श्रीलंका : भूवारसा पर्यटनाचे बेट

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 13 डिसेंबर 2021

भूवारसा पर्यटन

श्रीलंका हे निसर्गाने सौंदर्याची मनसोक्त उधळण केलेले आणि माणसाच्या अमर्याद हस्तक्षेपापासून बऱ्याच अंशी मुक्त असलेले असे हिंदी महासागरातील एक मनस्वी बेट आहे! अतीव सुंदर अशा स्वच्छ पुळणी, उंचच उंच डोंगर, खोल नदीपात्रे, दूरवर पसरलेली भाताची खाचरे आणि घनदाट जंगले ही सगळीच या देशाची बलस्थाने आहेत. श्रीलंकेतील भूरूपांचा भूशास्त्रीय वारसा पाहता या बेटावर भूवारसा पर्यटन या  प्रकाराची खूप मोठी क्षमता (Potential) आहे असे भूशास्त्रीय अभ्यासाच्या निमित्ताने या देशाला दिलेल्या भेटीतून लक्षात आले. हा देश अनेक असामान्य, आकर्षक आणि विलक्षण सुंदर पण तितक्याच क्लिष्ट भूरूपांनी समृद्ध आहे. 

श्रीलंका देशाचा नव्वद टक्के भूप्रदेश सत्तावन्न कोटी वर्षे इतक्या जुन्या खडकांनी तयार झाला आहे. वीस कोटी वर्षांपूर्वी हे बेट गोंडवाना भूमी या महाखंडाचा भाग होता आणि तो भारताशी जोडलेला होता. गोंडवाना भूमीतील या खंडांचा प्रवास ईशान्येच्या दिशेने चालू होता. साडेचार कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूतबक (Tectonic Plate) यूरेशिया तबकाला धडकले आणि हिमालयाची निर्मिती होऊ लागली. त्यावेळी श्रीलंकेचा प्रदेश भारतीय तबकाच्या मध्यवर्ती भागात होता, त्यामुळे इथे भूकंप, ज्वालामुखी उद्रेक अशा घटना घडल्या नव्हत्या. पाच लाख वर्षांपूर्वी हे बेट समुद्र पातळी वाढल्यामुळे भारतापासून वेगळे  झाले. गेल्या अडीच लाख वर्षांत इथल्या किनारपट्टीवर अनेक वेळा समुद्रपातळीच्या खाली-वर अशा हालचाली झाल्या. श्रीलंकेच्या १,६०० किमी लांबीच्या किनारपट्टीवर गेल्या आठ ते दहा हजार वर्षांत झालेल्या बदलांमुळे किनारपट्ट्यांचा आकार आणि दंतुरपणा अनेक वेळा बदलला. आत्ताच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या उत्थापित पुळणी (Raiesd beaches), अश्मिभूत पुळणी (Fossil beaches), पुरले गेलेले (Buried) प्रवाळ आणि किनाऱ्यापासून खूप आत जमिनीच्या दिशेने  आढळणारे शंखशिंपले या सर्व गोष्टी सागर पातळीतील हालचालींचे पुरावेच आहेत. 

श्रीलंकेच्या सर्व बाजूंनी असलेले समुद्र किनारे एकमेकांपासून भिन्न असून प्रत्येकाने आपले स्वतःचे  वैविध्य जपून ठेवले आहे. पश्चिमेकडील हिक्कादुवा, बेंटोटा, मोरातुवा, कोलंबो, निगोम्बो या किनाऱ्यांवर वाळूचे दांडे, लगून, सरोवरे आणि दलदलींचे प्रदेश मोठ्या संख्येने दिसतात, तर उत्तरेकडील आणि ईशान्येकडील नीलवेल्ली, ट्रिंकोमाली किनाऱ्यावर भरड वाळू, चिखल याचे  प्राबल्य आढळून येते. हंबनटोटा, टांगाले, मटारा आणि गॉल इथल्या किनाऱ्यावर २,५०० ते ३,५०० वर्षे जुन्या अश्मिभूत पुळणी आहेत, त्या आत्ताच्या समुद्रपातळीपासून दोन ते तीन मीटर उंचीवर आहेत. अनेक पुळणींवर कमी उंचीच्या वाळूच्या टेकड्या आहेत, मात्र त्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायांतर्गत झालेल्या बांधकामामुळे पूर्णपणे बाधित झाल्या आहेत. 

श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वीस चौ.किमी परिसरात पसरलेल्या, निगोम्बी इथल्या दलदल प्रदेशाप्रमाणेच अनेक ठिकाणी विस्तृत दलदलींचे प्रदेश आढळून येतात. या दलदली साडेतीन ते पाच मीटर जाडीच्या गाळाने भरल्या आहेत. त्यात पूर्वीच्या उच्च समुद्रपातळीच्या काळात संचयित झालेल्या अनेक सागरी जिवांचे अवशेष आढळतात. पूर्व किनाऱ्यावरील ट्रिंकोमालीच्या परिसरात कनिया या गावाजवळ उष्ण पाण्याचे झरे आहेत. त्याभोवती सात कुंडे तयार करण्यात आली आहेत. श्रीलंकेचा भूमिप्रदेश अंतरंगातील आणि कवचावरील हालचालींच्या दृष्टीने जागृत किंवा अस्थिर नसला, तरी याच प्रदेशातून जाणाऱ्या अंतर्भूतबक (Intraplate) सीमेवर हे झरे असल्याचे सांगण्यात येते. ट्रिंकोमाली इथल्या कोनेश्वर मंदिर परिसरात क्वार्टझाइट या रूपांतरित गाळाच्या खडकांत कोरल्या गेलेल्या घळईत भयप्रद वाटावे असे प्रचंड मोठे कडे दिसून येतात. हबराना जवळच्या मिनेरिया राष्ट्रीय उद्यान परिसरात याच क्वार्टझाइट खडकांचे विदीर्ण रूप खोल भेगा, रंगीबेरंगी गारगोटीचे दगड, खडकांचे पापुद्रे अशा विलक्षण स्वरूपात आपल्या समोर येते. 

डम्बुला इथे असलेला जगप्रसिद्ध सिगिरिया खडक अडीज अब्ज वर्षे जुना आहे! तो ज्वालामुखीचा अवशिष्ट ठोकळ्यासारखा दिसणारा उंचवटा आहे. त्याच्या उघड्या पडलेल्या तीव्र उताराच्या भिंतींवर नीस या रूपांतरित खडकाचे एकाखाली एक असे तीन भाग स्पष्टपणे दिसून येतात. समुद्रसपाटीपासून ३७० मीटर उंचीवर असलेल्या या खडकाची उंची दोनशे मीटर आहे. याच्या खालच्या थरात अनेक नैसर्गिक गुहा आहेत. सिगिरिया खडकाच्या आजूबाजूच्या विस्तीर्ण सपाट प्रदेशात ग्रॅनाईट खडकाचे असंख्य तुकडे आजही विखुरलेले दिसतात. 

 श्रीलंकेच्या मध्यवर्ती भागातील डोंगराळ प्रदेशात कँडी, नुवारा एलीया आणि एला ही शहरे वसली असून अतिशय सुंदर अशा निसर्गसौंदर्याने हा प्रदेश नटला आहे. एलापासून सहा किमी अंतरावर असलेला ‘रावण धबधबा’ हा तर या सौंदर्याचा अगदी कळस आहे. क्वार्टझाइट, नीस अशा खडकातून प्रचंड उंचीवरून खाली कोसळणारा हा जलप्रपात, आजूबाजूच्या खडकांत दिसणारे प्रस्तरभंग, खोल नदी पात्र ही सगळी भूरूपे एला प्रांताची शक्तिस्थाने आहेत. दक्षिणेकडच्या बुंडाला राष्ट्रीय उद्यानाच्या टोकाला असलेल्या समुद्र किनाऱ्यावर सागरी लाटांनी झिजवून मागे हटवलेले क्वार्टझाइट आणि ग्रॅनाईट खडकातले समुद्रकडे हे एक अप्रतिम सागरशिल्प आहे. वीस मीटर उंचीच्या या कड्याच्या पायथ्याजवळच्या पुळणीवरील वाळू वाऱ्याबरोबर उंच वर उडत येऊन कड्याच्या माथ्यावर पसरते. त्यामुळे तयार झालेल्या वाळूच्या टेकड्या हे भूरूप तर आश्चर्य वाटावे असे निसर्गलेणेच! ही वाळू गेली हजारो वर्षे वर उडत आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

हिंदी महासागरात २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे श्रीलंकेतील अनेक किनारे अक्षरशः उद्‍ध्वस्त झाले. या आपत्तीचे पुरावे जागोजागी आजही अस्तित्वात आहेत. कोलंबोच्या दक्षिणेला ९५ किमी अंतरावर असलेल्या पेरालिया या गावांत किनाऱ्याजवळ त्सुनामीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारण्यात आले आहे. इथे किनाऱ्यापासून दोनशे मीटर अंतरावरून एक रेल्वे मार्ग जातो. २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामीने या रेल्वे मार्गावरून कोलंबोकडून गॉलकडे जाणाऱ्या रेल्वेतील १८०० प्रवाशांचा जीव घेतला. त्सुनामीग्रस्त झालेले रेल्वेचे डबे आजही त्या प्रसंगाची आठवण म्हणून तिथेच ठेवलेले आहेत!                  

श्रीलंकेतील या सगळ्या भूरूपांच्या निर्मितीमागचा इतिहास, त्याची प्राचीनता, अखंडता, सौंदर्य आणि त्यातील विविधता यांचा विचार करता, हे बेट म्हणजे भूवारसा स्थळांचा मोठा खजिनाच आहे हे लगेचच लक्षात येते. या देशानेही पर्यटन विकासाबरोबरच या ठिकाणांचे भूशास्त्रीय महत्त्व जतन करून ठेवण्याचे प्रयत्न चालू ठेवल्याचे दिसून येते. 

संबंधित बातम्या