मोदी युगाचा उदय

प्रकाश पवार
सोमवार, 3 जून 2019

भाष्य
 

सोळावी लोकसभा निवडणूक भाजपने बहुमतासाठी लढवली होती. त्यांना त्या आघाडीवर यश आले होते. भाजपच्या राजकारणाचा तो आरंभीचा टप्पा होता. त्यानंतर भाजपने गेल्या पाच वर्षांत नवभारत संकल्पनेची पायाभरणी केली. हा भाजपच्या राजकारणाचा दुसरा टप्पा होता. यानंतर तिसरा टप्पा निवडणूक काळात सुरू झाला. भाजपने सतरावी लोकसभा निवडणूक ही केवळ बहुमत मिळविण्यासाठी लढवली नाही, तर राजकीय वर्चस्वासाठी लढवली. मतमोजणीनंतर नरेंद्र मोदींनी वैचारिक वर्चस्वासाठीचे भाषण केले. त्यांनी वैचारिक प्रभुत्वाची घोषणा केली. भाजपच्या निवडणूक निकालाचा हा अंतिम टप्पा ठरला. या अर्थाने नवभारताची ही दुसरी निवडणूक झाली. ‘नवभारत’ ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ही संकल्पना आकाराला आली. या नवभारताच्या संकल्पनेचे राजकारण म्हणजे सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल होय. सर्वांत मोठा भाजप (एनडीए आघाडीचे सरकार), बहुमत (भाजपला स्पष्ट बहुमत), राजकीय वर्चस्व (३०३ जागा जिंकणे) आणि सरतेशेवटी वैचारिक प्रभुत्व.. या निवडणुकीत भाजपचा असा चढता प्रवास झाला. या चार टप्प्यांतून भाजप पुढे गेला. सरतेशेवटी संसदीय नेता निवडीच्या वेळी भाजपने वैचारिक प्रभुत्वावर शिक्का मारला. 

बहुमताची चार सूत्रे 
सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, भाजपने दोन लोकसभा निवडणुकीत (२०१४-२०१९) स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपच्या बहुमताची चार सूत्रे नव्याने उदयास आली. एक - बहुमताचा शब्दशः अर्थ निम्म्याहून अधिक जागा जिंकणे असा होतो. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला सलग दोन वेळा बहुमत मिळाले. नरेंद्र मोदींनी हे बहुमत मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाची सलग दोन वेळा लाट दिसून आली. सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सतराव्या लोकसभा निवडणुकीत ही लाट जास्त शक्तिशाली होती. हा मुद्दा भाजपला बहुमताकडे घेऊन गेला. कारण २८२ वरून ३०३ जागांवर भाजप गेली. हे भाजपच्या बहुमताचे सूत्र सर्वसामान्य दिसते. थोडक्‍यात, कायदेमंडळात भाजपचे निम्म्याहून अधिक सभासद निवडून आले. हे बहुमत किंवा निर्विवाद बहुमताचे एक सूत्र भाजपने पार केले. दोन - दुसरे बहुमताचे सूत्र म्हणजे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. भाजप एकतीस टक्‍क्‍यांवरून ३८ टक्‍क्‍यांवर गेली. त्यामुळे बहुमताच्या संदर्भात भाजपने १९५२-१९८५ च्या काँग्रेस पक्षासारखी कामगिरी केली. बहुमताचा निकष म्हणून ही कामगिरी अत्यंत चांगली झाली. तीन - बहुमताला आधार उत्तर भारताप्रमाणे (१२३ जागा) पूर्व भारत (५४ जागा), पश्‍चिम भारत (७४ जागा) व दक्षिण भारत (२९ जागा) येथे मिळाल्या. (सोबत तक्ता आहे). दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यामध्ये त्यांची कामगिरी उज्वल झाली (२५ जागा). शिवाय केरळमध्ये मतांची टक्केवारी वाढली (१२ टक्के). त्यामुळे भाजपने अखिल भारतीय पक्ष अशी कामगिरी केली. त्यांचा समर्थक वर्ग अखिल भारतीय आहे, असेही दिसते. हे बहुमताचे भौगोलिक सर्वसमावेशकतेचे तत्त्व पुढे आले. चार - भाजपचा समर्थक वर्ग भाजपच्या बाहेर उदयास आला. कारण एकेकाळी स्वतःला ब्राह्मणेतर म्हणवून घेणारा समूह सध्या भाजपचे समर्थन करतो. हे चित्र महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये स्पष्ट दिसते. या निवडणुकीत भाजपला शिवसेना आणि अकाली दलाशिवाय चाळीस पक्षांचादेखील पाठिंबा मिळाला. त्यावरून भाजपचा समर्थक वर्ग वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि संघटनांमध्ये वाढलेला दिसतो. त्यामुळे भाजपच्या बहुमताला जनता, मतदार, विविध राजकीय पक्ष, विविध दबाव गट, हितसंबंधी गट, धार्मिक गट यांची संमती दिसते. गेल्या वेळी एनडीए आघाडीच्या ७१ जागा निवडून आल्या होत्या. यावेळी ५२ जागा निवडून आल्या. याचे एक कारण तमिळनाडूमध्ये ३५ जागा कमी झाल्या. पंजाबमध्ये अकाली दलाच्या दोन जागा कमी झाल्या. परंतु, सर्वसाधारणपणे भाजपचा थेट फायदा त्यांच्या मित्रपक्षांना झाला. या प्रक्रियेमुळे आणि बहुमताच्या चार सूत्रांमुळे सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय वर्चस्व दिसते. भाजपने राजकीय वर्चस्व निर्माण केले. याचे एक महत्त्वाचे कारण भाजप पक्ष संघटनेमध्ये दिसते. 

संघटनात्मक कामगिरी 
नरेंद्र मोदी - अमित शहांनी नवीन भाजप घडवला. त्यांनी भाजपची संघटनात्मक ताकद वाढवली. त्यांच्या ताकदीचे चार नवे गुणधर्म दिसून आले. एक - त्यांनी नवीन भाजप व नवभारत या दोन संकल्पनांचा मेळ घातला. यामध्ये त्यांनी नवभारतातील राजकीय संकल्पनांचे अर्थ मुळापासून बदलून घेतले. नवभारताशी संबंधित संकल्पनेवर खूप टीका झाली. त्या टीकेच्या प्रमाणाच्या दुप्पट-तिप्पट भाजपची ताकद वाढत गेली. काँग्रेस पक्षाने जम्मू-काश्‍मीरमध्ये काश्‍मिरियत, पंजाबमध्ये पंजाबीयत, बिहारमध्ये बिहारीयत, पश्‍चिम बंगालमध्ये बंगालीयत अशा संकल्पनांवर भर दिला होता. त्यांना या निवडणुकीत मतदारांनी नाकारले. या संकल्पनेशी सुसंगत अशी महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय मराठा’ ही संकल्पना वापरली गेली. मात्र त्यालादेखील प्रतिसाद मिळाला नाही. याउलट नेमस्त राष्ट्रभक्ती, हिंदू दहशतवाद या संकल्पना जनता नाकारते हे ‘नवभारत’ या संकल्पनेद्वारे लक्षात घेऊन भाजपने आक्रमक राष्ट्रवादी आणि आक्रमक हिंदुत्वास जनमान्यता आहे, अशी भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका किरकोळ मतभेद होऊन सरतेशेवटी जनतेने मान्य केली असे दिसते. दोन - भाजपला जवळपास तेरा राज्यांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजप हा पक्ष मतांच्या आधारेदेखील वर्चस्वशाली पक्ष झाला. तीन - भाजप सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्णपणे संघावर अवलंबून होता. सोळाव्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीमधून भाजपने पक्षसंघटना मजबूत केली. भाजपने जुन्या पक्ष संघटनेची केवळ डागडुजी केली नाही, तर जवळपास नवीन संघटना बांधणी केली. पेजप्रमुख, अर्धपेजप्रमुखपासून ते कोर टीमपर्यंत नवीन कार्यपद्धती विकसित केली. अर्थातच या आघाडीवर अमित शहांच्या जोडीला भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, अरुण सिंह, विनय सहस्रबुद्धे असे नेते होते. यापेक्षा विशेष म्हणजे, आयटी सेलचे अमित मालवीय व मीडिया सेलचे अनिल बलुनी यांनी भाजप संघटनेची पुनर्बांधणी केली. राम माधव, सुनील देवधर यांनीदेखील नवीन पद्धतीने भाजप उभी केली. त्यामुळे भाजपला पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा तीन भागांत उठावदार व वर्चस्वशाली यश मिळाले. चार - भाजपला जवळपास प्रत्येक भागात यश मिळाले. तसेच भाजपला सर्व वर्गांतून आणि जातींमधून मते मिळत गेली. भाजपने जात हा घटक दुर्लक्षित केला नाही. परंतु, त्यांनी जातीवरील लक्ष आक्रमक राष्ट्रवादाकडे वळवले. त्यामुळे जातलक्षी संघटन करण्याची पद्धती दुबळी झाली. भाजपने मध्यम शेतकरी, जाती आणि ओबीसी-दलित, मुस्लीम यांच्यातील अनुग्रहाचे राजकारण मोडून काढले. म्हणजेच भाजपने काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची पितृसत्ताकसंबंधांची साखळी तोडली. पितृसत्ताक संबंध म्हणजे घराणेशाही आणि गुलामगिरी आहे, असा सरळ घणाघाती हल्ला भाजपने केला. त्यामुळे राजकारणात जुने पितृसत्ताकसंबंध बाद ठरले. नवीन पितृसत्ताक संबंध उदयास आले. भाजप हा पितृसत्तेच्या शिखरस्थानी आला. त्यांच्या नियंत्रणाखाली भारतातील सर्व समाज गेला. या फेरबदलाला जनतेची सहमती मिळाली. यामुळे भाजप ही संघटना पुनर्बांधणी केलेली संघटना ठरली. विकास, हिंदुत्व, उग्र राष्ट्रवाद अशा नवीन गोष्टींचे रसायन भारतीयांच्या मनावर परिणाम करते. अल्पसंख्याकांची पक्षीय धरसोड आणि हिंदूंचे ऐक्‍य गोष्टींमुळे भाजपच्या संघटनेला ताकद मिळाली. त्यामुळे भाजप या पक्षाला वेगळे बहुमत मिळालेले नाही; तर त्यांचे वर्चस्व हिंदूंनी मान्य केले आहे. त्यामुळे भाजपने बहुमत व वर्चस्वानंतरची पुनर्जुळणी सुरू केली असे दिसते. 

वैचारिक प्रभुत्वाचे क्षेत्र 
सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने वैचारिक प्रभुत्वाचे क्षेत्र स्पष्टपणे घडवलेले दिसते. नरेंद्र मोदींनी एक राज्यकर्ता म्हणून ‘हेजेमनी’ (लोकमान्यता) हे संमतीचे क्षेत्र विकसित केले. राज्यकर्ता वर्ग शस्त्रबळाचा प्रभुत्वासाठी वापर करतो. नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादाची चर्चा शस्त्रबळाच्या संदर्भात केली. परंतु, त्यांचा दुसरा भर हा हिंदुत्व राष्ट्रवाद हे संमतीचे क्षेत्र घडविण्यावर होता. भाजपने हिंदुत्व राष्ट्रवादाचे वैचारिक क्षेत्रात प्रतिनिधित्व करणारे बुद्धिजीवी घडवले. भाजपमध्ये बुद्धिजीवी अभिजन उदयाला आले. त्यांनी हिंदुत्वाची एक व्यापक व सुसंगत विचारप्रणाली मांडत भाजपचे समर्थन केले. मोदींच्या भूमिकेचे, प्रचलित समाजाचे, हिंदू समाजव्यवस्थेचे समर्थन नवबुद्धिजीवी वर्गाने केले. एका अर्थाने हे समर्थन मोदींच्या सत्तेचे समर्थन होते. या गोष्टीस सर्व वर्गांतून प्रतिसाद मिळाला. भाजपने हिंदू समाजव्यवस्थेचे समर्थन केले. त्यामुळे भाजपला जनतेची संमती मिळाली. अशा प्रकारच्या वैचारिक समर्थनामुळे बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्‍न अशा आर्थिक अरिष्टातून भाजपला मार्ग काढता आला. हिंदुत्व विचाराने आर्थिक अरिष्ट जवळपास राजकीय आखाड्यातून बाहेर काढले. भारतामध्ये भांडवली समाजातदेखील भांडवलशाहीने पेचप्रसंग निर्माण केले होते. हिंदुत्व वैचारिक भूमिकेमुळे क्रोनी (वित्तीय) भांडवलशाहीदेखील तिच्या पेचप्रसंगावर मात करू शकली. त्यामुळे क्रोनी भांडवलशाही आणि हिंदुत्व वैचारिक प्रभुत्व यांचा समझोता झाला. त्यामुळे या दोन प्रकारच्या शक्तींमुळे निवडणुकीमध्ये भाजपला वैचारिक बळ मिळाले. भाजपखेरीज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिव संग्राम, केरळा काँग्रेस (थॉमस), भारतीय धर्म जनसेना, जनथिपथीया संरक्षण समिती यांनीदेखील हिंदुत्व या वैचारिक प्रभुत्वाचे समर्थन केले. त्यामुळे भाजपचे हिंदुत्व वैचारिक प्रभुत्वाचे क्षेत्र अखिल भारतीय पातळीवर सर्वमान्य म्हणून पुढे आले. भाजपच्या सत्ताधारी वर्गाने हिंदुत्व विचारप्रणाली वर्चस्वशाली विचारप्रणाली म्हणून भारतीय समाजात प्रस्थापित केली. मतदारांनी तीच विचारप्रणाली स्वीकारली. त्या विचारप्रणालीला मतदारांनी खरी म्हणून मान्यता दिली. मतदारांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंदुत्व विचारप्रणालीची चिकित्सा केली नाही. चिकित्सा केली तर ती हिंदुत्व विरोधी म्हणून राष्ट्रवाद विरोधी ठरली. त्यामुळे हिंदुत्व वैचारिक प्रभुत्वाचे क्षेत्र हे स्वतंत्र आणि स्वायत्त झाले होते. त्याचे सरतेशेवटी वर्णन नरेंद्र मोदी यांनी महाभारताची उपमा देऊन केले. नरेंद्र मोदींनी मतदारांना श्रीकृष्ण संबोधिले. म्हणजेच प्रत्येक मतदार हा स्वतःच श्रीकृष्णाइतका वैचारिक होता. श्रीकृष्णाची प्रचलित समाजव्यवस्थेतील धारणा नरेंद्र मोदींनी मतदारांमध्ये पाहिली. त्यांनी श्रीकृष्णाची समाजव्यवस्था आणि मतदारांचा निर्णय यांची सांगड उत्तर प्रदेश, बिहार येथे घातली. त्यामुळे त्यांना सप, बसपचे आणि बिहारमधील महाआघाडीची भूमिका बिगर-वैचारिक ठरवता आली. त्यासाठी मोदींनी ‘महामिलावट’ ही संकल्पना वापरली. तसेच त्यांनी भारताच्या प्रत्येक जिल्हातील हिंदू धार्मिक स्थळांचा आदर केला. त्यांच्या निवडणूक प्रचारात परिसरातील धार्मिक श्रद्धा त्यांनी निवडणूक प्रचाराशी जुळवून घेतल्या. शेवटच्या टप्प्यांमध्ये त्यांनी शक्तीउपासक पश्‍चिम बंगालला हिंदू वैचारिक प्रभुत्वाच्या आधारे तोंड दिले. त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये हिंसेचा प्रतिकार राम आणि कृष्ण या दोन हिंदू वैचारिक आयुधांच्या आधारे केला. भारतीय समाजात वैचारिक प्रभुत्वाचे क्षेत्र वि. दा. सावरकरांचे विचार हे एक आहे. हे नरेंद्र मोदींनी ओळखले आणि त्याप्रमाणे निवडणूक प्रचार केला. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ आणि प्रज्ञा सिंग ठाकूर यांना राजकारणामध्ये स्थान दिले. त्यामुळे सावरकरांचा हिंदू राजकीयीकरणाचा व हिंदू लष्करीकरणाचा विचार सहज समजला. म्हणजेच थोडक्‍यात, हिंदू या वैचारिक परंपरेच्या विविध गोष्टींचे एकत्रीकरण त्यांनी केले. त्यामुळे एकूण भारतीय राजकारण म्हणजे हिंदू वैचारिक प्रभुत्वाचे राजकारण, हे सूत्र सध्याच्या समाजात प्रचलित झाले. या प्रक्रियेला अल्पसंख्याकांनीदेखील काही ठिकाणी उघड, तर काही ठिकाणी मूक सहमती दिली. या हिंदू वैचारिक प्रभुत्वाच्या राजकारणाची जुळणी भाजपने केली. हेच राजकारण म्हणजे नवभारताचे राजकारण होय! याखेरीजचे राजकारण म्हणजे नवभारत विरोधी राजकारण होय. असे सूत्र सतराव्या लोकसभा निवडणुकीने पुढे आणले म्हणून सतरावी लोकसभा निवडणूक ही हिंदू वैचारिक प्रभुत्वाच्या क्षेत्राला संमती देणारी ठरली. ही कामगिरी अत्यंत अवघड, जटिल व गुंतागुंतीची होती. पण ती या निवडणुकीतून पुढे आली. 

जुन्या दोन युगांचा ऱ्हास 
सतराव्या लोकसभा निवडणूक निकालातून मोदी युगाचा उदय झाल्याचे दिसते. मोदी युगाची सुरुवात सोळाव्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. परंतु, तेव्हा मंडल आणि मंदिर या संमिश्र युगांचे अवशेष अस्तित्वात होते. सतराव्या लोकसभा निवडणुकीने मात्र सप, बसप व जनता दल या तीनही पक्षांचा सामाजिक आधार संपुष्टात आणला. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून ओबीसी राजकारण हद्दपार झाले. प्रादेशिक पक्षांच्या जागा कमी झाल्या. तसेच मंदिर हा मुद्दादेखील निवडणूक राजकारणातून बऱ्यापैकी बाहेर गेला. मंदिर चळवळीचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी निवडणूक लढविली नाही. त्यामुळे प्रतीक रूपातदेखील मंदिर चळवळ राजकारणाच्या प्रांतातून बाहेर होती. यामुळे मंडल राजकारणाबरोबरच मंदिर राजकारणाचादेखील ऱ्हास झाला. पन्नाशीच्या दशकात काँग्रेस हा पक्ष एक प्रभुत्वशाली पक्ष म्हणून उदयास आला होता. त्या पक्षाचादेखील पूर्ण ऱ्हास झालेला आहे. तसेच नव्वदीच्या दशकापासून पुढे आघाड्यांच्या राजकारणाचे युग अवतरले. त्या युगाचादेखील शेवट या निवडणुकीत झाला. या निवडणुकीने सरळसरळपणे मोदी युगाचा उदय घडवून आणला. हा सतराव्या लोकसभा निवडणुकीचा जनादेश आहे.  
 

संबंधित बातम्या