पक्ष्यांचे पाऊस गाणे 

धर्मराज पाटील, वन्यजीव संशोधक 
शुक्रवार, 5 जुलै 2019

कव्हर स्टोरी
 

पावसाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे नानाविध पक्ष्यांचा विणीचा हंगाम. या पक्ष्यांच्या मधुर गाण्यांनी सारा आसमंत भरून जातो. याशिवाय या पक्ष्यांनी विणीच्या हंगामासाठीचा खास रंगीत पेहराव पांघरलेला असतो. या काळात त्यांची जुनी पिसे झडून नवीन आकर्षक पिसे आलेली असतात. साधा गाय बगळाच पाहा. वर्षभर शुभ्र पांढरा दिसणारा बगळा अचानक वेगळा दिसू लागतो. त्याच्या मानेपासून वरची पिसे पिवळी धमक होऊन जातात आणि डोक्‍याला एक बारीकशी शेंडी दिसायला लागते. याचाच अर्थ आता त्याचा विणीचा हंगाम आणि अर्थातच पावसाळा येऊन ठेपलेला आहे. तसेच बदल इतरही पक्ष्यांमध्ये दिसायला लागतात. 

याच काळात सुगरण पक्ष्यांची लगबगसुद्धा वाढलेली असते. पिवळे धमक असे नर सुगरण पक्षी घरटी बांधण्यास सुरुवात करतात. आधी नर सुगरण अर्धे घरटे बांधतो आणि ते घरटे मादीला आवडल्यास दोघे मिळून ते घरटे पूर्ण करतात. आवडले नाही, तर ते घरटे तसेच सोडतात. सुगरण पक्षी एक-गठ्ठा घरटी बांधतात. विशेष करून बाभळीच्या फांद्यांवर आणि पाणवठ्याजवळ अशी लोंबती घरटी सहज दृष्टीस पडतात. सुगरण पक्ष्यांची अशी घरटी बांधण्याची लगबग म्हणजे पावसाळ्याची सुरुवात. अशी घरटी बांधण्यासाठी जी हिरवी गवताची पाती लागतात ती याच काळात उपलब्ध असतात. 

पावसाचे संकेत देणारे असे पक्षी फक्त झाडाझुडुपातच आढळून येतात असे नाही. यातले बरेचसे पक्षी तर आपल्या घराच्या आसपासच दिसून येतात. संध्याकाळच्या वेळी हवेत शिताफीने उडणारी पाकोळीसुद्धा (Dusky Crag Martin) पावसाचा संकेत घेऊन येते. रंगाने अजिबात आकर्षक नसलेल्या या छोट्या पक्ष्याची चिमणीसारखी चिवचिव ऐकायला आली की समजून जावे, आता पावसाळा आला आहे. ही चिवचिव त्यांच्या घरट्यातील पिलांचीसुद्धा असू शकते. यांची घरटी चक्क एखाद्या इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येसुद्धा दिसून येतात. हा पक्षी अगदी वैशिष्ट्यपूर्ण असे घरटे बांधतो. पाकोळी चिखल आपल्या लाळीत मिसळून त्याचे गोळे करते. तेच गोळे जोडून भिंतींवरील कोपऱ्यात बशीच्या आकाराचे घरटे साकारले जाते. असा चिखल उपलब्ध होतो, तो अर्थात पावसाळ्यातच. शिंपी पक्षी (Common Tailorbird), नाचण (Spotted Fantail), दयाळ (Oriental Magpie Robin), सुभग (Common iora), हळद्या (Golden Oriole), शिपाई बुलबुल (Red-whiskered Bulbul) अशा कितीतरी पक्ष्यांच्या गाण्यांनी पहाटेची सुरुवात होणे ही पावसाळ्याचीच नांदी. पावसाळ्याच्या सुरुवातीस हे पक्षी रंगानेही नटलेले असतात. सुमधुर गाणी आणि रंगांची उधळण हे फक्त जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी. 

मादी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठीच्या या स्पर्धेत आणि जणू पावसाळ्याची दवंडी पिटण्याच्या या उत्सवात उच्चांक गाठला आहे तो कोकिळेच्या गटातील पक्ष्यांनी. कोकीळची कुहूकुहू सुरू होते आणि मोसम बदलाची चाहूल लागते. गाणारा कोकीळ असतो, कोकिळा नाही, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. बव्हंशी गाणारे पक्षी किंवा रंगाने भडक असणारे पक्षी हे नर पक्षी असतात. गंमत म्हणजे या विणीच्या हंगामाची वर्दी देणारे कोकीळ-कोकिळा मात्र स्वतःचे घरटे बांधत नाहीत. लहानपणापासून आपण ऐकत-पाहात आलो आहोत, की कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी देते आणि पुढे कावळाच तिच्या पिलांचे संगोपन करतो. हे सगळे कावळ्याला फसवून केले जाते. कोकीळ गटातील काही अपवाद वगळता सर्वच पक्षी असे परावलंबी आहेत. निसर्गानेच त्यांना तसे केले आहे. निसर्गातील हे एक संतुलन चक्र आहे. या पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाचा रोख असतो तो पावसाळा. त्यांच्या अंड्यांतून पिले बाहेर येईपर्यंत पावसाळा आलेला असतो. अगदी पावसाळ्याच्या तोंडाशी कोकीळच्या ताना वाढत जातात आणि त्याच्या जोडीला आणखी एक त्याच कुळातला पक्षी साद द्यायला सुरुवात करतो, तो म्हणजे पावशा! 

पेर्ते व्हा...पेर्ते व्हा...ही आरोळी तर सर्वांनाच परिचयाची आहे, तोच पावशा. त्याला इंग्रजीत कॉमन हॉक ककू (Common Hawk-cuckoo) असेही नाव आहे. तो दिसायला एखाद्या ससाण्यासारखा आहे, म्हणून त्याच्या नावात हॉक हा शब्द येतो. तसे दिसणे हा कदाचित त्याच्या स्व-संरक्षणाचा भाग असावा. त्याचे गाणे हे जणू रात्रंदिवस सुरू असते. अगदी मध्यरात्रीही त्याचे गूढ गाणे ऐकू येत राहते. त्याच्या अशा सवयीमुळे त्याला ब्रेनफिवर बर्ड (Brainfever Bird) असेही म्हणतात. जणू मेंदूज्वर झाल्यासारखाच तो ओरडत असतो. हा भारतीय उपखंडातील प्रदेशनिष्ठ (endemic) पक्षी आहे. भारतात स्थानिक असणारा पावशा श्रीलंकेत मात्र हिवाळी पाहुणा आहे. याचेही स्वतःचे घरटे नाही. तो सातभाईच्या (Babblers) घरट्यात आपली अंडी देतो. तेच त्याच्या पिलांचे संगोपन करतात. 

परजीवी जोड्या 
सामान्यतः सर्वच जीवांमध्ये पिलाचे जन्मदातेच त्याचे संगोपनही करतात. पक्ष्यांमध्येही तसेच, पण कोकीळ गटाचा अपवाद वगळता. आपण फक्त कोकिळा-कावळा हे नाते जाणून आहोत, पण अशा इतर परजीवी जोड्याही आहेत. ककू कुळातला सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे चातक. याला इंग्रजीत पाईड ककू किंवा जॅकोबीन ककू (Pied Cuckoo/Jacobin Cuckoo) असे म्हणतात. या पक्ष्यामागे एक गूढ वलय आहे. अगदी कालिदासकृत मेघदूतपासूनच्या साहित्य परंपरेत कुठे ना कुठे चातकाचा उल्लेख आढळतो. चातकाशी जोडली गेलेली एक आख्यायिका म्हणजे, तो फक्त पाहिल्या पावसाचे पाणी पिऊन जगतो. वस्तुस्थिती नक्कीच तशी नाही. पण अशी धारणा निर्माण होण्यामागे निश्‍चित कारण मात्र आहे. हा पक्षी मुख्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीसच दृष्टीस पडतो. आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या दक्षिणेला आणि आशियामध्ये हिमालयाच्या दक्षिणेला चातक आढळून येतो. दक्षिण भारतात चातक संपूर्ण वर्षभर दिसतो. कारण दक्षिणेत तो एक स्थानिक पक्षी असून तेथेच त्याचा विणीचा हंगामही असतो. महाराष्ट्र आणि उत्तर भारतात चातक हा स्थलांतरित पक्षी आहे. तो येतो आफ्रिकेतून. मॉन्सूनच्या पावसाबरोबरच त्याचेही आगमन होते. फरक इतकाच, की मॉन्सूनचे ढग अरबी समुद्रावरून इकडे दाखल होतात, तर चातक अरबी द्वीपकल्पामार्गे (Arabian Peninsula) भारतात येतो. अरबी समुद्रावरचा जीवघेणा प्रवास तो टाळत असला, तरी लाल समुद्र (Red Sea) आणि गल्फची सामुद्रधुनी (Persian Gulf) त्याला पार करावीच लागते. काही चातक आफ्रिकेत स्थानिकही आहेत, जे स्थलांतर करत नाहीत आणि त्यांची वीणही तेथेच होते. विरळ झाडोरा आणि खुरटी वने अशा अधिवासात चातक आढळून येतो. घनदाट जंगलात राहणे त्याला पसंत नाही. भारतात स्थलांतर करून येणाऱ्या चातकांचा विणीचा हंगाम भारतातच पार पडतो. अर्थात दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी देऊन. चातकसुद्धा सातभाई पक्ष्याच्या घरट्यांनाच आपले लक्ष्य करतो. कधीकधी बुलबुलच्या घरट्यातही अंडी दिली जातात. या चातकांची वीण भारतात होत असल्याने खरे म्हणजे ते आफ्रिकेत स्थलांतर करून जातात असे म्हणायला हवे! चातकाच्या अंड्यांचा निळा रंग हुबेहूब सातभाई पक्ष्याच्या अंड्यांसारखा असल्याने ती वेगळी ओळखू येत नाहीत आणि सातभाई पक्षी फसतो. मादी चातक सातभाईच्या घरट्यात अंडी देईपर्यंत नर चातक सातभाईचे लक्ष विचलित करतो. चातकाने घरट्याच्या काठावर बसून अंडे दिल्याने कधी कधी घरट्यातील सातभाईची अंडी फुटतात. एकदा का चातकाने अंडी घातली, की त्यांची पुढील सर्व जबाबदारी नकळतपणे सातभाई पालकांकडून घेतली जाते. अशा प्रकारच्या नात्याला परजीवी वीण (Brood Parasitism) असे शास्त्रीय नाव आहे. ही मॉन्सून दरम्यान पाहायला मिळणारी एक थक्क करणारी घटना आहे. सातभाई पक्ष्याला चातक वेगळा ओळखू येत नाही असे नक्कीच नाही. चातकाला आपल्या घरट्यामध्ये अंडी घालता येऊ नयेत, यासाठी सातभाई पूर्ण प्रयत्न करेल. पण एकदा का चातकाकडून गनिमीकाव्याने अंडी दिली गेली, की मग सातभाईचे संपूर्ण वर्तनच बदलून जाते. चातक अथवा पावश्‍याची अंडी वेगळी ओळखू येत नसल्याने ती काढून फेकायचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कदाचित सातभाईचे गणितही कच्चे असावे, नाहीतर जादाचे अंडे घरट्यात आलेले त्याला कळाले असते! पुढे अंड्यांतून पिले येतात. यात परजीवीची पिले वेगळी दिसतात. पण या दत्तक पालकांची (Foster Parents) इतकी पराकोटीला गेलेली असते, की त्यांना आपल्या अंड्यातून बाहेर आलेले पिलू कितीही निराळे दिसत असले, तरी आपलेच वाटते. 

निसर्गातील ही घटना म्हणजे उत्क्रांती (Evolution) आणि सह-उक्रांती (Co-evolution) यांचा उत्तम नमुना आहे. वर म्हटल्याप्रमाणे चातक अथवा पावशाकरवी बऱ्याचदा सातभाईची अंडी फोडलीही जातात, कधी उंचीवरून अंडे फेकून दिल्याने किंवा कधी चोचीने बारीक छिद्र पाडल्याने. एकदा का असे झाले, की ते अंडे नासून जाणार हे निश्‍चित. म्हणजे उरलेल्या चातक-पावशाच्या अंड्यांतून पिले बाहेर येऊन सातभाईंमुळे त्यांचे चांगले भरण-पोषण होण्याची शक्‍यता वाढते. अंडी जाणीवपूर्वक फोडणे हा झाला चातक-पावशाच्या उत्क्रांतीचा दाखला. हे नाते हजारो वर्षे चालत आले आहे. म्हणजेच सातभाई सारखे पक्षी आपल्याला फसवले जात आहे, एवढे लक्षात येण्याइतके उत्क्रांत नक्कीच झाले आहेत. त्यामुळे सातभाईकडून बऱ्याच वेळेला कठीण कवचाची अंडी घातली जातात, जेणेकरून ती फुटण्याचा धोका कमी व्हावा! ही झाली सह-उत्क्रांती. पण हे एखाद्या पक्ष्याकडून ठरवून केले जाते असे नाही. तर, पिढ्यानपिढ्यांच्या प्रक्रियेमध्ये तसे आपसूकच घडत जाते. 

पावसाळ्यातच ककू गटातील इतर पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो किंवा ते दृष्टीस पडतात. जसे, कारुण्य कोकिळा (Grey-bellied Cuckoo), इंडियन ककू (Indian Cuckoo), युरेशियन ककू (Eurasian Cuckoo), बॅंडेड बे ककू (Banded Bay Cuckoo) इत्यादी. यातील कारुण्य कोकिळा हा या गटातील आकाराने छोटा पक्षी. साधारणपणे बुलबुलच्या आकाराचा (म्हणजे चोचीपासून ते शेपटापर्यंतची लांबी 23 सेंटीमीटर इतकी). कारुण्य कोकिळा असे नाव असण्याचे कारण त्याच्या कारुण्य वाटणाऱ्या शिळीमध्ये आहे. हा कारुण्य वाटणारा स्वर फक्त जोडीदारीण मिळेपर्यंतच कारुण्य असतो. एकदा का जोडी जमली, की इतर पक्ष्यांना घरट्यासाठी फासवायला हे मोकळे! आकार छोटा असल्याने कारुण्य कोकिळेच्या अंड्यांचाही आकार अर्थातच तुलनेने छोटा. त्यामुळे सातभाईसारख्या मोठ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घातली, तर ती चटकन वेगळी ओळखू येतील. मग पर्याय काय, तर छोट्या आकाराच्या पक्ष्यांच्या घरट्यांना लक्ष्य करणे. त्यातही विशेषकरून वटवट्यांना (Warblers). या व्यतिरिक्त, शिंपी पक्षी (Tailorbird) आणि शिंजीर (Sunbird) अशा अगदीच लहान आकाराच्या पक्ष्यांच्या घरट्यांनाही लक्ष्य केले जाते. 

ककूंचे परिसंस्थेतील महत्त्व 
ककू पक्ष्यांना परिसंस्थेच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. चातक, पावशा, कारुण्य कोकिळा यांचे याच काळात प्रजनन होण्यामागेही काहीतरी कारणे आहेत. बहुतेक करून सातभाईसारख्या पक्ष्यांची घरटी या ककू गटातील पक्ष्यांचे लक्ष्य असते. सातभाई हा असा पक्षी आहे, जो गटाने राहतो. यावरूनच त्याला सातभाई (Seven Sisters) असे नाव पडले आहे. या सहकारी तत्त्वावर (Cooperative Breeding) जगणाऱ्या पक्ष्याच्या पिलांच्या जगण्याची शक्‍यता (Survival Chance) इतर जातीच्या पक्ष्यांच्या तुलनेत वाढलेली असते. सामान्यतः घरट्याच्या रक्षणासाठी पालकांची एक जोडी असते, पण सातभाईसारखे पक्षी समूहात राहात असल्याने त्यांच्या घरट्यांची सुरक्षा काही पटीने वाढते. शिवाय, घरट्यातून बाहेर पडल्यापासून ते उडायला शिकेपर्यंतची पिलांची सुरक्षाही समूहामुळे वाढते. अशा विषम वास्तवामुळे सातभाई सारख्या पक्ष्यांची संख्या इतर पक्ष्यांच्या तुलनेत आपसूकच वाढेल. त्यावर नियंत्रण ठेवले जाते, ते अशा ककूंच्या परजीवनामुळे. परिसंस्थेमध्ये जेवढे ककू पक्षी जास्त, तेवढे सातभाई कमी होतील. म्हणजेच, कोकिळेच्या गटातील पक्षी म्हणजे निसर्गाची एक नियंत्रण यंत्रणा आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

ककू कुळातला अपवादात्मक पक्षी म्हणजे भारद्वाज. ज्याला इंग्रजीत ग्रेटर कौकल (Greater Coucal) म्हणतात. हा या कुळातला असूनही स्वतःचे घरटे बांधतो. पण याचा अर्थ तो इतर पक्ष्यांना त्रास देत नाही असा नक्कीच नाही. भारद्वाजचे मुख्य अन्न म्हणजे सरडे आणि छोट्या पक्ष्यांची अंडी आणि पिले. म्हणूनच याचाही विणीचा हंगाम पावसाळ्यातच असतो. याच काळात त्याला इतर पक्ष्यांची अंडी आणि पिले भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात. आपण भारद्वाज नेहमीच जमिनीवर अथवा जमिनीपासून थोड्याच उंचीवर पाहतो. बव्हंशी छोट्या पक्ष्यांची घरटी ही जमिनीपासून मीटरभर उंचीवर एखाद्या झाडाझुडुपात असतात. भारद्वाज नेमक्‍या अशाच घरट्यांच्या शोधात असतो. भारद्वाजला आपण शुभशकून मानतो, पण बऱ्याच छोट्या पक्ष्यांसाठी तो कर्दनकाळ आहे! 

एकंदर, पावसाळ्यात कोकिळा, चातक, पावशा, कारुण्य कोकिळा, भारद्वाज हे वरवर कितीही मंजुळ स्वर काढत असले, तरी त्यांच्या पक्षीजगतात बऱ्याच उलथापालथी सुरू असतात! पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली, की ककूंचे गाणे हळूहळू कमी होत जाते. मग, मात्र हे कोकीळवर्गीय पक्षी शोधूनही सापडणार नाहीत. काहींची पिले सातभाईंनी इमाने-इतबारे सांभाळ केल्यामुळे मोठी होऊन उडून गेलेली असतात. ज्यांना या मोसमात समागमाची संधी मिळाली नाही ते पुढच्या मोसमाच्या प्रतीक्षेत राहतात. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील चातक पुन्हा हजारो मैलांचा प्रवास करून आफ्रिकेत दाखल झालेला असतो. पावसाच्या तालाबरोबरच इतर स्थानिक पक्ष्यांचा किलबिलाटही आता थंडावलेला असतो. हिवाळ्याची चाहूल लागते आणि लांबहून निघालेले हिवाळी स्थलांतरित पाहुणे अवतरायला सुरुवात होते. उत्तर गोलार्धात बर्फवृष्टी सुरू झालेली असते आणि तेथील जगणे खडतर झाल्याने हे प्रवासी पक्षी दक्षिण गोलार्धात यायला निघतात. हिवाळा संपला की परत कोकिळा उन्हाळा सुरू झाल्याची आरोळी देते आणि मागोमाग ढगांच्या गडगडाटासह पावशा आणि चातक पुढचा पाऊस घेऊन हजर झालेले असतात. निसर्गाकडून मिळणारे पावसाचे संकेत कधीकाळी मानवाच्या अस्तित्वाशी निगडित होते. आज आपला आणि अशा संकेतांचा संबंध तुटलेला आहे. हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या नानाविध पद्धती आज वापरल्या जातात ज्या निसर्ग संकेतांपेक्षा सरस आहेत. पण असे संकेत आपण दुर्लक्ष करत चालल्याचा परिणाम आपली निसर्गाशी असलेली नाळ तुटण्यामध्ये झालेला आहे. एकीकडे ऱ्हास होत चाललेली जैविक विविधता आणि दुसरीकडे प्रचंड प्रमाणात प्रदूषण यामुळे आज मानवी अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कदाचित एखाद्या पक्ष्याचे गाणे आपणाला निसर्गाकडे ओढत असेलही. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करत एका अशा दिशेला चाललो आहोत जिकडे तुटलेला कडा आहे. अविवेकी विकासाच्या नावाखाली चाललेल्या ओरबाडीचा धोका या पक्षीजगताला आहे. झाडोरा तर कमी होत चाललाच आहे. हिरवाईच्या नावाखाली मंत्र्यांकडून नवनवीन भ्रामक कल्पना जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परिसंस्थेचे संवर्धन मात्र कुठेच होताना दिसत नाही. 

या पावसाळ्यात किती झाडे लावली यापेक्षा किती झाडे जगली, हा प्रश्‍न महत्त्वाचा राहणार आहे. दुसरीकडे वन्यजीव संशोधनाच्या नावाखाली बीभत्सतेकडे चाललेले वन्यजीवांचे छायाचित्रण आणि अनियंत्रित वन-पर्यटन यातून पक्ष्यांसाठी तरी सुकर मार्ग दिसत नाही. वन्यजीवप्रेमी पैशापासरी आहेत, पण त्यांना जोडणारा संवर्धनाचा धागा कुठेतरी कमी पडतो आहे.

पावसाचे आणि पक्ष्यांचे नाते 
ककू गटातील सर्व पक्षी पावसाच्या सुरुवातीस संपूर्णपणे गायनात गुंतलेले असतात. भारतातील बव्हंशी जंगलांचा ताबा यांच्याच आवाजाने घेतलेला असतो. जंगलातच नाही तर गावा-शहरांतही तेच. पावसाळ्याशी हे सूर इतके घट्ट जोडले जावेत, असे काय नाते असावे पावसाचे आणि पक्ष्यांचे? ककू गटातील पक्षी आणि पाऊस यांच्यातील आंतरसंबंध समजून घ्यायचा असेल, तर एकंदर पक्षीजगत आणि पाऊस यातील संबंध पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल. भारतात बव्हंशी जातीच्या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम उन्हाळ्यात सुरू होतो आणि पावसाळ्यापर्यंत चालतो. म्हणजेच उन्हाळ्यात पक्षी घरटी बांधायला सुरुवात करतात आणि पावसाळा येईपर्यंत अंड्यांतून पिले बाहेर आलेली असतात. पक्ष्यांचा मुख्य आहार म्हणजे कीटक आणि कीटकांची भरमार असते ती पावसाळ्याच्या सुरुवातीस. म्हणजेच कितीतरी घरट्यांतून बाहेर येणाऱ्या कैक पिलांना जगवायचे असेल, तर पावसाळ्यासारखा दुसरा मोसम नाही... आणि हाच जर जास्तीत जास्त पक्ष्यांचा विणीचा काळ असेल, तर ककू सारख्या परजीवी गटातील पक्ष्यांचा विणीचा हंगाम वेगळा कसा असेल. शेवटी यातीलच एखाद्या पक्ष्याच्या घरट्यात त्यांना अंडी द्यायची आहेत! मॉन्सून सुरू होतो आणि निसर्गात विविध जीवांची लगबग सुरू होते. बेडूक, सरडे, पाली, किडे, मुंग्या, कोळी आणि असे अनेक. सर्वत्र हिरवाई पसरलेली असते आणि या सर्वांना पुरेल इतके अन्न निसर्गात उपलब्ध असते. हे सर्व छोटे जीव भरपूर संख्येत उपलब्ध असल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारे पक्षीही या काळात आपल्या पिलांना जन्म देतात, जेणेकरून अन्नाची कमतरता होत नाही.

संबंधित बातम्या