विनादावा ठेवींच्या समस्या

अतुल सुळे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

बँकिंग विशेष
देशातील विविध बॅंकांमध्ये, अनेक वर्षे विना दावा अथवा बेवारशी पडून असलेल्या ठेवींइतकीच गंभीर परिस्थिती पोस्टातील ठेवी, विमा कंपन्यांतील गुंतवणूक, म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक, शेअर्स - डिबेंचर्समधील गुंतवणूक व विनादावा इन्कम टॅक्‍स रिफंडसची सुद्धा आहे.

अलीकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील विविध बॅंकांमधील २.६३ कोटी खात्यांमध्ये एकूण ८,८६४.६ कोटी रुपये पडून आहेत. या रकमेवर गेल्या १० वर्षात कोणीही दावा केलेला नाही. ही आकडेवारी डिसेंबर २०१६ ची असून २०१२ ते २०१६ या ४ वर्षात ‘बेवारशी’ खात्यांची संख्या व रक्कम दुप्पट झाल्याचे दिसून येते. खालील तक्‍त्यावरून ही रक्कम दरवर्षी वाढत असून गेल्या ११ वर्षांत सुमारे १० पट वाढल्याचे लक्षात येईल.

बँकांमधील विनादावा ठेवी रक्कम कोटी रुपये

वर्ष       रक्कम     वर्ष        रक्कम
२००५    ९१७.५      २०११    २४४२.१
२००६    १०५०.१    २०१२    ३५९८.१
२००७    १०९५.४    २०१३    ५०५८.१
२००८    ११६०.४    २०१४    ४९२१.०
२००९    १३३०.९    २०१५    ६८३५.४
२०१०    १६९१.१    २०१६    ८८६४.६

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालानुसार खालील तीन बँका या बाबतीत `आघाडी`वर आहेत.
बँक                       विनादावा खाती    विनादावा रक्कम (रु. कोटी)
स्टेट बँक                ४७,००,०००          १,०३६
कॅनरा बँक               ४७,००,०००         ९९५
पंजाब नॅशनल बँक    २३,००,०००         ८५९

विनादावा खाती कशी निर्माण होतात
सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते, की ही विनादावा अथवा बेवारशी खाती निर्माण कशी होतात. समजा एखाद्या व्यक्तीने अथवा संस्थेने बॅंकेत खात उघडले. सुरवातीला काही वर्षे त्या खात्यावर व्यवहार केले व नंतर काही वर्षांनंतर त्या खात्याचा विसर पडला किंवा उपयुक्तता राहिली नाही किंवा परगावी अथवा परदेशात वास्तव्यास गेल्यास ते खाते अथवा ठेवी बॅंकेत तशाच पडून राहतात. अशा खात्यांवर व्यवहार नसले तरी बॅंकांना व्याज द्यावे लागते. संबंधित खातेदार ते खाते बंद करण्याची तसदी घेत नाहीत. काही वेळा मुदत ठेवींच्या पावत्या बॅंकेच्या ‘सेफ डिपॉझिट लॉकर’मध्ये अथवा बॅंकांच्या ‘सेफ कस्टडी’मध्ये ठेवण्यात येतात व ठेवीदारांचा मृत्यू होतो. ठेवींबद्दल घरच्यांना काहीच माहिती सांगितली नसल्यास या ठेवी बेवारशी होतात. खाते एकाच व्यक्तीच्या नावे आहे व नामांकन केलेले नसल्यास अथवा नामांकन केले आहे, परंतु नामांकित व्यक्तीला ते माहिती नसल्यास ही रक्कम बेवारशी अथवा विनादावा बॅंकेत वर्षानुवर्षे पडून राहते, अशी रक्कम १० वर्षांपेक्षा अधिक काळ बिनाव्यवहार पडून राहिल्यास, बॅंकांच्या शाखांना ती रक्कम आपल्या मुख्य कार्यालयाकडे पाठवावी लागते व मुख्य कार्यालयाला ती रक्कम रिझर्व्ह बॅंकेच्या ‘डिपॉझिटर्स एज्युकेशन ॲण्ड अवेअरनेस फंड’मध्ये जमा करावी लागते.

रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना
बॅंकांमधील विनादावा आणि बेवारशी रक्कमांची सतत वाढती संख्या व रक्कम लक्षात घेऊन २०१५ मध्ये रिझर्व बॅंकेने सर्व बॅंकांना काही मार्गदर्शक सूचना केल्या, त्या अशा-

 • ज्या खात्यांवर गेल्या १० वर्षात एकही व्यवहार झालेला नाही, अशा खात्यांची यादी प्रत्येक बॅंकेने आपल्या संकेत स्थळावर (वेब साइट) टाकावी. या यादीत खातेदाराचे नाव व पत्ता एवढीच माहिती टाकावी; खाते नंबर, खात्याचा प्रकार, शाखेचे नाव इत्यादी माहिती देऊ नये.
 • या यादीच्या सुरवातीला ‘फाईंड’ अथवा ‘सर्च’ हा पर्याय उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ठेवीदार स्वतः अथवा त्यांचे नातलग खात्याचा शोध घेऊ शकतील. शोध घेण्यासाठी खातेदाराचे नाव, जन्मतारीख, पिनकोड, पासपोर्ट नंबर, पॅन नंबरचा वापर करता येतो.
 • बॅंकांना ही ठेव परत कशी मिळवावी याबद्दलची माहिती व फॉर्म ‘साइट’वर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
 • बॅंकांनी ही यादी सदैव अद्ययावत ठेवावी.
 • बॅंकांनी स्वतःहून खातेदारांना शोधण्याचा प्रयत्न करावा.
 • बॅंकांच्या ‘बोर्ड ऑफ डिरेक्‍टर्स’नी विनादावा ठेवींबद्दलचे धोरण निश्‍चित करावे.

खातेदारांनी काय करावे?
ठेवीदारांनी ठेवलेली रक्कम शोधून काढण्यासाठी बॅंकेचे नाव व ‘अनक्‍लेम्ड डिपॉझिट लिस्ट’ असे टाइप करून ‘गुगल सर्च’ घ्यावा. ही यादी मिळाल्यावर त्यात मागितलेली माहिती भरावी. यादीमध्ये आपले अथवा आपल्या आप्तेष्टांचे नाव व पत्ता मिळाल्यास ओळखीचा व पत्त्यांचा पुरावा घेऊन बॅंकेच्या जवळच्या शाखेत भेटावे. मूळ ठेवीदार हयात नसल्यास त्याच्या मृत्यूचा दाखला व तुम्ही वारसदार असल्याचा पुरवा बॅंकेला द्यावा लागतो. ‘अनक्‍लेम्ड डिपॉझिट’चा क्‍लेम फॉर्म भरावा लागतो. बॅंकेचे समाधान झाल्यास ते पैसे तुम्हाला/ वारसदाराला व्याजासह परत मिळू शकतात. चालू खात्यावर व्याज मिळत नाही, बचत खात्यावर बचत खात्याच्या दराने व्याज मिळते, तर मुदत पूर्ण झालेल्या मुदत ठेवींवर मुदतपूर्तीच्या तारखेपासून बचत खात्याच्या दराने व्याज मिळते.

ठेवीदारांनी काय काळजी घ्यावी
विनादावा अथवा बेवारशी बॅंक खाती निर्माणच होऊ नयेत, यासाठी खालील उपाय करता येतील.

 • शक्‍यतो खाते एकाच व्यक्तीच्या नावावर उघडू नये.
 • उघडल्यास नामांकन जरूर करावे.
 • नामांकित व्यक्तीला त्याची कल्पना द्यावी.
 • खाते अथवा ठेव संयुक्त नावावर असले तरी नामांकन करावे.
 • मुदत ठेवींची ‘सेफ पावती डिपॉझिट लॉकर’मध्ये अथवा बॅंकेच्या ‘सेफ कस्टडी’मध्ये ठेवल्या तरी त्यांची एक प्रत घरी ठेवावी.
 • मुदत ठेवींवर कर्ज काढतानासुद्धा त्यांची एक प्रत घरी सुरक्षित ठेवावी.
 • आपण स्थलांतर केल्यास अथवा परदेशी वास्तव्यास गेल्यास, बॅंकेला नवीन पत्ता वेळोवेळी कळवावा.
 • आपल्या आर्थिक व्यवहारांची नोंद एका डायरीत करावी व त्यांची माहिती आपल्या नजीकच्या विश्वासू व्यक्तीला सांगावी.
 • आपला फोन नंबर, ‘ई.-मेल ॲड्रेस’ बॅंकेला कळवावा व त्यातील बदलही बॅंकेला वेळोवेळी कळवीत राहावे.
 • इच्छापत्र करून त्यात बॅंक ठेवींचा उल्लेख करावा व ते कोठे ठेवले आहे, ते आपल्या विश्वासातील व्यक्तीला जरूर सांगावे.

देशातील विविध बॅंकांमध्ये, अनेक वर्षे विना दावा अथवा बेवारशी पडून असलेल्या ठेवींइतकीच गंभीर परिस्थिती पोस्टातील ठेवी, विमा कंपन्यांतील गुंतवणूक, म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक, शेअर्स - डिबेंचर्समधील गुंतवणूक व विनादावा इन्कम टॅक्‍स रिफंडसची सुद्धा आहे. आपली आयुष्यभराची कष्टाची कमाई एखाद्या संस्थेकडे अथवा सरकारकडे ‘बेवारशी’ पडून राहू नये, असे वाटत असल्यास गुंतवणूकदारांनी सदैव दक्ष राहिले पाहिजे. 

संबंधित बातम्या