ग्रहमान  २० ते २६ नोव्हेंबर २०२१

अनिता केळकर
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

ग्रहमान  २० ते २६ नोव्हेंबर २०२१

मेष 
सप्ताहात कामांना महत्त्व देऊन ती पूर्ण कराल. व्यवसायात अनपेक्षित खर्च व अडथळ्यांना तोंड देण्याची मानसिकता ठेवा. खेळत्या भांडवलाची सोय बँका व हितचिंतक यांच्याकडून होईल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील ती मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत हातातील कामे संपवून मगच सहकाऱ्यांना मदत करा. वरिष्ठ एखाद्या कामाची महत्त्वाची जबाबदारी सोपवतील, त्यामुळे जादा काम करणे भाग पडेल. प्रकृतीची कुरकूर कमी होईल.

वृषभ 
कामाची विस्कटलेली घडी नीट बसवून कामे पूर्ण कराल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे धोरण ठरवाल. व्यावसायिक यश वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमची अडचण ओळखून कामही पूर्ण करतील. नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. घरात वातावरण चांगले राहील.

मिथुन 
एकाच वेळी अनेक कामे मनात येतील, त्यांची आखणी करून वेळ व पैसे यांची सांगड घालून ती पूर्ण कराल. कार्यतत्पर राहून कामात पुढाकार घ्याल. व्यवसायात चोखंदळ राहून कृतीवर भर द्याल. पूर्वी केलेल्या श्रमाचे चीज होईल. नोकरीत अस्थिरता राहील, परंतु योग्य निर्णय होऊन त्याचा लाभ तुम्हाला होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. घरात कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल.

कर्क 
कामात व्यग्र राहून प्रगती करण्यावर भर राहील. व्यवसायात धाडस करून वेगळ्या पद्धतीचे काम सुरू कराल. आर्थिक लाभ चांगला असल्याने चिंता नसेल. ओळखीतून नवीन कामेही मिळतील. नोकरीत तुमच्या गुणांना वाव देणारे काम मिळेल. कामात चोख राहाल. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. घरात छोटासा कार्यक्रम ठरेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. केलेल्या श्रमाचे कौतुक होईल.
 

सिंह 
 तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. कामातील प्रगतीचा ध्यास असेल. व्यवसायात परिस्थितीनुसार ध्येय धोरणे ठरवाल. कृतीवर भर जास्त असेल. कष्टाचीही तयारी राहील. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल संभवतो. रेंगाळलेली कामे गती घेतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात काही ठोस निर्णय घ्याल. प्रश्‍नांची उकल करून ती सामंजस्याने सोडवाल. कौटुंबिक स्वास्थ राहील. 

कन्या 
नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक धोरण अवलंबाल. तणावमुक्त झाल्याने हायसे वाटेल.व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली मदत कामे आटोक्यात आणेल. नवीन कामे करण्यात उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी झाल्याने चार पैसे हातात शिल्लक राहतील. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून वागा. सवलती मिळवण्यासाठी कारणे यथायोग्य मांडा.

तूळ 
मानले तर समाधान मिळेल. पैशाचा विनियोग यथायोग्य केलात तर चणचण भासणार नाही. व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब कराल. जाहिरात, प्रसिद्धीमाध्यमे यांमुळे कामाचा विस्तार होईल. सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळेल. नोकरीत वरिष्ठ अवघड कामे तुमच्यावर सोपवतील. कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे पावले उचला.

वृश्‍चिक 
काळानुरूप बदल करून पुढे जाण्याचा तुमचा स्वभाव तुमची प्रगती करण्यास उपयोगी पडतो. व्यवसायात उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील. त्यानिमित्ताने वेगवेगळया व्यक्तींशी संपर्क होईल. पैशाची आवक वाढेल. नोकरीत भत्ते व सवलती मिळाल्याने तुम्ही खूष असाल. सरकारी कामात यश मिळेल. घरात मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. मंगलकार्य ठरतील. प्रकृतीमान सुधारेल.

धनू 
तुमच्या हरहुन्नरी स्वभावाला झळाळी देणारे ग्रहमान लाभत आहे. व्यवसायात वेगवेगळया स्तरांवर आपली छबी उमटवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. पैशाची चिंता मिटेल. कामे पूर्णत्वाला आल्याने हायसे वाटेल. मनाप्रमाणे जीवन जगण्यात मजा वाटेल. नोकरीत महत्त्वाच्या कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. मानसन्मानाचे योग येतील.

मकर 
तुमच्या कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान आहे. अडथळ्याची शर्यत पार करून दिलासा मिळाल्याने पुन्हा ताजेतवाने व्हाल. व्यवसायात काहीतरी चांगले करण्याचा आत्मविश्‍वास वाटेल. कामाचे स्वरूप बदलून फायद्याचे प्रमाण वाढवण्याचा विचार असेल, त्याला प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबाही मिळेल. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळणारी संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील.

कुंभ 
तुमचा आशावाद चांगला असल्याने कामात प्रगती कराल. व्यवसायात आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्याचा तुमचा विचार सफल होईल. याकामी हितचिंतकाची मदत मिळेल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे वळा. नोकरीत कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. व्यवहारात चोख रहा. गोड बोलण्याचा प्रयत्न करा व खुबीने कामे करून घ्या. वादाचे प्रसंग आले तरी निवळतील.

मीन 
 प्रगतीला पूरक ग्रहमान आहे, त्यामुळे काहीतरी चांगले हातून घडावे असे वाटेल. व्यवसायात दैनंदिन कार्यक्रमात फेरबदल कराल. पैशाची बाजू विशेष बळकट करण्याचा प्रयत्न राहील. खेळत्या भांडवलाची तरतूदही करून ठेवाल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. नवीन नोकरीत मात्र काही निर्णय घाईने घ्यावे लागतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. महिलांना मानसिक शांतता मिळेल.

संबंधित बातम्या