ग्रहमान १६ ते २२ ऑक्टोबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021


ग्रहमान १६ ते २२ ऑक्टोबर २०२१

मेष
कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्यावर भर राहील. मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात महत्त्वाची कामे हाती घ्याल. कामामुळे धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याकडे कल राहील. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. घरात माझे जेच खरे हा अट्टाहास सोडा.

वृषभ
जीवनाचा आस्वाद घेण्याची ऊर्मी उफाळून येईल, पण थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्या. नवीन करार करण्यापूर्वी त्यांचा भविष्यात काय परिणाम होईल याचा अंदाज घ्या. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन नोकरीत थोडा धीर धरावा. घरात पाहुण्यांची ये -जा राहील. नातेवाईक व आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.

मिथुन
आशावादी दृष्टिकोन ठेवून कामाची आखणी करा. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून कामे हाती घ्या. उधार उसनवार शक्यतो टाळा. पूर्वी केलेल्या कामाचे आर्थिक स्वरूपात श्रेय मिळेल. कामामुळे मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम केलेत तर समाधान मिळेल. पैशाच्या मोहापासून लांब राहिलात तर त्रास होणार नाही. कामात गुप्तता राखलीत तर लाभ तुमचाच होईल.

कर्क
मनाला जे योग्य वाटेल तोच निर्णय घ्याल. व्यवसायात काही ठोस निर्णय घेऊन कार्यवाही कराल. आर्थिक सुधारणा करण्याकडे कल राहील. विचार व कृती यांची योग्य सांगड घालून कामे हातावेगळी कराल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा. कामात दक्ष रहा. तुमच्या स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात वादाचे प्रसंग टाळा. सामंजस्याने प्रश्नांची उकल करा.

सिंह
तुमचा आत्मविश्वास उत्तम असल्याने तुम्ही कामात पुढाकार घेऊन कामे कराल. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल, त्यामुळे मात्र मोठी उडी नको. कामाबाबतीत कोणी डिवचले तर ते तुम्हाला सहन होणार नाही. तुमच्या वागण्या बोलण्याने हितसंबंध बिघडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. नोकरीत वरिष्ठांशी मनातील बेत व्यक्त करा. सुसंवाद चांगला ठेवा. सहकाऱ्यांकडून खुबीने काम करून घ्याल.

कन्या
ग्रहमानाची साथ राहील, त्यामुळे सुखाने श्वास घेऊ शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम व्यवसायावर जाणवेल. पैशाची बाजू समाधानकारक राहील. कामानिमित्ताने प्रवासयोग आहे. नोकरीत तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवलेत तर त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. वरिष्ठ तुमच्या कामाच्या पद्धतीत व स्वरूपात फेरबदल करतील.

तूळ
एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याकडे कल राहील, त्यामुळे नेमके कशाला प्राधान्य द्यायचे असा थोडा संभ्रम निर्माण होईल. व्यवसायात भावनावेगाला आवर व कर्तव्याला प्राधान्य देऊन तसेच व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्या. कामात कुवतीपेक्षा जास्त धोका पत्करू नका. पैशाची कुवत व तांत्रिक अडथळ्यांचा विचार करून नवीन गुंतवणूक करा.

वृश्चिक
बदलत्या ग्रहमानामुळे तुम्हाला तुमचे निर्णय परिस्थितीनुरूप बदलावे लागतील. व्यवसायात, कामात स्वयंसिद्ध राहून कामे संपवावी लागतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करावी लागतील. नोकरीत वरिष्ठांचा मानापमान सांभाळून कामे करावीत. सहकाऱ्यांकडून घेतलेल्या मदतीची परतफेड करावी लागेल. जमतील तेवढीच कामे करा.  आप्तेष्ट, नातेवाईक यांची सरबराई करावी लागेल.

धनु
व्यवसायात आश्वासने देताना आपली कुवत ओळखून सावधगिरीने आश्वासन द्या व ते पाळा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील, त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघा. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल.

मकर
कामात विनाकारण झालेली धावपळ, दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बढतीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल.

कुंभ
अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढविण्यासाठी ठोस उपाय कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल.

मीन
सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल. व्यवसायात, कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल. मनाला पटतील, रूचतील तीच कामे करा. नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल.  जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग. घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल, मात्र शब्द हे शस्त्र आहे, हे लक्षात ठेवा. आरोग्य सुधारेल.

संबंधित बातम्या