फायर अँड फ्युरी : एक वादळ

वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

भाष्य
जानेवारी महिन्याच्या सुरवातीला आलेल्या एका वादळाचा तडाखा  अमेरिकेला इतर वादळांपेक्षा जरा जास्तच बसला. हे वादळ म्हणजे मायकल वुल्फ या पत्रकाराने लिहिलेले पुस्तक - ‘फायर अँड फ्युरी - इनसाइड द ट्रम्प व्हाइट हाउस’ हे होय.

डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून राजकीय वादळे अमेरिकेला नवीन नाहीत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला एखादे नवीन वादळ येत असते. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला आलेल्या एका वादळाचा तडाखा मात्र अमेरिकेला इतर वादळांपेक्षा जरा जास्तच बसला. हे वादळ म्हणजे मायकल वुल्फ या पत्रकाराने लिहिलेले पुस्तक - ‘फायर अँड फ्युरी - इनसाइड द ट्रम्प व्हाइट हाउस’ हे होय. या पुस्तकात ट्रम्प सरकारच्या पहिल्या ८ ते १० महिन्यांतील घटनांचे वर्णन आहे. या पहिल्या काही महिन्यांत व्हाइट हाउसमध्ये नक्की काय घडले आणि त्या घटनांना व्हाइट हाउसमधील नक्की कोणत्या व्यक्ती जबाबदार होत्या याचे तपशीलवार विवेचन केलेले आहे. २४ जानेवारीच्या अमेरिकेच्या ‘एनबीसी न्यूज’वरील एका बातमीनुसार या पुस्तकाच्या त्यावेळपर्यंत १७ लाख प्रती खपल्या आहेत. एवढेच नव्हे, तर प्रकाशित झाल्यावर जवळजवळ पहिल्या आठवड्यातच हे पुस्तक ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या ‘बेस्ट सेलर लिस्ट’मध्ये झळकले. हा लेख लिहीतेवेळीही ‘न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर लिस्ट’च्या नॉन फिक्‍शन प्रकारामध्ये या पुस्तकाने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. 

या पुस्तकाची सुरवात ८ नोव्हेंबर २०१६ च्या निवडणुकीपासून होते. निवडणुकीच्या दिवशी ट्रम्प यांच्या गोटात काय काय घडले याचे तपशीलवार वर्णन त्यांनी केले आहे. त्यावेळी ट्रम्प यांचा मुक्काम न्यूयॉर्कमधील ‘ट्रम्प टॉवर’मध्ये होता. त्याच इमारतीत ट्रम्प यांच्या प्रचाराचे मुख्यालयही होते. ट्रम्प यांच्या पत्नी मिलानिया ट्रम्प या ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर रडल्या व ते अश्रू आनंदाचे नव्हते असेही लेखकाने म्हटले आहे. पुढे ट्रम्प आणि मिलानिया यांच्यातील संबंधांचेही वर्णन आहे. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलानिया एका बेडरुममध्ये झोपत नाहीत व एकमेकांना क्वचितच भेटतात असेही त्यांनी म्हटले आहे. पुढे व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प राहायला गेल्यावर मिलानिया ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमध्येच राहणे पसंत केले हे तर जगजाहीर आहेच. ट्रम्प आपल्या बायकोचा उल्लेख ‘ट्रोफी वाइफ’ असा करत असल्याचेही लेखकाने म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प आणि मिलानियामध्ये नक्की सर्वसाधारण नवरा बायकोचे संबंध नाहीत, असा निष्कर्ष लेखकाने काढला आहे. 

लेखक मायकल वुल्फ यांना व्हाइट हाउसमध्ये मुक्त फिरायची परवानगी होती. व्हाइट हाउसमधल्या अधिकाऱ्यांना व ट्रम्प यांनाही मायकल वुल्फ पुस्तक लिहिणार असल्याची कल्पना होती. परंतु ते पुस्तक ट्रम्प यांच्यावर टीका करणारे असेल याची मात्र कल्पना नव्हती. व्हाइट हाउसमधील अनेक अधिकाऱ्यांनी ट्रम्प सरकारच्या सुरवातीच्या काळात मायकल वुल्फ यांना खुल्या मुलाखती दिल्या. एवढेच नव्हे, तर ज्या गोष्टींची बाहेर वाच्यता करता येणार नाही अशाही अनेक गोष्टी त्यांनी वुल्फ यांना सांगितल्या. त्यातूनच व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन वेगवेगळे गट असल्याचे वुल्फ यांना स्पष्ट झाले. ट्रम्प यांची मुलगी इव्हांका व तिचा नवरा जॅरड यांचा एक ‘जारवांका’ गट तर ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव बॅनन यांचा दुसरा गट. त्याव्यतिरिक्त व्हाइट हाउसचे मुख्य अधिकारी रायन्स प्रिबस यांचाही तिसरा गट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण पुढे जॅरड आणि इव्हांका यांच्याविरुद्ध म्हणून स्टीव बॅनन व प्रिबस एकत्र आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळेच अनेक गुप्त गोष्टी मीडियाला कळल्या असेही वुल्फ यांनी या पुस्तकात म्हटले आहे. एका गटाला दुसऱ्या गटाच्या कारवाईची बातमी कळताच ती बातमी प्रेसमध्ये फोडायची व्यवस्था केली जाई आणि त्यामुळे परिस्थिती अजून चिघळे व गटांतील भांडण विकोपाला जाई, असेही वुल्फ यांनी म्हटले आहे. 

लेखक मायकल वुल्फ यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या अनेक चमत्कारिक सवयींचेही वर्णन केले आहे. ट्रम्प यांना कुठल्याही गोष्टीत फारसा रसच नसतो असेही वुल्फ यांनी म्हटले आहे. एखाद्या प्रश्नाविषयी ट्रम्प यांना तीन वेगवेगळ्या लोकांनी आपली मते सांगितली तर त्यातील शेवटच्या माणसाचे मत ते मानत असत असे वुल्फ यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर अध्यक्ष ट्रम्प हा आपला अधिकाधिक वेळ टीव्हीवरील बातम्या बघण्यात घालवत असत असेही वुल्फ यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांची सचिव होप हिक्‍स हिला वर्तमानपत्रातून ट्रम्प यांच्याविषयी छापून आलेल्या, ट्रम्प यांची स्तुती करणाऱ्या बातम्या शोधून काढायचे कायम काम असे. त्यांना आपली स्तुती वाचण्यातच रस असे. संध्याकाळी साडे सहाच्या आसपास ट्रम्प जेवण करीत व आपल्या बेडरुममध्ये जात. मग त्यानंतरचे पुढचे दोन एक तास ते आपल्या कोट्यधीश मित्रांशी फोनवरून गप्पा मारण्यात घालवत. त्यात न्यूज कॉर्पोरेशन, फॉक्‍स चॅनेल व इतर कित्येक मीडिया नेटवर्कचे मालक रुपर्ट मरडॉक, कोट्यधीश टॉम बराक, फॉक्‍स न्यूज चॅनेलचे माजी अध्यक्ष रॉजर आइल्स इत्यादी मंडळींचा समावेश आहे. या मित्रांना ट्रम्प व्हाइट हाउसमधील कित्येक गुप्त गोष्टी सांगत व व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्यांना काहीच कसे कळत नाही व ते मूर्खच कसे आहेत असेही सांगत. म्हणजेच स्वतःच्याच सरकारविषयीच्या वाईट गोष्टी ट्रम्प यांच्या मूर्खपणामुळेच मीडियाला कळल्या असेही वुल्फ यांनी या पुस्तकात म्हटले आहे. 

पुस्तकाच्या शेवटी तर वुल्फ यांनी एक वादग्रस्त विधानही केले आहे. भारतीय वंशाच्या निकी हेली (माहेरचे आडनाव रंधवा) या ट्रम्प सरकारमधील संयुक्त राष्ट्रांच्या अमेरिकन प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांना ट्रम्प सरकारमधील ‘सर्वांत प्रभावशाली स्त्री’ म्हटले जाते. निकी हेली या ट्रम्प यांच्याबरोबर अनेक वेळा एकांतात असतात असेही त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर या पुस्तकाविषयी एका टीव्ही शोमध्ये बोलताना ट्रम्प यांचे एका व्यक्तीशी शारीरिक संबंध असून त्याविषयी आपण पुस्तकाच्या शेवटी विधान केले आहे असेही त्यांनी म्हटले. निकी हेली यांचा ट्रम्प सरकारमधील प्रभाव वाढण्यासाठी हा एकांतच कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सर्वांवरही मीडियामध्ये गदारोळ झाला आहे. वुल्फ यांनी अशा प्रकारचे आरोप करणे सयुक्तिक आहे का यावरही चर्चा झाली आहे. खुद्द निकी हेली यांनी या आरोपाचे जोरदार खंडन केले आहे. 

या पुस्तकातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेचा अध्यक्ष बनण्यासाठी जी मानसिक क्षमता आवश्‍यक आहे ती नाही हा आहे. ट्रम्प यांच्याकडे अनेक लोकांची मते ऐकून घेऊन त्यावर विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमताच नाही, असे वुल्फ यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांच्या आजूबाजूचे सर्वच अधिकारी यांना ते माहीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीही ट्रम्प यांना अक्कल नाही असे मानूनच चालतात असेही त्यांनी म्हटले आहे. एखाद्या लहान मुलाची समजूत जशी काढली जाते त्याप्रमाणे दिवसभर हे अधिकारी ट्रम्प यांना विविध गोष्टी समजावून देण्याचा प्रयत्न करत असतात असे वुल्फ यांनी म्हटले आहे. मग असे असूनही रिपब्लिकन पक्ष या अध्यक्षाला पाठिंबा का देतो? त्यासाठी आपल्याला अमेरिकन राजकीय व्यवस्था समजून घेणे आवश्‍यक आहे. भारतीय संसदीय व्यवस्थेत ज्या पक्षाचा निवडणुकीत विजय होईल तो पक्ष आपला नेता निवडतो व त्या नेत्याला पंतप्रधान बनवण्यात येते. गरज आल्यास बहुमतातील पक्ष आपला नेता बदलूही शकतो. परंतु अमेरिकन व्यवस्था मात्र यापेक्षा अधिक व्यक्तीवर आधारित आहे. अमेरिकेतील व्यवस्थेत मात्र ट्रम्प आणि हिलरी क्‍लिंटन या दोन व्यक्ती निवडणुकीला उभ्या राहिल्या व त्यातील ट्रम्प यांचा विजय झाला. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला ट्रम्पला अध्यक्ष पदावरून काढून टाकणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी इंपिचमेंट प्रक्रिया सुरू करावी लागेल. त्याला कैक महिने वेळही लागेल. अमेरिकेत कायदे बनवण्याची जबाबदारी अमेरिकन काँग्रेसला (संसदेला) देण्यात आली आहे. संसदेचे सभासद (खासदार) स्वतः विधायक लिहितात व ते संसदेत संमत झाल्यास अध्यक्षांनी त्याच्यावर सही केली, की त्याचे कायद्यात रूपांतर होते. खुद्द अध्यक्षांना कायदे बनवण्याचे अधिकार नाहीत. अध्यक्ष त्यांना न आवडणाऱ्या कायद्यावर सही करायला नकार देऊ शकतात. त्यामुळे संसदेला विधेयक संमत करण्याआधी अध्यक्षांची पसंती लक्षात घेणे आवश्‍यक असते. ट्रम्प आपण बनवू त्या विधेयकावर सही करतील असा रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांना विश्‍वास आहे. त्यामुळे ट्रम्प सत्तेवर राहणे त्यांच्या फायद्याचे आहे असे त्यांना वाटत आहे. म्हणूनच संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमतात असलेला रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांना सत्तेवर खाली खेचायला तयार नाही.  

त्याव्यतिरिक्त मायकल वुल्फ यांच्या या पुस्तकातील किती गोष्टी नक्की खऱ्या आहेत हे आणि किती गोष्टी या वुल्फ यांच्या कल्पनाशक्तीचा विलास आहे यावरही अमेरिकन मीडियामध्ये एकमत नाही. अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांच्या मते, मायकल वुल्फ यांनी या पूर्वी अनेक गोष्टी कल्पून लिहिल्या आहेत. २००४ मध्ये मायकल वुल्फ यांच्यावर न्यू रिपब्लिक वृत्तपत्रात एक लेख छापून आला होता. त्या लेखानुसार मायकल वुल्फ यांच्या लिखाणातील अनेक गोष्टी या संपूर्णपणे कल्पिलेल्या असतात असे म्हटले आहे. तसेच मायकल वुल्फ अनेक वेळा त्यांना अनेक मोठ्या व्यक्ती खासगी गोष्टी सांगतात असा देखावा करतात. परंतु त्या मोठ्या व्यक्तींनी या गोष्टी मायकल वुल्फ यांना सांगितलेल्याच नसतात असेही या लेखात म्हटले आहे. तसेच १९८८ मध्ये ब्रॅड प्लमर यांनी मायकल वुल्फ यांच्या ‘बर्न रेट’ नावाच्या पुस्तकावरील लेखात अशाच प्रकारचे विधान केले आहे. मायकल वुल्फ यांनी ज्या लोकांची विधाने या पुस्तकात छापली आहेत त्यातील अनेक विधाने मायकल वुल्फ यांनी बदलली आहेत, असे ब्रॅड प्लमर यांनी म्हटले आहे. दरम्यान मायकल वुल्फ यांनी ‘फायर आणि फ्युरी’मधील अनेक गोष्टींचा आपल्याकडे पुरावा असल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे या मुलाखतींची ध्वनिमुद्रणे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अर्थात मायकल वुल्फ यांच्या पुस्तकातील काही गोष्टी आधीच जगजाहीर झाल्या असल्याने, त्या पुस्तकातील काही गोष्टी खऱ्या आहेत याविषयी मला अजिबात शंका नाही. सर्वच गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे सांगणे अवघड आहे. 

ट्रम्प यांनी हे पुस्तक बाहेर आल्यावर नेहमीप्रमाणेच गोंधळ उडवणारी विधाने केली आहेत. ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी सॅराह सॅंडर्स यांनी हे पुस्तक एक टॅब्लॉईड असून त्यातील घटना या संपूर्णपणे काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. परंतु ट्रम्प यांनी मात्र या पुस्तकात स्टीव्ह बॅनन यांनी केलेल्या विधानांबद्दल त्यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. म्हणजेच ट्रम्प यांनी या पुस्तकातील स्टीव बॅनन यांच्या तोंडची विधाने खरी वाटत असल्याचा एक प्रकारे निर्वाळाच दिला आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या