लक्षद्वीपची प्रवाळ बेटे    

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 15 मार्च 2021

भूवारसा पर्यटन

अरबी समुद्रात भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ४०० किमी दूर लक्षद्वीप द्वीपसमूह आहे. एका उथळ लगूनच्या आजूबाजूला असलेली सखल बेटांची ही एक साखळीच आहे. ही बेटे ३२ चौ. किमीच्या परिसरात विखुरलेली आहेत. लक्षद्वीप द्वीपसमूहातील सगळीच बेटे त्यांच्या विशिष्ट भूरूपिकीमुळे (Geomorphology), भूशास्त्रीय रचनेमुळे, जैवविविधतेमुळे आणि त्यांच्या विवक्षित भौगोलिक स्थानामुळे अद्वितीय अशी भूवारसा पर्यटन स्थळे झाली आहेत.  

लक्षद्वीप द्वीपसमूहात ११ बेटांवर माणसांची वस्ती आहे, १५ बेटांवर ती नाही. या बेटांच्या आजूबाजूचा समुद्रतळाचा अभ्यास असे दाखवतो, की इथे पाण्यात बुडालेल्या पाच प्रवाळ भित्ती (Coral reefs) आहेत. या प्रवाळ बेटात आढळून येणारी भरपूर विविधता ही केवळ अचंबित करणारी अशीच आहे. प्रत्येक बेट हे त्यावरील वनस्पती, अवसाद किंवा गाळ, प्रवाळ, मत्स्यजीवन, लगून्स या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक बेट देवदुर्लभ अशा सौंदर्याने परिपूर्ण आहे. शब्दांत वर्णनही करता येणार नाही इतके प्रत्येक बेटाचे निसर्गसौंदर्य विलक्षण आहे. प्रवाळ आणि केवळ प्रवाळ यांनीच तयार झालेली सदैव अस्थिर, अस्वस्थ आणि कल्पेनी बेटासारखी वीस वीस मीटर उंचीच्या माडाने झाकून गेलेली ही सागरी बेटे एक मोठा भूशास्त्रीय खजिनाच आहेत! त्यावरील पर्यावरण विलक्षण संवेदनशील असून भरपूर पाऊस पडत असूनही शुद्ध गोड्या पाण्याचा तुटवडा ही एक मोठी समस्या आहे.       

इथली सगळी बेटे कमी उंचीची, समुद्र सपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच आहेत. त्यावर डोंगर, पर्वत अशी भूरूपे नाहीत. काही बेटांवर वाळूच्या उंच टेकड्या आणि थोड्या उंचीवर पुळणी आहेत. या पुळणींवर तुटलेल्या प्रवाळांच्या भरड पदार्थांचे संचयन आढळून येते. पूर्वेकडून येणारी वादळे आणि मॉन्सूनमध्ये नैऋत्येकडून येणाऱ्या लाटा यामुळे या बेटांची मोठी नासधूस व झीज होते. त्यामुळे प्रवाळांचे लहान लहान तुकडे लगून्समध्ये पडून काही लगून्स गाळाने भरूनही जाऊ लागली आहेत. भरपूर जैवविविधता असलेली ही प्रवाळ बेटे विशेषतः सागरी पर्यावरणातील बदलांना खूपच संवेदनशील आहेत. सागर पातळीतील थोड्याशा बदलांनीही ती नष्ट होऊ शकतात.

मिनीकॉय, कल्पेनी, कदमत, किस्तन व चेटलत ही इथली कंकणाकृती प्रवाळ बेटे आहेत. बंगाराम बेटांचा समूह लगूनच्या मध्ये तयार झालाय. इथल्या सर्वच प्रवाळांच्या वाढीत समुद्र पातळीतील बदलानुसार अनेक बदल झाल्याचे दिसून आले आहे. प्रवाळ हे मूलतः उथळ पाण्यात वाढतात. त्यामुळे समुद्र पातळीतील थोड्याशा वाढीनेही ते नष्ट होतात. पंधरा हजार वर्षांपूर्वी या भागात समुद्र पातळी आजच्यापेक्षा १२० मीटरनी खाली होती. सात हजार वर्षांपूर्वी ती २० मीटर इतकीच खाली होती. समुद्र पातळी खाली जाण्याची किंवा वर येण्याची क्रिया या भागात खूपच संथ गतीने झाली असावी, नाहीतर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवाळ बेटे  तयार होऊ शकली नसती किंवा शिल्लक राहू शकली नसती. सध्याची प्रवाळ व प्रवाळ भित्तींची वाढ गेल्या ५०० वर्षांतच झाली. आता मात्र जागतिक हवामान बदलांमुळे समुद्र पातळी वाढत असून त्याचे परिणाम या निमित्ताने लक्षद्वीप बेटांवर वेगाने दृश्य रूप घेऊ लागलेत!

ही सागरी बेटे आज वाढत्या समुद्र पातळीच्या सावटाखाली आपले अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज अनेकांना या बेटांचा जो ऱ्हास चालू आहे आणि भविष्यात या बेटांना ज्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्याची फारच कमी माहिती आहे. समुद्र पातळीत एक मीटरनी होणारी वाढ या कमी उंचीच्या प्रवाळ बेटांना गिळंकृत करणार असल्याचे भाकीत अनेक सागरशास्त्रज्ञांनी व हवामान तज्ज्ञांनी यापूर्वीच केले आहे.  

लक्षद्वीप द्वीपसमूहातील पाराळी १ हे माणसाची वस्ती नसलेले प्रवाळ बेट (Coral island) समुद्राने गिळंकृत केल्याची बातमी, ही समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळे येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाची नांदी आहे असे म्हणायला हरकत नाही! लक्षद्वीप द्वीपसमूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटाचा (Atoll) भाग असलेले हे बेट नकाशावरून नाहीसे झाल्याची बातमी ७ सप्टेंबर २०१७ या दिवशी सर्वत्र पसरली आणि या व अशा अनेक द्वीपसमूहातील सखल बेटांच्या भवितव्याविषयी आता आपल्याला किती जागरूक राहायला हवे आहे त्याचाही अंदाज येऊ लागला.

एकोणीसशे अडुसष्टपर्यंत ०.०३२ चौ. किमी क्षेत्र असलेले हे बेट, त्यानंतर हळूहळू चारही बाजूंनी होणाऱ्या झिजेमुळे आता पाण्यात पूर्णपणे बुडाले आहे. त्याच्या आजूबाजूची आणखी चार बेटेही झपाट्याने बुडत असल्याचे संकेत मिळत आहेत! लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटे जैवविविधतेने समृद्ध आहेत, पण अजूनही ती आपल्याला पूर्णपणे कळलेली नाहीत. वाढत्या समुद्र पातळीमुळे होत असलेल्या किनाऱ्यांच्या झिजेमुळे ती वेगाने संकटग्रस्त होत आहेत. उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासातून ही बाब अगदी ठळकपणाने समोर येते आहे. 

पाराळी १ हे प्रवाळ बेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा १९६८ ते २००३ या काळातच दिसू लागल्या होत्या. जागतिक तापमान वृद्धीमुळे वाढणारी समुद्र पातळी हेच या घटनेमागचे एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटात पाराळी २, पाराळी ३, थिंनाकारा अशी आणखी तीन बेटे असून त्यांचीही झीज चालूच आहे. त्यामुळे लक्षद्वीप द्वीपसमूहात ३६ बेटे नसून ३१ बेटेच आहेत असे म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे. 

सागर पातळी वाढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर आपले काही नियंत्रण नाही हे खरे आहे. पण अशा बेटांवर खारफुटीची जंगले वाढवून भविष्यात होणाऱ्या समुद्राच्या आक्रमणाचा जोर कमी करता येईल. भारताचा हा महत्त्वाचा भूवारसा वाचविण्याचा सध्या हाच एक पर्याय आपल्या हाती आहे.

स्थान संदर्भ स्थान संदर्भ 

  • ९-१२ अंश उत्तर अक्षांश / ७२-७४ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची  : १-२  मीटर 
  • भूशास्त्रीय वय : १२ हजार वर्षे 
  • जवळचे  मोठे  ठिकाण : कोची (२८० किमी)  

संबंधित बातम्या