साइकल पे हसीनों की टोली..

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

हिंदी चित्रपटांमधल्या गाण्यांच्या चित्रीकरणात अफाट वैविध्य दिसतं. कथानक पुढं नेण्यासाठी तीन चार मिनिटांच्या गाण्याचा खूप कल्पकतेने वापर केलेला दिसतो. कल्पनावैविध्य बघता वेगवेगळ्या वाहनांमध्ये चित्रित झालेलीही अनेक गाणी आहेत. पण नायक-नायिका, त्यांचे मित्र-मैत्रिणी सायकल चालवताना मजेत गात गात घोळक्यानं सहलीला निघालेत असे एक ‘फील गुड फॅक्टर’ असलेलं दृश्य काही जुन्या चित्रपटांमध्ये दिसायचं; त्याची मजा काही वेगळीच! 

खरंतर सायकल हे सर्वसामान्यांचं वाहन. पण नायिका, तिच्या मैत्रिणी खळाळत्या उत्साहात सायकलवरून मुक्तपणे गात विहरत असतात, तेव्हा ती सायकल त्यांच्या मुक्त स्वातंत्र्याचं प्रतीक होऊन येते. ‘पडोसन’मधलं सायरा बानूचं ‘मैं चली मैं चली देखो प्यारकी गली’ किंवा नूतनचं ‘अनाडी’मधलं ‘बनके पंछी गाये प्यार का तराना’, या गाण्यांत असाच उत्फुल अवखळपणा आहे. 

मुलं, मुली एकत्र अशी गाणी आठवायची, तर ‘अमानत’मधलं ‘साइकल पे हसीनों की टोली’ हे मनोज कुमार-साधना यांच्यावर चित्रित झालेलं आशा-महेंद्र कपूर-मन्ना डे यांचं गाणं; किंवा त्याही खूप आधी १९४२च्या ‘खजांची’ या सिनेमामध्ये शमशाद बेगम याचं एक खूप छान गाणं आहे, ‘सावन के नजारे है’. ‘मेरे सनम’मधल्या प्रसिद्ध ‘पुकारता चला हूँ मैं’ या गाण्यात आशा पारेख आणि तिच्या मैत्रिणी सायकलवर, तर नायक त्यांच्या मागून कारमधून. अशीच छेडछाड किंवा खरंतर ‘eve teasing’ असलेलं अजून एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘शान’मधलं ‘जानू मेरी जान’. बसमध्ये बसलेल्या परवीन बाबी आणि बिंदिया गोस्वामी यांचा सायकलवरून डबलसीट पाठलाग करणारे अमिताभ बच्चन आणि शशी कपूर. ‘पेईंग गेस्ट’मधलं देवानंद नूतनवर चित्रीत झालेलं किशोर-एसडी-देवानंद या हमखास यशस्वी सुरेल संचाचं ‘माना जनाब ने पुकारा नहीं’ हे बहारदार गाणं, असंच रूठना-मनाना प्रकारातलं!

नायक-नायिका सायकलवरून डबलसीट जात असतील तर त्याला रोमँटिक गाण्याची जोड हवीच! देवानंद आणि मुमताजचं ‘हे, मैंने क़सम ली’ किंवा विनोद खन्ना-सायराचं ‘नैनों में दर्पन है, दर्पन में कोई’ (दोन्ही गाणी गायलीयत किशोर-लता यांनी) ही गाणी पाहा. ‘प्रेमरोग’मधलं, ‘भवरेने खिलाया फूल’ यातही सुरुवातीला ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे सायकलवर डबलसीट दिसतात. किशोर-माला सिन्हा यांचं ‘मायकल है तो सायकल है, मायकल नही तो सायकल भी नही’ हे मजेशीर गाणं याच प्रकारातलं.

सायकलवरच्या गाण्यात मला ‘सांवले सलोने आये दिन बहारके’ हे ‘एकही रास्ता’मधलं लता-हेमंत कुमार यांनी म्हटलेलं गाणं फार आवडतं. यातली सायकलपण वेगळी आहे. चार पायडलवाली, पुढे लहानग्या मुलाला बसवून सुनील दत्त-मीना कुमारी दोघं सायकल चालवत गाताहेत, ‘....आया जमाना गाओ गीत प्यारके’... सुखी समाधानी कुटुंबाचं गाणं!

सायकलवरचं ‘अन्नदाता’ चित्रपटातलं ‘गुजर जाए दिन दिन, के हर पल गिन गिन’ आणि ‘मेरे अपने’मधलं सायकलच्या साक्षीनं फ्लॅशबॅकमध्ये नेणारं ‘कोई होता जिसको अपना, हम अपना कह लेते यारो’ ही दोन्ही अप्रतिम गाणी गायलीत किशोरनं आणि संगीत सलिल चौधरी यांचं. ‘कोई होता’ हे इतर सायकल गाण्यांपेक्षा थोडं वेगळं, दुःखाची किनार असलेलं. ‘गौतम गोविंदा’मधलं किशोरचंच ‘मौसम बदले ना बदले नसीब’ (संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल) हेही सायकलवरचं, थोडं अंतर्मुख करणारं गाणं.

आठवायला किंवा शोधायला बसलं तर सायकलवर चित्रीत झालेली भरपूर गाणी सापडतील. ‘मेरे पिछे एक दिवाना’ (नजराना, राज कपूर-वैजयंतीमाला), जॉनी वॉकरचं ‘सुनो सुनो मिस चैटर्जी’, राजेंद्र कुमारचं ‘आसका पंछी’ चित्रपटातलं ‘दिल मेरा एक आसका पंछी’ किंवा मेहमूदचं ‘प्यासे पंछी’मधलं ‘प्यासे पंछी नील गगनमे गीत मिलन के गाये’ हे मुकेशचं; ही काही वानगी दाखल उदाहरणं. हो आणि, ‘बात एक रातकी’मधलं देवानंद-रफी-एसडींचं ‘अकेला हूँ मैं’ हे सुरेख गाणं विसरून कसं चालेल?

मला वाटतं सायकलवरचं सगळ्यात गाजलेलं नायकाचे गाणं म्हणजे राजेश खन्नाचं ‘डाकिया डाक लाया’ हेच! ‘पलकों की छाव में’ चित्रपटातलं लक्ष्मी-प्यारे-किशोरचं हे गाणं एकदम बहारदार आहे. टपालाची वाट बघणारे गावातले उत्सुक चेहरे... राजेश खन्ना सायकलवरून घरोघरी पत्र वाटतोय; ‘ख़ुशीका पयाम कहीं, कहीं दर्दनाक लाया... डाकिया डाक लाया’!

सायकलवरच्या गाण्यात बघा, सहसा आसमान, गगन, आकाश, पंछी असे मुक्ततेचे स्वातंत्र्याचे प्रतीक असलेले शब्द असतात. उघड्या डोक्यावरच्या मोकळ्या आकाशात मनानं आणि विशाल माळावरून सायकलनं मोकाट हुंद़डण्यातली मजा काही वेगळीच! मात्र हीच सायकल ‘अनुराधा’ चित्रपटातल्या निर्मल चटर्जी या सेवाव्रती डॉक्टरची सखी होऊन येते. औषधासाठी बस स्टॉपवर किंवा उपचारासाठी रुग्णांकडे जाताना त्याला साथ-सोबत करणारी. ‘जो जीता वोही सिकंदर’ या चित्रपटात तर सायकल जणू मुख्य नायिकाच. आमीर खाननं रंगवलेल्या संजयचं टपोरी तरुण ते जबाबदार मुलगा/भाऊ हे स्थित्यंतर सायकलच्या साथीनं घडतं. सायकलिंग या खेळावर आधारित या चित्रपटातली ती शेवटची सायकल रेस तर कितीही वेळा बघितली, तरी दरवेळी तितकीच उत्कंठा वाटते.... ‘हारी बाजीको जितना हमे आता है’! 

अजून एक, हीच सायकल ‘एलिझाबेथ एकादशी’ या आपल्या मराठी चित्रपटात लहानग्या भावंडांचं वास्तव (आणि स्वप्नही) होऊनही आपल्यासमोर येते.

जाता जाता एक आवर्जून उल्लेख- ‘अनाडी’ चित्रपटातल्या, ‘बनके पंछी गाए’ या गाण्यात नूतनबरोबर सहनायिका शुभा खोटे सायकल चालवताना दिसतात. त्या नुसत्या चित्रपटात नाही तर खऱ्या आयुष्यातही राष्ट्रीय दर्जाच्या अव्वल सायकलपटू होत्या. त्यांनी कॉलेजमध्ये असताना लागोपाठ तीन वर्षं स्वीमिंग आणि सायकलिंग स्पर्धेमध्ये नॅशनल चँपियनशिप जिंकली होती. असं म्हणतात की त्यांचा पहिला चित्रपट, ‘सीमा’ त्यांना उत्तम सायकलपटू या त्यांच्या कीर्तीमुळंच मिळाला. त्यातला, सायकलवरून त्या चोराचा पाठलाग करतात, असा एक खास सीन खूप गाजला होता.

संबंधित बातम्या