ग्रहमान ः १८ ते २४ सप्टेंबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

ग्रहमान ः १८ ते २४ सप्टेंबर २०२१

मेष 
पैशाचं सोंग पांघरता येत नाही हे लक्षात ठेवून खर्च करा. मनावर संयम ठेवा. पैशाची चणचण जाणवेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन लाभदायी ठरेल. केलेल्या कष्टाच्या मानाने यश मिळेल. नोकरीत स्वतःचे काम स्वतः करा. अतिविश्‍वास टाळा. उधार उसनवार शक्यतो टाळा. घरातील व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. कामाचे वेळी सर्वजण हात वर करतील. विद्यार्थ्यांनीही मित्रांवर विसंबून राहू नये.

वृषभ 
अंधविश्‍वास ठेवून कोणतीही कृती करू नका. व्यवसायात कामातील अडचणी कमी होतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. नोकरीत वरिष्ठ जादा कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील, त्यासाठी तुमची थोडी खुशामतही करतील. घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल. पाहुण्यांची ये-जा राहील.

मिथुन 
मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवलात तर जीवनाचा आनंद मिळेल. कामात कार्यतत्पर राहा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. नवीन व्यक्तींवर जादा विश्‍वास ठेवू नका. प्रयोगापेक्षा कृतीवर भर द्या. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाला जे पटेल तसेच वागा. कामात हेळसांड करू नका.

कर्क 
कार्यमग्न राहून प्रगती करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द मानतीलच हे गृहीत धरू नका. चिडचिड न करता कामाची आखणी योग्य प्रकारे करा. तुमच्या कामात कसूर होऊ देऊ नका. घरात जादाची कामे करून दमणूक होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

सिंह 
‘जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला,’ ही म्हण आठवेल. तरी कामात हलगर्जीपणा न करता स्वतःची कामे स्वतः करा. व्यवसायात पैशाचे ठोकताळे चुकल्याने कामांना विलंब होईल. काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंद्यात योग्य वेळी योग्य कृती करून प्रगती साधा. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. वरिष्ठांच्या हेकेखोर स्वभावामुळे त्रास होईल. घरात मोठ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या 
‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, ह्या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात प्रयत्न केल्याशिवाय यश नाही, हे लक्षात येईल. कामातील प्रगती समाधानकारक राहील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. कामानिमित्ताने परदेशगमन व लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात नवीन खरेदीचे मनसुबे आखाल.

तूळ 
सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने आश्‍चर्यचकित व्हाल व कोणाशी कसे वागायचे, बोलायचे याबाबत गोंधळून जाल. व्यवसायात बुद्धीला जे पटेल तेच निर्णय घ्या. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा ठेवू नका. कामात चोख रहा. व्यवहार दक्ष निर्णय पुढे उपयोगी पडतील.

वृश्‍चिक 
स्वकर्तृत्वावर कामाचा उरक पाडाल. व्यवसायात उलाढाल मनाप्रमाणे राहील. कमी श्रमात जास्त पैसे मिळाल्याने आनंदी व्हाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. सहकाऱ्यांकडून खुबीने इतर कामे करून घ्याल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. घरात महिलांना कामात कोणतीही मदत मिळणार नाही तरी अपेक्षा ठेवू नये. एखादा ठरविलेला कार्यक्रम काही कारणाने पुढे ढकलावा लागेल.

धनु 
माणसांची पारख छोट्या छोट्या गोष्टींतून होईल व भ्रमनिरास होईल. व्यवसायात वेळप्रसंगी जो उपयोगी पडेल तो देवासमान असेल. वसुली झाल्याने आर्थिक घडी सुधारेल. मनाप्रमाणे कामे पार पडतील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. कार्यपद्धतीत बदल करून बाजी माराल व कौतुकास पात्र व्हाल. घरात विचार व कृती यांचा समन्वय साधून कामे करा. इतरांची साथ मिळेल.

मकर 
व्यवसायात महिनाभरात बरीच प्रगती साधू शकाल. ग्रहांची साथ आहे. कामात सामंजस्य दाखवून कामांना गती द्याल. पैशाची चिंता नसेल. सरकारी कामात यश येईल. नोकरीत तुमचे व कामाचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांकडून अधिकारात वाढ होईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. घरात महिलांना स्वातंत्र्य लाभल्याने समाधान मिळेल. तरुणांना मनाप्रमाणे पद भूषविता येईल.

कुंभ 
तुमच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची संधी येईल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून काही ठोस पावले उचलाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन योजना आखाल. खेळत्या भांडवलाची तरतूद केलेली लाभदायी ठरेल. नोकरीत हितशत्रूपासून सावध रहा. कामातील बेत गुप्त ठेवा. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

मीन 
थोडेसे संभ्रमात टाकणारे ग्रहमान आहे, तरी मनाला योग्य वाटेल तसेच वागा व निर्णय घ्या. व्यवसायात योग्य मार्ग मिळवण्यासाठी थोडे सबुरीचे धोरण ठेवा. नवीन कामांमुळे जुने हितसंबंध संपण्याची शक्यता आहे तरी शांत रहा. पैशांची आवक चांगली असेल. नोकरीत हातातील कामात बिनचूक राहा. गडबड गोंधळ टाळा. चिडचिड न करता झेपेल तेवढेच काम करा. घरात महिलांचा भावनाद्रेक होईल.

संबंधित बातम्या