चिल्का सरोवर

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

भूवारसा पर्यटन

ओडिशातील चिल्का सरोवर हे मचूळ पाण्याचे (Brackish Water) सरोवर पुरी, गंजम आणि खुर्द जिल्ह्यात दया नदीच्या मुखापाशी पसरलेले आहे. एकूण ११०० चौ.किमीमध्ये पसरलेले हे सरोवर भारतातील सर्वात मोठे सागरी खाजण किंवा सिंधुतडाग (Coastal Lagoon) आणि जगातील  सर्वांत मोठे मचूळ/खारवट पाण्याचे किनारी सरोवर आहे. या सरोवराला जागतिक वारसास्थळाचा आणि रामसर करार (Ramsar Convention) स्थळ म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे.

भार्गवी, लुना, ऋषीकुल्य, दया, मकरा, मालगुनी असे एकूण ५२ नदीप्रवाह चिल्का सरोवराला येऊन मिळतात. सरोवराचे पाणी पूर्वी अरखाकुडा गावापाशी समुद्राला जाऊन मिळत होते, पण तो मार्ग गाळ संचयनामुळे बंद झाला. त्यामुळे सिपकुडा या नवीन ठिकाणी मार्ग खोदण्यात आला. सरोवरात बडकुडा, कालिजाई, बर्ड आयलंड, सोमोलो, सनकुडा, नालाबाना, नुवापूर अशी अनेक बेटे आहेत. त्यापैकी काही बेटांवर वस्तीही आहे. ऋतूंनुसार या सरोवराचा विस्तार कमी जास्त होतो. याचा विस्तार पावसाळ्यात १,१६५ चौ.किमी. व उन्हाळ्यात ८९१ चौ.किमी. असतो. हे सरोवर सुमारे ७० किमी. लांब व १६ ते ३२ किमी. रुंद आहे. बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा दांडा निर्माण होऊन हे सरोवर तयार झाले आहे.

हा वाळूचा दांडा काही ठिकाणी २०० मी.पेक्षा अधिक रुंद आहे. वाळूच्या दांड्यावर पडलेल्या अनेक खिंडारांतून पावसाळ्यात पुराचे पाणी समुद्रात जाते. चिल्काचे पाणी पावसाळ्यात गोडे व उन्हाळ्यात खारे असते.

सरोवरातील पाणी अल्कधर्मी असून त्याचा सामू (pH) ७.१ ते ९.६ असल्याचे दिसून येते. सरोवराचा उत्तरेकडील भाग तुलनेने जास्त उथळ आहे. या भागात सरोवराची खोली दीड मीटरपेक्षाही कमी आहे, मात्र सरोवराचा दक्षिण भाग चार मीटरपेक्षाही जास्त खोल आहे. सरोवरात येऊन पडणारा गाळ खूप जास्त असल्यामुळे त्यातील पाण्याचा गढूळपणा दीड मीटर खोलीपर्यंत जाणवतो. 

इथली भरती ओहोटी कक्षा (Tidal range) २.४ मीटर आहे. या सरोवराचे समुद्राच्या दिशेने असलेले मुख अनेक वेळा गाळाच्या बदलत्या संचयनामुळे ईशान्य दक्षिण आणि नैऋत्य दिशेला सरकले आहे. गाळामुळे मुख बंद होऊन सरोवरातील आणि समुद्रातील पाण्याचे मिश्रण होण्याची प्रक्रियाही बाधित होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. असे झाले की सरोवरातील वनस्पती आणि जलचरांवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे चिल्का सरोवराचे पर्यावरणीय संतुलन योग्य राहावे यासाठी सदैव जागरूक राहावे लागते. 

गेल्या २६ लाख वर्षांत सरोवराच्या किनारपट्टीत अनेक वेळा स्थान बदल झाले. इथल्या किनारपट्टीजवळची समुद्र पातळी खाली गेल्यामुळे जवळच असलेले कोणार्कचे सूर्य मंदिर आज किनाऱ्यापासून दूर तीन किमी अंतर मागे गेले आहे. पूर्वी ते किनाऱ्यावर होते.

चिल्का सरोवराला येऊन मिळणाऱ्या अनेक नद्यांनी तयार केलेले पाणलोट क्षेत्र (Catchment)   ३५६० चौ.किमी इतके विस्तीर्ण असून त्याच्या तळावर प्रामुख्याने खडक, वाळू आणि चिखलयुक्त अवसाद (Sediments) आढळून येतात. हा सगळा गाळ मोठ्या प्रमाणात सरोवरात दरवर्षी येऊन पडतो.

सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी सगळ्या जगात समुद्राच्या पातळीत वाढ झाली. याच दरम्यान सात हजार वर्षांपूर्वी ही वाढ होणे थांबले होते. याचा परिणाम होऊन सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर वाळूची मोठी पुळण तयार झाली. त्यानंतर समुद्राची पातळी जशी वाढू लागली तशी ही पुळण ईशान्येकडे वाढत गेली आणि चिल्काच्या समुद्रवर्ती बाजूला मोठा वाळूचा दांडा (Spit bar) तयार झाला.

सरोवराच्या नैऋत्य भागात सापडलेल्या एका जीवाश्मावरून असे लक्षात आले, की हे सरोवर ३,५०० ते चार हजार वर्षांपूर्वी तयार झाले असावे आणि त्यानंतरच्या काळात वाळूचा दांडा सरोवराच्या समुद्राच्या बाजूला तयार झाला असावा. सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ आजच्या समुद्र पातळीच्यावर आठ मीटर उंचीवर प्रवाळ खडकांचे पांढरे पट्टे दिसून येतात. यावरून असा निष्कर्ष काढता येतो, की पूर्वी या भागात पाण्याची पातळी आजच्यापेक्षा जास्त उंचीवर होती आणि हा भाग आजच्यासारखा खाडी सदृश नव्हता. तो समुद्राचाच एक उथळ भाग होता.

हजारो वर्षांत झालेल्या उत्क्रांतीतून चिल्काच्या आज दिसणाऱ्या विविध भागांची निर्मिती झाली. सरोवराच्या समुद्रवर्ती बाजूला दिसणारा लांबच लांब वाळूचा दांडा, त्यावर दिसणारी भरती प्रवाहांची मुखे (Tidal Inlets), खाजण किंवा सिंधुतडागाचा (Lagoon) किनारा प्रदेश, सिंधुतडाग, सरोवराला येऊन मिळणाऱ्या दया आणि भार्गवी नद्यांच्या मुखाचे गाळाचे त्रिकोणी प्रदेश (Fan Lobes) हे या सरोवराचेच भाग आहेत.

याचबरोबर इतरही काही भाग चिल्का सरोवराच्या वैविध्यपूर्ण भूवारशाचे निर्देशन करतात. भरती ओहोटी, किनारा समीप प्रवाह आणि लाटा यांमुळे ३० ते ३०० वर्षांपूर्वी तयार झालेल्या दोन मीटर उंचीच्या वाळूच्या दांड्याच्या मागे १९०० ते १३०० वर्षे जुने तीन मीटर उंचीचे वाळूचे दांडे आहेत. त्याच्या मागे २२०० ते २१०० वर्षे जुन्या २० मीटर उंच वाळूच्या टेकड्या, वाळूच्या दांड्यामागे बेटे, दलदल प्रदेश, ३७५० ते १८५० वर्षे जुन्या वेदिका (Terraces), ४३०० ते ३१०० वर्षे जुने भरती ओहोटीमुळे तयार झालेले सपाट भाग (Tidal flats) आणि सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर दिसणारे पाच ते चार हजार वर्षांपूर्वीचे नद्यांनी तयार केलेले छोटे त्रिभुज प्रदेश अशी विविध भूरूपे इथे दिसतात.

सरोवराच्या समुद्रवर्ती बाजूला असलेल्या वाळूच्या दांड्याची आणि २५० मीटर रुंदीच्या वाळूच्या टेकड्यांची दरवर्षी वादळामुळे मोठ्या प्रमाणावर झीज होते. सरोवराच्या बाहेरच्या, उत्तरेकडील  किनाऱ्यानजीकच्या भागात दया, भार्गवी आणि ऋषीकुल्य नद्यांच्या मुखाजवळ गोड्या पाण्याच्या पाणथळी (Wetlands) आढळतात. याउलट बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या वाळूच्या दांड्याच्या मागे मचूळ पाण्याच्या पाणथळी आढळून येतात.

चिल्का सरोवर २७ फेब्रुवारी २०१८ला आंतरराष्ट्रीय स्तरावर इरावदी डॉल्फिनचे सर्वात मोठे वसतिस्थान म्हणून घोषित करण्यात आले आहे. इथे १५५ इरावदी डॉल्फिन आढळले आहेत. सरोवरातील गाळाचा प्रश्न सोडविण्यासाठी सप्टेंबर २०००मध्ये सिपकुडा या गावानजीक वाळूच्या दांड्याला १०० मीटर रुंदीचा एक कृत्रिम मार्ग काढण्यात आला. यामुळे सरोवरातील गाळ सहजपणे बाहेर पडून समुद्रात निर्गमित होऊ शकला आणि सरोवराचे पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित होऊ शकले. 

विलक्षण भूशास्त्रीय वैविध्य असलेले असे हे चिल्का सरोवर भारतातील एक महत्त्वाचे भूवारसा पर्यटन ठिकाण आहे यात शंका नाही.

स्थान संदर्भ 

  • १९.७३ अंश ते २०.५८ अंश उत्तर अक्षांश /८५.६७ अंश ते ८५.३३ अंश पूर्व रेखांश 
  • समुद्र सपाटीपासून उंची : ० मीटर
  • क्षेत्रफळ : ११०० चौ.किमी.
  • भूशास्त्रीय वय : ३५००-४००० वर्षे     
  • जवळचे मोठे ठिकाण : पुरी (३८ किमी), भुवनेश्वर (६० किमी)

संबंधित बातम्या