लुप्त झालेले भूवारसा स्थळ 

डॉ . श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 18 जानेवारी 2021

भूवारसा पर्यटन

वायव्य भारतात अतिप्राचीन काळात लुप्त झालेली सरस्वती नदी हा प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा भूवारसा आहे. सरस्वती नदीचे अस्तित्व हे संशोधकांसाठी आजही मोठे आव्हान आहे. तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजवर अनेक देशी आणि विदेशी संशोधकांनी भरपूर प्रयत्न केलेत. 

ख्रिस्तपूर्व १२०० ते १५०० वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदातही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. वायव्य भारतात, पूर्वेकडील यमुना आणि पश्चिमेकडील सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान दहा ते सतरा हजार वर्षांपूर्वी  सरस्वती नदी होती असा उल्लेख त्यात दिसतो. ‘वाळवंटात कोरडी पडलेली नदी’ असा महाभारतात तिचा उल्लेख आहे. ही नदी बीन्सना (सध्याचे सिरसार) या गावापाशी लुप्त झाली आणि पुढे छामासोदभेडा या गावापाशी पुन्हा दिसू लागली असाही उल्लेख महाभारतात आढळतो.  

आज भूरूपशास्त्रीय व भूगर्भशास्त्रीय नकाशे आणि कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांच्या अभ्यासातून असे  लक्षात आले आहे, की वायव्य भारतातील घग्गर हाकरा नदीमधला कोरडा पडलेला नदीमार्ग म्हणजे प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे. कांस्य युगात (Bronze age) म्हणजे ख्रिस्तपूर्व १२०० ते ३३०० या काळात घग्गर हाकरा नदी खोऱ्यात संपन्न हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. आजचे संशोधन असेही सांगते की प्राचीन सरस्वती नदीची लांबी १५०० किमी, रुंदी ३ ते १५ किमी आणि सरासरी खोली ५ मीटर असावी. एका मताप्रमाणे चार हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेल्या भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींमुळे नदीला पाणी पुरवणाऱ्या मूळ स्रोतात स्थानबदल झाले असावेत आणि त्यामुळे नदीचा उर्वरित मार्ग भूमिगत झाला असावा. नदीला पाणी पुरवणारा मूळ स्रोत हिमालयातच असावा. घग्गर आणि तिच्या हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील असंख्य उपनद्या सरस्वती नदीचे अस्तित्व अधोरेखित करतात असाही दावा केला जातो.      

वर्ष २०१६ मध्ये हरयाणातील यमुनानगरमध्ये भूगर्भात असलेल्या पाण्याच्या नदीसदृश प्रवाहाचे काही पुरावे सापडल्यानंतर लुप्त झालेल्या या नदीच्या पुनर्शोधाचा विचार सुरू झाला. अलीकडेच जैसलमेरमध्ये  खोदण्यात आलेल्या कूप नलिकांतही मोठ्या प्रमाणावर, हजारो वर्षे जुने भूजल सापडले आहे. या वाळवंटी भागात पाण्याचा कितीही उपसा केला तरी ते कमी होत नाही असे दिसून आले आहे.                         

भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे हरयाणातील यमुनानगर जिल्ह्यातील आदी बद्रीपासून राजस्थानच्या कच्छ जिल्ह्यातील खिरसरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आले असून घग्गर नदीच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २००२ ते २००४ आणि २००९ ते २०१४ या काळात पुरातत्त्व विभागातर्फे हरयाणातील आदी बद्री, कुरुक्षेत्र, फतेहबाद, हिस्सार, राजस्थानातील गंगानगर, हनुमानगड, करणपुरा, गावी आणि गुजरातमधील खिरसारा व कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणाने उत्खनने केली गेली आणि त्यात सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात होती हे सिद्ध करणारे पुरावे आढळले आहेत. 

जैसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळले की रानाउ या जवळच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढेच नाही तर इथे खोदण्यात आलेल्या कूप नलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळते. बाकीच्या गावात मिळते तसे खारट पाणी इथे मिळत नाही. इथले गावकरी सांगतात की या गावाखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय!  

सरस्वतीचा उगम उत्तराखंडमधील बंदरपूंछ या गढवाल हिमालयातील शिवालिक पर्वतरांगांतील हिमनदीतून झाला असावा असे म्हटले जाते. ग्राउंड पेनिट्रेटींग रडारचा वापर करून घग्गर नदीपात्रातील लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्चित करण्याचा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. इस्रो (ISRO)च्या संशोधनानुसार सरस्वतीच्या प्राचीन प्रवाह रेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे. या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरींतील पाण्याच्या कार्बन डेटिंग पद्धतीने केलेल्या कालनिर्णयानुसार हे पाणी ८ ते १४ हजार वर्षे जुने असावे. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाह मार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचे आढळून आले आहे.  नदीकाठची गावे गेली ४० वर्षे या विहिरी वापरत असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही असे गावकरी सांगतात. 

उपग्रह प्रतिमांचा अभ्यास आणि प्रदेशाला दिलेल्या प्रत्यक्ष भेटी यावरून या भागातील सरस्वती नदीच्या परित्यक्त (Abandoned) प्रवाहाच्या अस्तित्वाचा अंदाज येऊ शकतो. रैनी आणि वहिंदा या नद्या  सरस्वती नदीत समाविष्ट होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात आणि त्यांनी नदीखोऱ्यात भरपूर गाळ संचयन केले असावे असेही या अभ्यासातून सूचित होत आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर राजस्थानातून वाहत सरस्वती नदी प्रवाह खंबातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावा. राजस्थानमध्ये प्रवाह कोरडा होऊन पुढे हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडच्या दिशेने जात असावा.

सरस्वती नदीचा नेमका मार्ग सापडणे कठीण झाल्यामुळे आणि तिच्या अस्तित्वाबद्दल अजूनही ठोस पुरावे न सापडल्यामुळे अनेकांना सरस्वती नदी ही एक कपोलकल्पित गोष्ट असावी असे अजूनही वाटते. मात्र प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. 

लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्याने घेतला जाणारा पुनर्शोध वायव्य भारतातील प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणाने आणण्यासाठी मोलाचे योगदान देणार आहे हे नक्की! आज लुप्त झालेला सरस्वती नदीचा मार्ग हे भारतातील एक महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून जगभरात ओळखले जाते.  

स्थान संदर्भ :

  • उगम स्थान - आदी बद्री (हरयाणा) ३०.४५० उत्तर अक्षांश/ ७७.३४० पूर्व रेखांश
  • समुद्रसपाटीपासून उगम स्थान उंची : ३६२ मीटर  
  • भूशास्त्रीय वय : १० ते १७ हजार वर्षे

संबंधित बातम्या