ग्रहमान ः २ ते ८ ऑक्टोबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

ग्रहमान ः २ ते ८ ऑक्टोबर २०२१

मेष 
तुमच्या अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. पैशाची ऊब मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवेल. नोकरीत अपेक्षित सहकार्य लाभेल. मनाप्रमाणे काम करता येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घरकामात बराच वेळ दवडावा लागेल. सुवार्ता कळेल. तब्येतीवरचा ताण कमी होईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

वृषभ 
आर्थिक प्रश्‍न सुटतील. व्यवसायात अशक्यप्राय कामातही यश मिळवाल. वेळेचा व पैशाचा उपयोग योग्य कारणासाठी होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांच्या तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. न चिडता कामे करत राहा. कामातील बेत गुप्त ठेवा. महिलांना नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत स्पृहणीय यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन 
व्यवसायात नवीन दिशा सापडेल. कामाचा विस्तार करण्याचे बेत मनात घोळतील. नवीन कामे हाती घेताना त्याचा ताळेबंद करून मगच पुढे जा. आर्थिक येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. कामात अतिविश्‍वास घातक ठरेल. महिलांना मनास्वास्थ्य जपता येईल. प्रकृतीत उत्तम सुधारणा होईल.

कर्क 
‘दाम करी काम’ ह्या म्हणीचा प्रत्यय येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत आमिष दाखवून सहकाऱ्यांकडून खुबीने काम करून घ्याल. कामाचा ताण वाढेल. प्रवास घडेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. महिलांनी कामात सावध दृष्टिकोन ठेवावा.

सिंह 
‘खाईन तर तुपाशी.....,’ असा बाणा राहील. ग्रहांची अनुकूलता लाभल्याने मनातील बेत साकार होतील. व्यवसायात कामांना वेग येईल. मनावरचा ताणतणाव दूर होईल. बँका, हितचिंतकांची मदत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत अधिकाराचा योग्य वापर करून घ्याल. सहकारीही कामात मदत करतील. तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद उपभोगता येईल. सद्विचार व सकृत्ये हातून घडतील.

कन्या 
ग्रहांची मर्जी राहील. कामात वाढ होईल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा आता होईल. स्वप्ने साकार होतील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळल्याने तुमची पत वाढेल. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल. घरात महिलांचा मूड जरा वेगळाच असेल. विश्रांती घेण्याकडे कल राहील.

तूळ 
रेंगाळलेली व अर्धवट राहिलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. तुमचा दृष्टिकोन विशाल असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. मानसिक समाधान लाभेल. तुमच्या शब्दाला मान मिळेल. घरात खर्च वाढला तरी आवश्यक गोष्टींसाठीच असेल. महिलांना मनाजोगती खरेदी करता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

वृश्‍चिक 
अत्यंत धोरणी राहून भविष्याची तरतूद कराल. व्यवसायात आवश्यक ते बदल करून यश मिळवाल. पैशाची चिंता मिटेल. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही सहजपणे करू शकाल. नोकरीत इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर तुमचा कामाचा ताण अवलंबून राहील. शब्द हे ‘शस्त्र’ आहे, हे लक्षात ठेवा. महिलांनी कामात सतर्क राहावे. एखाद्या शुभकार्याच्या निमित्ताने कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

धनु 
भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे कराल. व्यवसायात कामात चोखंदळ रहाल. नवीन कामे हाती घेऊन झपाट्याने पूर्ण करण्याचा मानस असेल. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीज होईल. कामाचा विस्तार करण्याचा बेत सफल होईल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. अनपेक्षित लाभाची शक्यता नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्याचा योग्य उपयोग करा.

मकर 
व्यवसायात कामाचा ताण वाढला तरी कामाचे समाधान मिळेल. त्यामुळे त्रास जाणवणार नाही. दिलेला शब्द पाळण्यासाठी अथक परिश्रम घ्याल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागल्याने चिडचिड होईल. सहकारी व वरिष्ठांची मदत मिळेलच हे गृहित धरू नका. मानले तर समाधान असा बाणा ठेवा. विश्रांती घ्यावीशी वाटेल.

कुंभ 
तडजोडीचे व लवचिक धोरण ठेवलेत तर सर्व क्षेत्रात लाभ होईल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामाच्या पद्धतीत बदल कराल. नोकरीत तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. अर्थप्राप्तीचे प्रमाण वाढल्याने पैशाची चिंता मिटेल. वादविवाद टाळून कामे हातावेगळी करण्याकडे कल राहील. महिलांना कामाचा हुरुप येईल. चांगली बातमी मन सुखावेल.

मीन 
‘प्रयत्ने वाळूचे......’, हे लक्षात ठेवावे. व्यवसायात कामात कोणतीही कसूर ठेवू नये. नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करु नये. सहकाऱ्यांकडून खुबीने काम करून घ्यावे. नोकरीत वादविवाद टाळून कामे संपवावीत. सुसंगती लाभेल. वरिष्ठ कामानिमित्ताने सवलती व अधिकार देतील. वेळेचे महत्त्व ओळखावे. महिलांनी सहनशीलता बाळगून कामे करावीत.

संबंधित बातम्या