

धनु
ग्रहांची साथ मिळेल. त्यामुळे पूर्वीच्या अनुभवाचा उपयोग एक नवीन वेगळी दिशा मिळण्यात होईल. व्यवसायात कल्पना साकार होण्यासाठी पूरक घटना घडतील. आजूबाजूच्या व्यक्तींच्या तुमच्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत ते समजून घ्या. नोकरीत कष्टाची तयारी ठेवलीत तर फळे निश्‍चित मिळेल. घरातील किंवा जवळच्या व्यक्तीमुळे विरंगुळा लाभेल. प्रकृतिमान सुधारेल.

मकर
महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी तुमच्यावर आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा करणाऱ्या घटना घडतील. तुमच्या इच्छा आकाक्षांना धुमारे फुटतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही आत्मविश्‍वासाने वावराल. धंदा, व्यवसायात पूर्वी लांबवलेले बेत पुन्हा विचारात घेतले जातील. आपल्या सुखसुविधा वाढवण्यासाठी पैसे उभारू शकाल. नोकरीत नव्या संधीकरिता तुमची निवड होईल.

कुंभ
या सप्ताहात सर्व आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. व्यवसायात धोका पत्करून कोणतेही नवे काम हातात घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय तूर्तास पुढे ढकला. नोकरीत आपले काम बरे की आपण बरे हे धोरण ठेवा. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करा. घरात सामोपचाराची भूमिका ठेवा. तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्तींना सांभाळून घ्या. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

मीन
तुमची प्रगती व यश हे तुम्हाला मिळणाऱ्या सहकार्यावर अवलंबून आहे. धंदा, व्यवसायात महत्त्वाचे करार किंवा सौदे एक दोन आठवडे पुढे ढकला, नाहीतर त्यात फसगत होईल. नोकरीत जोखमीचे काम स्वतःच हाताळा. इतरांनी सांगितलेल्या बातमीवर ताबडतोब विश्‍वास ठेवून बोलण्याची घाई करू नका. घरात, मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांचेपासून चार हात लांब राहणे चांगले. मनन व चिंतन करून मनःस्वास्थ्य जपा.

संबंधित बातम्या