हरिहरेश्वरचा समुद्र कडा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 14 जून 2021

भूवारसा पर्यटन

स्थान सं महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले हरिहरेश्वर हे ठिकाण तिथे समुद्रकिनारी असलेल्या शिवमंदिरासाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. या देवळाला लागूनच हरिहर टेकडी आहे. तिच्या ६० मीटर उंचीच्या भूशिराच्या समुद्राकडील बाजूवर तयार झालेला पाच मीटर उंचीचा समुद्र कडा (Sea cliff), त्यावरील मधुकोष छिद्र (Honeycomb cavities) रचनेच्या जाळ्यामुळे कोकण किनाऱ्यावरील एक असामान्य असे भूवारसा पर्यटन स्थळ आहे. साडेसहा कोटी वर्षे जुन्या बेसॉल्ट खडकांत तयार झालेल्या मधमाशीच्या पोळ्यासारख्या या रचना भूशिराच्या (Headland) समुद्रवर्ती बाजूवर ठळकपणे दिसून येतात.

कोकण किनाऱ्यावर उत्तरेला बोर्डी डहाणूपासून दक्षिणेला वेंगुर्ल्यापर्यंत अनेक समुद्र कडे दिसतात. मात्र हरिहरेश्वर येथील कड्यावर दिसणाऱ्या या मधुकोष छिद्र रचना इतक्या ठळकपणे आणि मोठ्या प्रमाणावर इतर कुठेही दिसत नाहीत. वेळास, भरडखोल, नानवेल, आडगाव आणि दिघी या जवळपासच्या किनाऱ्यावरच्या सागर तट मंचावर आणि समुद्र कड्यावर मधुकोष छिद्र रचना दिसत असल्या, तरी त्या खूपच लहान आणि नगण्य आहेत.

मधुकोष छिद्रांचे किंवा पोकळ्यांचे हे जाळे सहा ते सात हजार वर्षे जुने असावे असे भूशास्त्रीय गणित सांगते. कोकणातील आजची किनारपट्टी सहा हजार वर्षे जुनी आहे. दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी कोकणातील समुद्राच्या पातळीत वाढ होऊ लागली होती. सुरुवातीला ही वाढ जलद गतीने आणि नंतर धिम्या गतीने होत होती. साधारणपणे तीन हजार वर्षांपूर्वीपर्यंत ही वाढ होतच होती. याच दरम्यान म्हणजे सहा हजार वर्षांपूर्वी आजची किनारपट्टी तयार झाली. मात्र तीन ते सहा हजार वर्षांच्या काळात समुद्र पातळीत अनेक वेळा घट झाली आणि पुन्हा थोडी वाढ झाली असल्याचे अनेक पुरावे आज या किनाऱ्यावर दिसतात.

हरिहरेश्वरच्या हरिहर टेकडीच्या पश्चिमेकडचा समुद्र कडा व त्यावरील मधुकोषांचे जाळे आजच्यापेक्षा नऊ ते दहा मीटर उंच असलेल्या समुद्र पातळीमुळे तयार झाले असावे असे लक्षात येते. त्यावेळच्या समुद्रलाटांच्या आघातामुळे अनेक वर्षे जे अपक्षरण (Erosion) झाले, त्याचाच परिपाक या पोकळ्या होत्या. कड्याच्या पायथ्याशी असलेल्या सागरी तट मंचावरही (Shore platform) अनेक ठिकाणी या मधुकोष छिद्र रचना आढळतात. त्या गेल्या सहा हजार वर्षांत तयार झाल्या आहेत. इथल्या बेसॉल्ट या ज्वालामुखीय खडकाचे गुणधर्म अशा तऱ्हेच्या विदारणासाठी पोषक असल्यामुळे कोकणच्या याच भागात या रचना तयार होऊ शकल्या. 

मधुकोष जाळ्यातील छिद्रांचा/पोकळ्यांचा आकार दोन ते पाच सेमी इतका असल्याचे दिसून येते. त्यांची खोली सात सेमीपर्यंत असल्याचेही दिसते. काही पोकळ्यांमध्ये शंखाचे लहान तुकडेही आढळतात. या पोकळ्या लाटांच्या फवाऱ्यामुळे (Spray) आणि लाटा फुटून खडकांचे भाग तुटल्यामुळे तयार झाल्या आहेत. हरिहर टेकडीच्या पश्चिम बाजूला खडकांत एक मोठी विभंग रेषा (Fracture) तयार झाली असून त्यातूनच काढलेल्या पायऱ्यांवरून खाली जाता येते. तिथूनसुद्धा या मधुकोष छिद्र रचना समुद्र कड्यावर दिसू शकतात. 

कड्याच्या पायथ्याशी असलेल्या सागर तट मंचाची सरासरी रुंदी ४० मीटर आहे. पूर्वीचा भूशिराचा तीव्र उताराचा कडा हळूहळू मागे सरकल्यामुळे हजारो वर्षांच्या कालखंडात हा मंच तयार झाला आहे. आज या मंचावर असंख्य वर्तुळाकृती उथळ खड्डे दिसतात. सुरुवातीला दगड धोंड्यांच्या घर्षणामुळे तयार झालेले हे खड्डे भरतीच्यावेळी पाण्याखाली बुडतात आणि त्यामुळे त्यांचे विदारण होते. याला पाण्याशी निगडित होणारे विदारण (Water layer weathering) असे म्हटले जाते. या मंचाची समुद्राकडची बाजू एक दीड मीटरने तुटल्यासारखी दिसते. याला ओहोटीचा लघु कडा (Low tide cliff) म्हणतात. 

ज्या कड्यावर मधुकोष पोकळ्यांचे जाळे आहे तो कडा सरासरी १० मीटर उंचीचा आहे. त्याच्या माथ्यावर एक अरुंद सपाट प्रदेश दिसतो, हा प्रदेश म्हणजे पूर्वीचा सागर तट मंच असावा आणि पूर्वी आजच्यापेक्षा नऊ मीटर उंचीवर असलेल्या सागर पातळीमुळे तो तयार झाला असावा असे दिसते. आजच्या समुद्र कड्यावर मधुकोष पोकळ्यांप्रमाणेच अनेक आघात छिद्रे (Notches), फटी, भेगा आणि अधःकर्तित भाग (Overhangs)सुद्धा दिसून येतात. 

टेकडीच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूवर, उच्चतम भरती मर्यादेच्याही वर जिथे लाटांचे पाणी फवारले जाते, तिथे मधुकोष छिद्रांची संख्या जास्त असून हा भाग सावित्री नदीच्या मुखाचा उत्तरेकडचा किनारा आहे. इथल्या सागर तट मंचाचा सरासरी उतार दोन अंशांपेक्षाही कमी आहे. त्यावर दगड धोंडे फार नाहीत, मात्र उथळ खळगे, रांजण खळगे आणि मधुकोष छिद्रे या मंचावरही दिसतात. भरतीच्यावेळी पाण्यात बुडण्याचा काळ, ओहोटीच्यावेळी उघडा पडण्याचा काळ, लाटांच्या आघाताचा जोर, क्षारांचे स्फटिकीकरण आणि रासायनिक क्रिया या सर्वांचा परिणाम होऊन हे मंच तयार झाले आहेत. त्यांची उत्क्रांती गेल्या सहा हजार वर्षांत झाली असून त्यानंतरच त्यांना सध्याचे सपाट स्वरूप प्राप्त झाले आहे. 

मधुकोष विदारण (Honeycomb weathering) हा विदारणाचा एक विशिष्ट प्रकार असून यात प्रामुख्याने पाण्याच्या आघातामुळे खडकांत छिद्रांची जाळी तयार होते. दोन जवळ जवळच्या छिद्रांच्या किंवा पोकळ्यांच्या दरम्यान ज्या खडकांच्या शिरा (Septa) शिल्लक राहतात त्यांची यात झीज होते आणि त्यांचा आकार वाढतो. असे मोठ्या पोकळ्या असलेले अनेक कोनाडे (Alcov) हरिहरेश्वरच्या या समुद्र कड्यावर अधःकर्तित स्वरूपात आढळून येतात. 

मधुकोष पोकळ्यांच्या जाळ्याने सगळा समुद्र कडा विदीर्ण करून टाकल्याचे एक विलक्षण आश्चर्यकारी दृश्य इथे पर्यटकांची नजर वेधून घेते. सहा हजार वर्षांपूर्वी नऊ ते दहा मीटर उंचीवर असलेल्या त्यावेळच्या समुद्र पातळीने तयार केलेले हे भूदृष्य कोकणच्या किनाऱ्यावर केवळ अपवादात्मक असल्यामुळे त्याचे भूशास्त्रीय महत्त्वही तितकेच मोठे आहे यात शंका नाही!

संदर्भ 

  • १८ अंश उत्तर अक्षांश/७३ अंश पूर्व रेखांश
  • समुद्र सपाटीपासून उंची : ५ मीटर 
  • भूशिराचे भूशास्त्रीय वय : ६.५ कोटी वर्षे
  • मधुकोष छिद्रांचे भूशास्त्रीय वय : ६००० वर्षे
  • जवळचे मोठे ठिकाण : श्रीवर्धन (२० किमी)

संबंधित बातम्या