बँकिंग क्षेत्राचे डिजिटलायझेशन

सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

बँकिंग विशेष

बॅंकिंग क्षेत्रात संगणकीकरण झपाट्याने होऊ लागले व आजमितीस सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बॅंका पूर्णपणे संगणकीकृत झाल्या आहेत. असे असले तरी नवनवीन तंत्रज्ञान बॅंकिंग क्षेत्रात वेळोवेळी येत असल्याचे दिसून येते,परिणामी एकूणच बॅंकिंग कार्यपद्धती बदलली असल्याचे दिसून येते. यातील काही प्रमुख बदल काय आहेत त्याचा आढावा घेऊ.

नव्वदच्या वर्षात बॅंकिंग सेक्‍टरमध्ये जे बदल झाले त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅंकांचे संगणकीकरण, सुरवातीच्या काळात कर्मचारी संघटनांच्या प्रखर विरोधामुळे संगणकीकरणाची प्रक्रिया फारसा वेग घेऊ शकली नाही मात्र  १९९५च्या सुमारास रिझर्व्ह बॅंकेने खासगी बॅंकांना लायसन्स दिल्याने इंड सिंध बॅंक, आयसीआयसीआय बॅंक. एचडीएफसी बॅंक या बॅंकांनी बॅंकिंग व्यवसायास सुरवात करतानाच आपले व्यवहार संगणकीय पद्धतीने सुरू केले आणि ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास सुरवात केल्याने राष्ट्रीयकृत तसेच जुन्या खासगी बॅंका यांना तीव्र स्पर्धेस तोंड द्यावे लागले व हा अस्तित्वाचा प्रश्न असल्याची जाणीव झाल्याने संघटनांचा विरोध कमी कमी होत गेला व परिणामी सन २००० पासून बॅंकिंग क्षेत्रात संगणकीकरण झपाट्याने होऊ लागले व आजमितीस सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बॅंका पूर्णपणे संगणकीकृत झाल्या आहेत. असे असले तरी नवनवीन तंत्रज्ञान बॅंकिंग क्षेत्रात वेळोवेळी येत असल्याचे दिसून येते,परिणामी एकूणच बॅंकिंग कार्यपद्धती बदलली असल्याचे दिसून येते. यातील काही प्रमुख बदल काय आहेत त्याचा आढावा घेऊ.

पेमेंट पद्धती (पेमेंट सिस्टिम)  
बॅंकिंग व्यवहारातील हा बदल अगदी प्रकर्षाने जाणवतो. पूर्वी पेमेंटसाठी चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर , मेल ट्रान्स्फर, टेलिफोनिक ट्रान्स्फर व रोख हे पर्याय प्रचलित होते मात्र आज यातील डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, मेल ट्रान्स्फर, टेलिफोनिक ट्रान्स्फर हे प्रकार जवळजवळ संपुष्टात आलेले आहेत, तसेच चेकचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याचे दिसून येते याचे मुख्य कारण म्हणजे एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस या सारखे सुरक्षित व त्वरित पेमेंट करणारे पर्याय आता सहजगत्या उपलब्ध आहेत. या शिवाय गेल्या वर्षापासून युपीआय, भीम, पेटीम किंवा सारखे ई.-वाॅलेट पर्याय आता आपल्या स्मार्टफोनवर सहजगत्या उपलब्ध झाले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे ट्रान्स्फर पेमेंट, बिल पेमेंट, व बुकिंग पेमेंट घरबसल्या व आपल्या सोयीनुसार (सुट्टीच्या दिवशी सुद्धा ) करता येणे शक्‍य झाले आहे. या सर्व पेमेंट सुविधा नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आणि त्यामुळे या सर्व सुविधा सुरक्षित व नियंत्रित आहेत. याशिवाय नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने आता भारत बिल पेमेंट बीबीपीएस ही सुविधा नुकतीच देऊ केली असून या माध्यमातून लाइट बिल. टेलिफोन बिल, मोबाईल पोस्ट पेड बिल, ब्रॉडबॅंड बिल, महानगरपालिका कर यासारखी बिले त्वरित भरता येतात व संबंधित कंपनीकडून त्वरित बिल मिळाल्याबाबतची पोहोच एसएमएसद्वारा दिली जाते.

प्लॅस्टिक कार्ड
याशिवाय विविध प्रकारच्या पेमेंटसाठी आता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड यांचा वापर सर्रास होताना दिसून येतो. पूर्वी कार्ड वापरणे ही उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी होती मात्र आता सामान्य माणूससुद्धा आपल्या सोयीनुसार कार्डचा वापर करीत असल्याचे दिसून येते विशेषतः नोटबंदीपासून क्रेडिट/डेबिट कार्ड, युपीआय, भीम, पेटीम, फोनपे या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कार्डातील आणखी एक बदल म्हणजे रूपे कार्ड , याचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. रूपे कार्ड ही नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने बॅंकांमार्फत देऊ केलेले डेबिट कार्ड आहे. 
तसेच कार्डाची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने बॅंका आता व्हर्च्युअल कार्ड देऊ करत आहेत. व्हर्चुअल कार्ड हे आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डचे ॲड ऑन कार्ड असते व याचा वापर ऑनलाइन पेमेंटसाठी करता येतो. 
या पद्धतीत आपल्या मूळ कार्डचा नंबर, एक्‍स्पायरी डेट सीव्हीव्ही नंबर ऑन लाइन पेमेंट साइट वर न देता या कार्डच्या आधारे जनरेट केलेला नंबर वापरून पेमेंट करता येते व यामुळे आपल्या कार्डचा तपशील अन्य कोणास समजत नसल्याने होणारे संभाव्य फ्रॉड टाळता येतात. असा नंबर आपण प्रत्येक व्यवहारासाठी वेगळा जनरेट करू शकतो किंवा आधी जनरेट केलेला नंबर पुढे एक महिना वापरू शकता.

मोबाईल बॅंकिंग ॲप्स 
बॅंकिंगमधे आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे मोबाईल बॅंकिंग ॲप्स, आता बहुतेक सर्व सरकारी व खासगी बॅंका तसेच मोठ्या सहकारी बॅंका विविध मोबाईल ॲप्सद्वारे विविध बॅंकिंग सुविधा खातेदारांना देऊ करत आहेत, यातील महत्त्वाची सुविधा संबंधित बॅंकेचे मोबाईल बॅंकिंग ॲप, हे ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून सुरवातीस रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यावर रोखीचे व्यवहार सोडून अन्य सर्व व्यवहार (उदा,  फंड ट्रान्स्फर, चेकबुक मागणी, खात्याचे स्टेटमेंट, नवीन ठेव पावती करणे, विविध बिलांचे पेमेंट करणे, ऑनलाइन प्राप्तिकर रिटर्न भरणे, स्टॉप पेमेंट, काही तक्रार असल्यास ती संबंधित विभागाकडे नोंदविणे, पब्लिक इश्‍यूसाठी अर्ज करणे, म्युचुअल फंडात ऑनलाइन गुंतवणूक करणे यासारखे सर्व व्यवहार सहजगत्या करता येतात. याशिवाय युपीआय किंवा भीमसारखे ॲप डाऊनलोड करून एकाच वेळी आपल्या अन्य बॅंक खात्यावर व्यवहार करता येतात. विशेष म्हणजे केवळ मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर किंवा संबंधित व्यक्तीचा अथवा व्यवसायिकाचा क्‍यू आर कोड वापरून भीम तसेच युपीआयमार्फत पेमेंट करता येते किंवा पेमेंट मागविता येते. 

आधार कार्डचे वाढते महत्त्व
बदलत्या बॅंकिंग व्यवस्थेत आधार कार्डचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. आता सर्व बॅंक खात्यांना आधार नंबर जोडणे बंधनकारक झाले आहे. यामुळे आर्थिक समावेशकता वाढीस लागेल कारण आता खेडोपाडी तसेच वाड्या वस्त्यावर बॅंकिंग सुविधा पुरविणे सहज शक्‍य होणार आहे. आता अशिक्षित व्यक्ती आपला अंगठा उठवून बॅंकिग व्यवहार करू शकेल. असे व्यवहार अगदी सुरक्षित असतील. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने आता एईपीएस आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम सुरू केली असून या द्वारे फंड ट्रान्स्फर, पेमेंट करणे अथवा पेमेंट मागविणे यासारख्या गोष्टी शक्‍य झाल्या आहेत. जर आपल्याला एखाद्यास पैसे पाठवायचे असतील तर भीम अथवा युपीआयमार्फत पैसे पाठविताना संबंधित व्यक्तीचा केवळ आधार नंबर टाकून आपण त्याला पैसे पाठवू शकतो व ज्या बॅंक खात्याशी आधार नंबर जोडलेला असेल त्या खात्यात रक्कम त्वरित जमा होते. संबंधित व्यक्तीची जर एकापेक्षा अनेक बॅंकेत खाती असतील व या सर्व खात्यांना आधार नंबर जोडले असतील तर ज्या खात्यास सगळ्यात शेवटी आधार नंबर जोडलेला असेल त्या खात्यात रक्कम जमा होते.

लघु वित्त बॅंका व पेमेंट बॅंका
गेल्या वर्षी रिझर्व्ह बॅंकेने लघु वित्त बॅंका (स्मॉल फायनान्स बॅंक) व  पेमेंट बॅंकांना बॅंकिंग परवाना देऊ केला आहे. यापैकी - लघु वित्त बॅंका आत्तापर्यंत सुरू झाल्या असून उर्वरित नजीकच्या काळात सुरू होतील. (सुरू झालेल्या काही बॅंकांची नावे - उज्जीवन बॅंक, इक्विटास बॅंक, एयू बॅंक, सर्वोदय बॅंक, फिन्केअर बॅंक ) तर - पेमेंट बॅंकाही नुकत्याच सुरू झाल्या आहेत (उदा: एअरटेल पेमेंट बॅंक, पेटीम पेमेंट बॅंक, फिनो पेमेंट बॅंक व भारतीय पोस्ट लवकरच आपली पेमेंट बॅंक सुरू करीत आहे.) यातील बहुतेक  लघु वित्त बॅंका या पूर्वीच्या मायक्रो फायनान्स कंपन्या असून आता त्या बॅंकेत रूपांतरित झाल्या आहेत या बॅंका ग्राहकाकडून  बचत व मुदत ठेवी घेऊ शकतात व मात्र यांनी लहानलहान कर्जे देणे अपेक्षित आहे आणि म्हणून एकूण कर्जाच्या ७५ टक्के कर्जे रु. २५ लाखाच्या आतील असणे आवश्‍यक आहे. यामुळे छोट्या व लहान व्यावसायिकास कर्ज मिळणे शक्‍य होणार आहे व आर्थिक समावेशकतेचे उद्दिष्ट्य साध्य होऊ शकेल. विशेष म्हणजे या बॅंका बचत खात्यावर ६.५ ते ८ टक्के इतके व्याज देऊ करत आहेत. याउलट पेमेंट बॅंका फक्त बचत खात्यात ठेवी घेऊ शकतात ते ही जास्तीतजास्त रु. १ लाखापर्यंत, (मुदत ठेवी घेऊ शकत नाहीत) या बॅंकासुद्धा बचत खात्यावर ६ ते ८ टक्के इतके व्याज देऊ करत आहेत. या दोन्ही प्रकारच्या बॅंका खातेदारास डेबिट कम एटीएम कार्ड, नेट बॅंकिंग, बिल पेमेंट यासारख्या सुविधा देऊ करत आहेत. या बॅंका लहान व्यावसायिक बॅंका व सहकारी बॅंका यांच्याशी  मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करतील परिणामतः अशा बॅंकांना आपल्या कार्य पद्धतीत आमूलाग्र बदल त्वरित करावे लागतील.

थोडक्‍यात असे म्हणता येईल की सततच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे बॅंकिंग कार्यपद्धती दिवसेंदिवस ग्राहकाभिमुख होत चालली आहे, असे असले तरी बॅंक कर्मचारी व ग्राहक यांच्यातील प्रत्यक्ष संपर्क कमी होत चालला आहे, एवढे मात्र खरे की बॅंकिग व्यवहार आता त्वरित व पारदर्शी  होऊ लागले आहेत. गरज आहे ती ग्राहकाने वेळोवेळी बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा योग्य तो फायदा घेण्याची.

संबंधित बातम्या