चंद्रपृष्ठाचा आभास घडविणारे ‘लामायुरू’ 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021


भूवारसा पर्यटन

हिमालयात पसरलेल्या लडाख प्रांतातील लेहपासून १२० किमी अंतरावर लामायुरू नावाचे गाव आहे. याची ओळख जगभरात मून लँड (चंद्रभूमी) अशी आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ३५१० मीटर म्हणजे साधारण ११ हजार फूट उंचीवर असून या ठिकाणची जागा चंद्रावरील जमिनीचा आभास निर्माण करणारी असल्याचे म्हटले जाते. येथे प्राचीन काळी मोठे सरोवर होते. या सरोवरातील मातीचा रंग पिवळा पांढरा असून चंद्रावरील जमिनीशी या मातीचे साम्य असल्यासारखे  दिसते. 

लामायुरू येथील सरोवर हे प्राचीन हिमानी सरोवर (Glacial lake) असून आज ते १०५ मीटर जाडीच्या, नदी आणि सरोवरातील गाळाने (fluvio-lacustrine deposits) भरून गेले आहे.  ३५ ते ४० हजार वर्षांपूर्वी हिमालयातील सिंधू नदी खोऱ्यात भूपृष्ठाच्या ज्या मोठ्या प्रमाणावर हालचाली घडल्या, त्यावेळी या सरोवराची निर्मिती झाली.  

हिमालयातील प्राचीन हिमानी सरोवरे, त्यांची निर्मिती, त्यांचा भूशास्त्रीय विकास आणि पर्यावरणीय तसेच पक्षी-प्राणी यांची समृद्धता याचा सगळा इतिहास या प्राचीन सरोवराने (Palaeolake) आजही जतन करून ठेवला आहे. यातील सरोवराशी निगडित गाळाच्या अनेक थरांत (lacustrine horizons) प्रामुख्याने नदी आणि सरोवरात असलेला चिखलयुक्त गाळ, वाळू, कार्बोनेटयुक्त माती आढळून येते. यापैकी नऊ थर विविध जीवावशेषांनी (Fossils) समृद्ध आहेत.

या थरांत दिसून येणाऱ्या गाळाचा आणि त्यातील जीवावशेषांचा अभ्यास असे सांगतो, की हे सरोवर त्याच्या सगळ्या जीवन काळात खूप उथळ असावे. त्याची क्षारताही अगदी नगण्य असावी आणि त्याला आजूबाजूच्या भागातून येऊन मिळणाऱ्या, संथ गतीने वाहणाऱ्या पाण्यात भरपूर वनस्पती असाव्यात.
पूर्वी या हिमानी सरोवराची रचना बंदिस्त नसावी आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी निर्गमित होण्याचाही मार्ग (Outflow) असावा. गेल्या तीन-चार हजार वर्षांत भूपृष्ठाच्या अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणात गाळ येऊन पडला असला, तरी सरोवराच्या तळावरील गाळ संचयन प्रक्रियेत अनेक अडथळे आले आणि सरोवराचे संतुलन बिघडले असे लक्षात येते. 

दोन कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या भारतीय भूतबकाच्या (Indian tectonic plate) उत्तरेकडील हालचालींमुळे कालांतराने हिमालयाच्या सर्व भूकवचाच्या भागांत मोठा ताणतणाव (Stress) जमून राहिला होता. तो २५ लाख वर्षांपूर्वीपासून हळूहळू विभंग रेषा (Faults), रेटा प्रदेश (Thrusts) आणि भूभ्रंश विभाग (Tectonic zones) या स्वरूपांत दृश्य होऊ लागला. पंधरा लाख वर्षांपूर्वी हिमालयाच्या, विशेषतः वायव्य आणि मध्य हिमालयाच्या भागांत भूकवचाचे उत्थापन (Uplifting) आणि खचणे (Subsidence) या घटना घडल्या. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन (Landslides) झाले. डोंगराळ भागांतील नद्यांची पात्रे गाळाने बंदिस्त झाली आणि नदीपात्रात प्रचंड मोठी सरोवरे तयार झाली. याच काळात पश्चिम लडाखमधल्या लामायुरू या सिंधू नदीच्या उपनदीत भूकवचाच्या उत्थापनानंतर गाळाचा बंधाऱ्यासारखा प्रचंड मोठा अडथळा निर्माण झाला आणि लामायुरू सरोवर तयार झाले. याच वेळी लेहजवळ सिंधू नदीमार्गात समुद्र सपाटीपासून ३०९० मीटर उंचीवर आणखी एक असाच गाळाचा अडथळा तयार झाला आणि पिटोक नावाचे ११ किमी लांब व ४ किमी रुंद सरोवर तयार झाले.

लामायुरू नदीजवळ पृथ्वीपृष्ठाच्या ज्या हालचाली झाल्या, त्याचे अनेक पुरावे आजही येथे आढळतात. लामायुरू गावाच्या पश्चिमेला दिसणारा तीव्र उताराचा धबधबा, नदी पात्रात दोन्ही किनाऱ्यांवर दिसणाऱ्या वेदिका (Terraces), लामायुरू नदीमार्गाला समांतर असणारी उथळ विभंग रेषा आणि नदीत निर्माण झालेली ६०० मीटर खोल आणि कर्तित (Entrenched) घळई ही भूरूपे अशाच हालचालींचा पुरावा आहे.

जेव्हा लामायुरू नदीत गाळाचा अडथळा निर्माण होऊन सरोवर तयार झाले तेव्हा नदीच्या आजूबाजूचा खडक फुटून, विदारीत होऊन जो गाळ तयार झाला तो सरोवरातील वरचा गाळ असल्याचे दिसून येते. गाळाच्या खालच्या मृदू थराला अनेक भेगा पडल्या. त्यात अनेक उंचसखल घड्याही पडल्या. लामयुरू सरोवरातील हा सगळा गाळ नदी आणि सरोवरातील चिखलयुक्त पाण्यात अडकलेला, जैविक स्वरूपाचा व जैविक क्रिया प्रक्रिया घडल्यामुळे तयार झालेला आहे. गेल्या हजारभर वर्षांत पुन्हा एकदा या भूभागाचे उत्थापन  झाले आणि आजूबाजूच्या डोंगरांत भूस्खलन झाले. त्यामुळे लामायुरूत मोठ्या प्रमाणावर गाळ येऊन पडला आणि त्याचा काही भाग फुटून पाणी बाहेर निघून गेले. पृथ्वीवरील ध्रुव प्रदेश वगळता हिमनद्यांनी व्याप्त असे सर्वात मोठे क्षेत्र केवळ हिमालयातच आहे. इथल्या हिमनद्यांची लांबीही जगातील इतर हिमनद्यांच्या लांबीपेक्षा जास्त आहे. इथल्या हिमक्षेत्राने सुमारे चाळीस हजार चौ.किमी एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. इथल्या हिमनद्या हवामान बदलाच्या उत्तम निर्देशक असल्याचे मानण्यात येते.

विशाल हिमालय आणि काराकोरम या दोन पर्वत रांगांत बऱ्याच हिमनद्या आहेत. काराकोरममध्ये सियाचिन (लांबी ७० किमी), बाल्टोरो (६० किमी), हिस्पार (६२ किमी), तर कुमाऊ हिमालयात गंगोत्री (२६ किमी), केदारनाथ (१९ किमी) या हिमनद्या आहेत.

वीस लाख वर्षांपूर्वी या भागात हिमयुग होते. त्यावेळी हिमनद्या खूप खालच्या भागापर्यंत आल्या असाव्यात. आज हिमालयात आढळणाऱ्या सर्व हिमनद्या या पूर्वीच्या हिमनद्यांचे अवशेष आहेत. अत्युच्च उंचीवरचे हिमोढ, हिमगव्हरे व प्राचीन हिमानी सरोवरे ही सर्व भूरूपे पूर्वीच्या हिमनद्यांचे अवशेष आहेत.

हिमालयातील हिमनद्या आज धोकादायक वेगाने क्षय पावत आहेत. त्यांच्या पृष्ठभागावर झपाट्याने निर्माण होत असलेली हिमसरोवरे हा त्याचाच परिपाक आहे. इथल्या हिमनद्यांवर हिम गाळाचे जाड आवरण तयार होत आहे. इथे तयार होत असलेली हिमोढ बंदिस्त सरोवरे खूपच अस्थिर व अस्थायी आहेत. ती वारंवार फुटतात आणि पूर परिस्थिती निर्माण होते (उदा. कुम्भू हिमालय). नाहन, सिमला, मसुरी, अल्मोडा आणि नैनिताल ही कुमाऊ हिमालयातील ठिकाणे भूमिपात प्रवण म्हणूनच ओळखली जातात. लामायुरू हे ठिकाणसुद्धा असेच एक विलक्षण भूवारसा असलेले अतिशय सुंदर असे प्राचीन हिमानी सरोवरच आहे!

स्थान संदर्भ 

  • ३४.२८ अंश उत्तर अक्षांश/७६.७७ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : ३५१० मीटर
  • भूशास्त्रीय वय : ३५-४० हजार वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण : लेह (१२० किमी)

संबंधित बातम्या