सिंधू नदीचे लेह लडाख खोरे

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

भूवारसा पर्यटन

लडाख आणि झास्कर पर्वतरांगा व त्यांच्यामधून वाहणारी सिंधू नदी, झास्कर पर्वतरांगेच्या पायथ्याशी तयार झालेला गाळाचा लांबलचक पट्टा आणि नद्या व हिमनद्या यांच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या गाळाचे मोठ्या प्रमाणावर झालेले संचयन, ही सिंधू नदीच्या वरच्या ६० किमी लांबीच्या खोऱ्यातील लडाख भागाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

वायव्य - आग्नेय दिशेत २,५०० किमी अंतरात पसरलेला हिमालय हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत (Young fold mountain) आहे. साडेसोळा कोटी वर्षांपूर्वी पॅन्जिआ (Pangea) या विशाल भूखंडातून (Supercontinent) सुटून उत्तरेकडे प्रवास करू लागलेले भारतीय भूतबक (Tectonic plate) आणि युरेशियन भूतबक यांची टक्कर ४.५ कोटी वर्षांपूर्वी झाली. दोन्ही  भूतबकांच्या दरम्यान असलेला टीथीस हा अरुंद, चिंचोळा आणि लांबट समुद्र, त्यामुळे अाक्रसला आणि त्यातील भूकवचाचे खडक व गाळ दाबला गेला. दाबलेल्या गाळाची उंची वाढत जात असतानाच त्याचे उत्थापन (Uplifting) झाले आणि हिमालयाची निर्मिती झाली. ही प्रक्रिया दरवर्षी एक सेंटीमीटर या वेगाने या भागांत आजही चालू आहे. 

हिमालयातल्या सगळ्यात उंच आणि आतल्या भागाला टीथीस हिमालय असे म्हटले जाते. इथल्या गाळात लक्षावधी समुद्री जीव आणि वनस्पती निर्मितीच्या वेळी गाडल्या गेल्या. याच भागात त्यानंतर सिंधू नदी निर्माण झाली. सिंधू ही हिमालयातील सगळ्यात जुनी नदी आहे. 

लडाख आणि झास्कर पर्वतरांगा व त्यांच्यामधून वाहणारी सिंधू नदी, झास्कर पर्वतरांगेच्या पायथ्याशी तयार झालेला गाळाचा लांबलचक पट्टा आणि नद्या व हिमनद्या यांच्या कार्यामुळे निर्माण झालेल्या गाळाचे मोठ्या प्रमाणावर झालेले संचयन, ही सिंधू नदीच्या वरच्या ६० किमी लांबीच्या खोऱ्यातील लडाख भागाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

पश्चिम तिबेटमध्ये ४,२५५ मीटर उंचीवर सेंगे झाँगपोच्या नजीक, लेहच्या आग्नेयेला सिंधू नदीचा उगम होतो. उगमापासून २५० किमीनंतर ती लडाख राज्यात प्रवेश करते. नदीचे हे पात्र आणि तिथून ६० किमी अंतरापर्यंतचे तिचे पात्र म्हणजे नदीचा वरचा टप्पा (Upstream sector). लडाखमध्ये या नदीच्या उत्तरेला सहा हजार मीटर उंचीची लडाख पर्वतरांग आहे, तर नदीच्या दक्षिणेला झास्करची ७,७५६ मीटर उंच पर्वतरांग आहे. भारतीय आणि युरेशियन भूतबकाच्या धडकेनंतर निर्माण झालेले ग्रॅनाईट खडक लडाख पर्वतरांगेत, तर टीथीस समुद्रातील घट्ट झालेला गाळ झास्कर पर्वतरांगेत प्रामुख्याने दिसून येतो. लडाख पर्वतरांग हा काराकोरम पर्वतरांगेचा आग्नेयेकडील विस्तार आहे. काराकोरम खिंडीजवळ शोक नदीचा उगम असून शोक नदीचे पात्र आणि नुब्रा नदीचे पात्र मिळून नुब्रा खोरे तयार झाले आहे.    

इथले कोरडे हवामान, बर्फवृष्टी, मॉन्सूनमध्ये कधीतरी होणारी अतिवृष्टी यामुळे झीज, विदारण, भूस्खलन अशा घटना इथे नेहमीच चालू असतात. त्यामुळेच सिंधू नदीखोऱ्यात, उंचच उंच डोंगरकडे, पूरमैदाने, घळया, प्राचीन परित्यक्त सरोवरे (Abandoned paleolakes), वाळूने आच्छादलेले प्रदेश, वाळूच्या टेकड्या, वेदिका (Terraces), हिमगव्हरे (Cirques), इंग्रजी ‘यू’ आकाराच्या दऱ्या आणि हिमोढ (Moraines) असे भूरूपांचे नानाविध प्रकार दिसून येतात. 

लडाख हे भारतातील सर्वात उंच पठार आहे आणि त्यातील बहुतेक भाग तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहे. गेल्या २५ लाख वर्षांतली म्हणजे क्वाटरनरी या भूशास्त्रीय काळात निर्माण झालेली अनेक भूरूपे इथल्या अतिशय कमी पावसामुळे आजही चांगल्या स्थितीत शिल्लक असल्याचे दिसून येते. हिम आवरण प्रक्रियांचा (Glaciation) या प्रदेशावर मोठा परिणाम झाला असल्याचेही जागोजागी दिसून येते.

हिम आवरण आणि हिमनद्या यांच्या विलयनानंतर (Melting) त्यातून वाहत आलेल्या गाळाचे पर्वतांवर संचयन आणि पुनर्संचयन होऊन मोठमोठे गाळाचे पंख्यासारखे प्रदेश (Alluvial fans) तयार झाले आहेत. इथल्या सरोवरातील गाळाचे संचय हवामान बदलाची माहिती साठवून ठेवणारे महत्त्वाचे साठेच आहेत. इथल्या नदीपात्रात आणि डोंगरांच्या पायथ्याशी, उडत आलेल्या वाळूने तयार केलेल्या टेकड्याही दिसतात. लडाख प्रांत म्हणजे, अति उंचीवर भूपृष्ठाच्या सदैव हालचाली चालू असलेल्या भागात आणि कोरड्या हवामानात उत्क्रांत होणाऱ्या भूरूपांच्या अभ्यासासाठी एक आदर्श अशी प्रयोगशाळाच आहे!

 लडाखच्या अति उत्तरेला चान्गथांग प्रांतात हॅनले हे ४,३०० मीटर उंचीवर हजारभर वस्तीचे एक अतिशय सुंदर गाव आहे. जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेली भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळाही इथे आहे.

सिंधू नदीच्या डाव्या किनाऱ्यावर हॅनले याच नावाची एक उपनदी हिमाच्छादित झास्कर पर्वतरांगेत उगम पावून लोमा गावाजवळ सिंधू नदीला मिळते. या लहानशा नदीच्या खोऱ्यातही लोंबत्या दऱ्या (Hanging vallyes), हिमोढ आणि हिमानी सरोवरे अशी हिमप्रदेशात तयार होणारी भूरूपे दिसून येतात.

याच भागात चान्गथांग पठारावर ४,५२२ मीटर उंचीवर त्सोमोरीरी हे हिमसरोवर असून त्याची उत्तर दक्षिण लांबी २५ किमी व रुंदी ३ ते ५ किमी आहे. खारवट मचूळ पाण्याच्या या सरोवरातील पाण्याला एकही बहिर्गामी मार्ग (Outlet) नाही. आजूबाजूच्या डोंगरातील झऱ्यातून आणि वितळलेल्या बर्फातून सरोवराला पाण्याचा पुरवठा होतो.

पूर्वीच्या खूप मोठ्या सरोवराचा हा शिल्लक भाग असल्यामुळे त्याला ‘उर्वरित सरोवर’ (Remnant lake) म्हटले जाते. आजूबाजूच्या सहा हजार मीटर उंचीच्या पर्वतांनी सरोवर वेढले गेले आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला आणखी काही छोटी सरोवरे असून त्सो कार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

४,३५० मीटर उंचीवर असलेले १३४ किमी लांबीचे पॅनगाँग सरोवर हे या भागातले मोठे आणि महत्त्वाचे सरोवर. खाऱ्या पाण्याचे असूनही ते थंडीच्या दिवसांत पूर्णपणे गोठते.

सिंधू आणि झास्कर नद्यांचा संगम होतो ते निमू जवळच्या खोऱ्यातले ठिकाण, मनाली लेह रस्त्यावरील ४८०० मीटर उंचीवरचे लेह सरचू दरम्यान ४० किमी अंतरात असलेले सुंदर असे मोरे पठार, लेहपासून ३० किमी अंतरावरील लेह कारगिल रस्त्यावरील आणि सिंधू नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील चुंबकीय टेकडी, नुब्रा या ३०४८ मीटर उंचीवरील नदीखोऱ्यातून जाताना वाटेत लागणारी खारदुंग ला ही खिंड, सिंधू नदी खोऱ्याच्या उत्तरेला असलेली सियाचिन हिमनदी, द्रास जवळचा ज्वालामुखीय खडक, रेडिओ लॅरिअनसारख्या समुद्री जिवांचे जीवाश्म (Fossils) आणि लामायुरू येथील चंद्रभूमीचा आभास निर्माण करणारा प्राचीन सरोवरातील गाळ, अशी विलक्षण सुंदर आणि साडे चार ते पाच कोटी वर्षांपूर्वीचा भूवारसा असलेली अनेक ठिकाणे सिंधू नदीच्या लेह लडाख भागात आजही त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत.

संबंधित बातम्या