निसर्गाची हेळसांड आणि संकटाला निमंत्रण 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

भाष्य
 

जून २०१३ च्या उत्तरार्धातच भारतात अनेक ठिकाणी पूर आले होते. अतिवृष्टीमुळे या संकटाचे महाप्रलयात रूपांतर झाले आणि  त्यामुळे उत्तर भारताच्या मोठ्या भागातले सगळे जनजीवनच विस्कळित झाले होते. हे संकट प्रामुख्याने उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागच्या परिसरात भयावह प्रकारे कोसळले. चुन्नी, मंगोली, किमानी, सांसरी, गिरिया, प्रेमनगर, जुवा टोक आणि जाखोली ही गावे जास्त आपत्तीग्रस्त झाली होती. तीव्र डोंगरउतार आणि पर्वतमय प्रदेश यामुळे आपत्तीची तीव्रता वाढली. भूस्खलन, दरडी कोसळणे, दगड-मातीचे प्रवाह आणि चिखलयुक्त गाळाचे लोंढे यामुळे मोठी जीवितहानी झाली. अनेक गावे पाण्याखाली पूर्णपणे बुडाली. हरिद्वारमध्ये गंगा नदी धोक्‍याच्या पातळीच्या वर वाहात होती. 

वर्ष २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे झेलम नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुरामुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये हाहाकार माजला होता. अनेक गावे पुरात अक्षरशः पाण्याखाली गेली. तीन हजार खेडी उद्‌ध्वस्त झाली आणि वीस हजार घरांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी सात ते आठ मीटर इतके उंच चढल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेल्यामुळे परिस्थितीचा अंदाज करणेही कठीण होऊन बसले. विविध यंत्रणा सर्वतोपरी अविरत मदत करीत होत्या तरीही सगळे प्रयत्न अपुरेच पडत होते. 

काश्‍मीर खोऱ्यातला गेल्या साठ वर्षांतला हा सर्वाधिक विध्वंसक पूर होता. अतिवृष्टी हे या पुरामागचे मुख्य कारण असले तरी अनेक तज्ज्ञांच्या मते इतका मोठा प्रलय हा इतर अनेक घटनांचा परिपाक होता. अतिवृष्टी, अतिशय चुकीचे व्यवस्थापन, अनियोजित व अनिर्बंध शहरीकरण, गाफील प्रशासन अशा अनेक गोष्टी या आपत्तीनंतर प्रकाशात आल्या. खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या जंगलतोडीमुळे झालेली डोंगरांची झीज आणि तिथून वाहात आलेल्या गाळाने भरून गेलेल्या नदीनाल्यांची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता हे या पुरामागचे महत्त्वाचे कारण होते. झेलम नदीच्या खोऱ्यातील या आपत्तीच्या तीव्रतेत भर पडली त्यात नदीपर्यावरणात झालेला अनिर्बंध मानवी हस्तक्षेप कारणीभूत होता. जम्मू-काश्‍मीरमध्ये पुराचे अनुमान किंवा भाकीत करण्याची कोणतीही यंत्रणा आजही अस्तित्वात नाही. आपत्ती व्यवस्थापनाचे कुठलेही आराखडे तयार नाहीत. जे आहेत ते कालबाह्य झालेले आणि अपुरे आहेत. 

या प्रदेशात घेतलेल्या उपग्रह प्रतिमांवरून असे लक्षात येते, की इथल्या जवळजवळ साठ टक्के पाणथळ प्रदेशांवर (Wetlands), जलप्रणालीवर आणि जलाशयांवर माणसाचे अतिक्रमण झाले आहे. मोठी सरोवरे आक्रसली आहेत. अनेक जलाशयांची जलधारण क्षमता झपाट्याने कमी झाली आहे. 

वर्ष २०१५ मध्ये अतिवृष्टीमुळे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आलेल्या महापुरामुळे आसाममध्ये हाहाकार माजला होता. १५ जिल्ह्यांतील ७०० खेडी उद्‌ध्वस्त झाली आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. ब्रह्मपुत्रेतील पुराचे पाणी ९ मीटर या धोक्‍याच्या पातळीच्याही वर गेले होते. राजधानी गुवाहाटीचा ७० टक्के भाग जलमय झाला. ब्रह्मपुत्रेच्या सादिया ते धुब्री या ९०० किमी लांबीच्या मार्गात पाण्याची पातळी  धोक्‍याच्या पातळीच्या वर गेली होती. आजूबाजूच्या बुरी - दिहांग, डीकोह, दिसंग, धनसिरी, जिया भराली, पुटीमारी, पग्लादिया, बेकी आणि कुशियारा यासारख्या उपनद्यांच्या खोऱ्यांत पुराचा जोर होता. १९५४ पासूनच ठराविक अंतराने ब्रह्मपुत्रेला आसाममध्ये विध्वंसक पूर येत आहेत आणि पुराची तीव्रता दरवर्षी वाढतेच आहे. धोक्‍याच्या पातळीच्या वर आलेले पुराचे पाणी दोन दोन महिने टिकून राहण्याची वृत्तीही वाढतेच आहे. गेल्या काही वर्षांत या पुरांमुळे नदीचे पात्र ५ मीटरनी रुंदावले आहे. गुवाहाटीपाशी ते केवळ दीड किमी रुंद असल्यामुळे इथे पुराचा धोका नेहमीच जास्त असतो. पुराचे पाणी ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरावर आठ ते दहा किमी दूरवर पसरते व दरवर्षी २५० ते ३०० गावे पूरग्रस्त होतातच. 

यावर्षी आठ ऑगस्ट २०१८ च्या संध्याकाळपासून सुरुवात झालेल्या पावसाने केरळ राज्यांत वेगाने उग्ररूप धारण केले. त्यानंतरच्या चोवीस तासांत राज्यांत मुसळधार पाऊस झाला. सगळी धरणे काठोकाठ भरली. भरून वाहणाऱ्या धरणातले पाणी सोडावेच लागले  आणि सखल भागांत पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली. पाण्याच्या लोंढ्याबरोबर बरीचशी बेकायदा बांधकामे आणि झोपड्या वाहून गेल्या. सह्याद्रीच्या डोंगराळ भागांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन सुरू झाले आणि सगळीकडे हाहाकार मजला. वर्ष १९२४ मध्ये, म्हणजे ९४ वर्षांपूर्वी सतत तीन दिवस पडलेल्या ३३३८ मिमी पावसानंतर असाच महाविध्वंसक पूर केरळमध्ये आला होता. त्या पुरात करिंथिरी मलाई नावाचा अख्खा डोंगरच पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेला होता. 

सामान्यपणे केरळमध्ये सरासरी १६०० मिमी पाऊस पडतो. यावर्षी १ जून ते १५ ऑगस्ट या काळात २०८८ मिमी इतका पाऊस इथे बरसला. बेसुमार वृक्षतोड, बेकायदा दगडखाणी, नदीपात्रातील आणि डोंगरउतारावरील बांधकामे अशा अनिर्बंध, अनियंत्रित गोष्टींनी ग्रासलेला देवभूमीचा निसर्ग इतक्‍या प्रचंड पावसांत टिकाव तरी कसा धरणार होता? 

यावर्षी केरळात आलेल्या प्रलयकारी पुरात ३६० पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि सात लाखापेक्षा जास्त लोक बेघर झाले. राज्यातल्या ४२ पैकी ३५ धरणांचे दरवाजे पुन्हा उघडावे लागले. इडुक्की धरणाचे चेरुथोनीजवळचे दरवाजे १९९२ नंतर २६ वर्षांनी उघडले. धरणातले पाणी सोडल्यामुळे इडुक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यातून जाणाऱ्या पेरियार नदीला प्रचंड मोठा पूर आला. नदीत दर सेकंदाला सात लाख लिटर इतक्‍या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला. कन्नूर, वायनाड, कोझीकोड, मल्लापुरम आणि इडुक्की या जिल्ह्यांना या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला. या पुराने निर्दयपणे केरळातील मोठ्या भागातले सगळे जनजीवनच विस्कळित करून टाकले. 

यावर्षी केरळमध्ये आलेल्या किंवा त्यापूर्वीच्या वर सांगितलेल्या पूरपरिस्थितीत एवढा मोठा प्रदेश जलमय व्हावा अशी स्थिती केवळ अतिवृष्टीमुळे निर्माण झाली असे मात्र म्हणता येत नाही. केरळच्या पश्‍चिम घाटातील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चालू असलेले खाणकाम आणि बांधकामे यामुळे या संकटाची तीव्रता शतपटींनी वाढली. सह्याद्रीत किंवा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा, त्यांच्या नदीपात्रांचा आणि नदी खोऱ्यांचा अभ्यास असे दाखवतो, की नदी पर्यावरणात होणारा अनिर्बंध मानवी हस्तक्षेप हेच या संकटामागचे मुख्य कारण आहे. नद्यांच्या वरच्या टप्प्यातील भागात सध्या सर्वत्र चालू असलेली जंगलतोड या समस्येचे महत्त्वाचे कारण असल्याचे लक्षात येते. सामान्यपणे असे दिसून येते, की मॉन्सूनच्या सुरुवातीच्या दिवसात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ६० टक्के पाऊस नदी खोऱ्यातील वरच्या भागातले जंगल अडवू शकते. मात्र जंगल कमी झाले तर ८५ ते ९० टक्के पाणी कोणत्याही अडथळ्याविना डोंगर उतारावरून जमिनीची झीज करीत नदीपात्राकडे वेगाने वाहत जाते. नदीपात्राचा उतार कमी झाल्यावर हे पाणी सहजपणे आजूबाजूच्या प्रदेशात पसरते. नदी खोऱ्यातील मानवनिर्मित बांधकामी आणि संरचना यामुळे पाण्याचा निचरा सहजगत्या होऊ शकत नाही. शहरांच्या आणि आजूबाजूच्या भागाच्या बेलगाम शहरीकरणामुळे नदीपात्रात असंख्य प्रकारचे पदार्थ येऊन पडतात. पर्वतावरून आणि डोंगरावरून वाहत येणारा सर्व गाळ नदीपात्रात साठतो. पावसाळ्यात जेव्हा नदीने या गाळाचे सहज वहन करणे गरजेचे असते, तेव्हाच गाळाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे तिची वहनशक्ती कमी होते. त्यामुळे पात्र ओलांडून दोन्ही तीराच्या बाहेर पसरण्याची पाण्याची वृत्ती झपाट्याने वाढते. अचानक अतिवृष्टी झाली तर वाढलेल्या पाण्याला नदी पात्र जराही सामावून घेऊ शकत नाही. हे पाणी मग वाढत्या वेगाने नदीपात्रातून वाहत खालच्या टप्प्याकडे येते व तिथे पूरपरिस्थिती निर्माण होते. 

पश्‍चिम घाट ही जगातील एक अतिशय कठीण आणि कणखर अशी जुनी पर्वतशृंखला मानली जाते. हिमालय त्यामानाने नवीन व गाळाच्या खडकांनी बनलेला पर्वत आहे. लक्षावधी वर्षे आपले संतुलन टिकवून ठेवणाऱ्या या विलक्षण पर्वत शृंखला गेल्या काही दशकापासून फारच संवेदनशील बनल्या आहेत. बेलगाम जंगलतोड, बांधकामे, डोंगरउतारांचे सपाटीकरण, दगडांच्या खाणी.. या व अशा अनेक गोष्टींमुळे या दोन्ही पर्वतरांगांचे संतुलन वेगाने ढासळत असल्याचे भरपूर पुरावे आपल्या समोर या आधीही आले आहेत. हिमालयात आणि सह्याद्रीत अनेक नद्यांची खोरी आणि त्यात नद्या, उपनद्यांची जाळी आहेत. त्यांच्या काठाने खेडी आणि शहरे वसली आहेत. या वसाहतींच्या विकास प्रक्रियेत तिथल्या निसर्गात बेलगाम आणि अशास्त्रीय हस्तक्षेप झाल्यामुळे महापुराची संकटे सगळीकडेच वाढीस लागले आहेत. भारतातील अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. भारतातील बऱ्याच नद्यांत धरणे, बंधारे यामुळे गाळ संचयन वाढून नद्यांची पात्रे दिवसेंदिवस जास्तच उथळ झाली आहेत. अतिवृष्टीनंतर त्यात गाळाची आणखी भर पडून नद्यांना पूर येतात. अनेक मानवनिर्मित अडथळे आणि त्यामुळे पाणी झिरपण्यासाठी किंवा त्याचा निचरा होण्यासाठी कुठेही जागा नाही असे वास्तव आज अनेक ठिकाणी आढळून येते. नागरीकरणाच्या प्रक्रियेत निसर्गनियमांना डावलून केलेल्या तथाकथित नगरविकासाचा तो अर्थातच अटळ परिणाम आहे. 

अतिवृष्टीमुळे आलेल्या आकस्मिक पुरानंतर नदीपात्रात व खोऱ्यात बरेच पर्यावरणीय बदल व परिणाम होतात. विशाल नदीपात्रात  ठिकठिकाणी गाळाची बेटे तयार होतात. किनारे ढासळून नदीपात्रे रुंद होतात. नदीकिनारी असलेल्या वनस्पतींची हानी होते. आजूबाजूच्या शेतजमिनीवर भरड वाळूचे संचयन होऊन त्या नापिक बनतात. या समस्येच्या निराकरणासाठी पूर आपत्तीचा संपूर्ण शास्त्रीय अभ्यास अजूनही आवश्‍यक आहे. विशिष्ट प्रकारचे बंधारे, पूर प्रवाहांना वाट करून देणारे कृत्रिम मार्ग, नदी मार्गात कृत्रिम जलाशये, पूर मैदानांचे  विभागीकरण असे अनेक उपाय करणेही  गरजेचे आहे. शास्त्रशुद्ध नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी यातूनच या समस्येवर तोडगा काढता येईल. मात्र हे करीत असताना निसर्गाचे संतुलन ढासळणार नाही याची काळजी घेणेही तितकेच आवश्‍यक आहे. हिमालयात आणि सह्याद्रीतील वाढते आणि अनिर्बंध पर्यटन, पर्यटकांच्या सोयीसाठी केली गेलेली बांधकामे आणि त्यात झालेली निसर्गाची नासधूस यामुळेच रुद्रप्रयाग, जम्मू-काश्‍मीर, आसाम आणि केरळ या सगळ्याच ठिकाणी आलेल्या पुराचे संकट अधिक संहारक व विध्वंसक ठरले, यात शंका नाही. हे टाळण्यासाठी पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा सगळीकडेच कठोरपणे राबविणेही अपरिहार्य आहे यात दुमत नसावे. निसर्गाची कोणत्याही प्रकारची अवहेलना भविष्यात आपल्याला खूप किंमत मोजायला लावू शकते हे नक्की.

फोटो फीचर

संबंधित बातम्या