ग्रहमान : २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

ग्रहमान : २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१

मेष 
उत्साह द्विगुणित करणारी बातमी कळेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. अचानक धनलाभाची शक्यता. नोकरदारांना वरिष्ठांकडून व सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. परदेशगमनास उत्तम संधी चालून येईल. सणासुदीच्या खरेदीच्या गडबडीत महिलांचा वेळ जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रियजन, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात टंगळमंगळ राहील.

वृषभ 
व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी ओळखीचा उपयोग करून कामाचा विस्तार कराल. खेळत्या भांडवलासाठी बँका, पतपेढी यांची मदत घ्याल. आज रोख व उद्याही रोखच हे धोरण अवलंबाल. नोकरीत सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व सहकारी व वरिष्ठांना कळेल. घरात सुवार्ता कळेल. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल.

मिथुन 
तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा फलद्रुप झाल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. व्यवसायात यशाची कमान उंचावत जाईल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नोकरदार व्यक्तींना वेगळ्या कामाच्या निमित्ताने जादा भत्ते व सवलती मिळतील. महत्त्वाचे करारमदार होतील. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. नवीन जागा, वाहन, वास्तू खरेदी कराल.

कर्क 
व्यवसायात कल्पकता व व्यवहार चातुर्य यामुळे उलाढाल चांगली राहील. नवीन पद्धतीची कामे तुम्हाला विशेष आकर्षित करतील. नोकरदार व्यक्तींना कामात उत्तम कामगिरी बजावल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना गती येईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांचा वेळ घरात नवीन खरेदी व गृहसजावट यात जाईल. खर्च वाढेल. पाहुणे येतील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल.

सिंह 
ग्रहमानाची साथ असल्याने कामाचा झपाटा राहील. व्यवसायात नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहाल. अनपेक्षितरीत्या चांगल्या घटना घडतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी पार पाडाल. केलेल्या कामातून आनंद मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचा वेळ आवडत्या छंदात मजेत जाईल. प्रकृतीमानही उत्तम राहील.

कन्या 
आर्थिक बाबतीत चोखंदळ राहाल. पैशाचे व्यवहार करताना कर्तव्य श्रेष्ठ मानाल. व्यवसायात तात्पुरता नफा न बघता भविष्यात फायदा मिळेल. अशा कामांवर लक्ष केंद्रित कराल. पैशाची ऊब चांगली मिळेल. ती वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतीलच ही अपेक्षा करू नका. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न करा. कामात चुका कमी करा. सलोख्याने वागा.

तूळ 
स्वतःचे वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न राहील. पैशाचे बजेट कोलमडेल. व्यवसायात जुनी देणी द्यावी लागतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत मनाविरुद्ध कामे करावी लागतील. चिडचिड वाढेल. तरी जिभेवर साखर ठेवून इतरांशी बोलावे. महिलांचा वेळ नको त्या कामात जाईल. नवीन अनुभव येतील. मुलांकडून मात्र चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह जमतील.

वृश्‍चिक 
व्यवसायात तुमच्या गुणांना वाव देणारे पूरक ग्रहमान लाभल्याने कामाचा मोबदला चांगला मिळेल. बँका, हितचिंतकाची मदत मिळाल्याने कामांना गती येईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत इतरांना न जमणारे काम सोपवले जाईल. त्यात यशश्री खेचून आणाल. तुमचे महत्त्व इतरांना कळून येईल. प्रवास कराल. महिलांना सांसारिक जीवनात आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीमान उत्तम राहील.

धनू 
यशदायक ग्रहमान. महत्त्वाकांक्षा जागृत करणारे ग्रहमान लाभल्याने व्यवसायात हातून निसटलेली संधी पुन्हा मिळवाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात आवश्यक ते फेरबदल कराल. कमी श्रमात जास्त फायदा मिळवून आर्थिक बाजू भक्कम कराल. नवीन कामे मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचा दर्जा उंचावेल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सवलती देतील. कामाचा हुरुप वाढता राहील.

मकर 
माणसांची पारख करावी लागेल. खुबीने वागून त्यांचाच योग्य उपयोग करून घ्याल. व्यवसायात वेळेचे गणित पाळलेत तर उलाढाल वाढेल व फायदा होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्य तत्पर रहा. बाजारातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा व त्यानुसार धोरण ठरवा. नोकरीत पुढे पुढे करून कामे स्वीकारू नका. क्षमता ओळखा. चांगल्या बातमीने महिलांना आनंद मिळेल.

कुंभ 
सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे निर्माण झाल्याने तुम्हाला निराशा येईल व पावले चुकीच्या मार्गाने पडण्याची भीती वाटेल, तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात पैशाच्या मोहमयी वातावरणापासून दूर राहा. तत्त्वानुसार वागून कामे करा. हितचिंतकांची मदत घ्या. आर्थिक बाबतीत समाधान मिळेल. नोकरीत ताण तणाव असला तरी वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा.

मीन 
‘जैसी करनी वैसी भरनी’ ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात चुकीच्या सल्ल्याने नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक बाबतीत चोखंदळ राहा. पैशाचा अतिमोह टाळा. नोकरीत अयोग्य संगतीपासून दूर रहा. वरिष्ठांनी दिलेल्या आश्‍वासनांना भुलून नवीन जबाबदारी स्वीकारू नका. आपले काम बरे, आपण बरे हे धोरण ठेवा. महिलांनी भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घेऊ नयेत. ‘दिसते तसे नसते’ हे ही लक्षात ठेवावे.

संबंधित बातम्या