भालबा-एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व 

कौस्तुभ मो. केळकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

जन्मशताब्दी
प्रा. भालचंद्र ऊर्फ भालबा केळकर यांनी रंगभूमीसाठी केलेले कार्य केवळ विलक्षण म्हणावे लागेल. मात्र, त्यासाठी मुंबईला न जाता त्यांनी पुण्यातील कलावंतांसाठी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून पुण्याला विशेष ओळख मिळवून दिली. कोणताही मोठा कलावंत न घेता विविध नाटकांचे प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवले. अशा या भालाबांची २३ सप्टेंबर रोजी जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या पुतण्याने भालाबांच्या आठवणींना दिलेला उजाळा...

प्रा. भालबा (तथा भालचंद्र वामन) केळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या भालबांनी साहित्य, विज्ञान, रंगभूमी, अध्यापन अशा अनेक क्षेत्रांत आपली वेगळी छाप पडली होती. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी बेळगाव येथे झाला. शालेय शिक्षण गोपाळ हायस्कूलमध्ये, तर पुढील शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. ते शिक्षणात प्रथमपासूनच हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते आणि याच कालावधीमध्ये त्यांना नाटक, साहित्य, क्रिकेटबद्दल आवड निर्माण झाली. प्राचार्य डी. डी. कर्वे यांच्या कडक आणि शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली त्यांनी रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि पुढे नौ. वाडिया आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबांनी रंगभूमीवरील प्रथम पदार्पण १९३१ या वर्षी शालेय जीवनात एक पारशी ऑफिसरच्या भूमिकेतून केले. तर, १९४४-४५ या वर्षात ‘उसना नवरा’, तसेच ‘मी उभा आहे’ या नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी पहिली स्त्री भूमिका १९४७ मध्ये केली, तर पहिले व्याख्यान १९४६ मध्ये फर्ग्युसन  कॉलेजमधील कला मंडळामध्ये दिले. 

आधुनिक रंगभूमीचे द्रोणाचार्य 
भालबांनी १९ ऑक्टोबर १९५१ रोजी केवळ सहा रुपयांच्या भांडवलावर प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए)ची स्थापना केली. संस्थेसाठी व्यक्ती आणि व्यक्तींसाठी संस्था नाही, असे मानणारी नाट्यक्षेत्रातील एक संस्थारूपी व्यक्ती होती. भालबांनी नाटक कंपनी न म्हणता, तिला नेहमी नाट्यकुटुंब असे संबोधले. नाटकात काम करणाऱ्या मुलांचे पालक आढेवेढे घेत असत, तर मुलींना परवानगीच नसायची; अशा काळात भालबांनी पालकांमध्ये विश्‍वास निर्माण केला. पीडीए ही संस्था म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीची गंगोत्री. या रंगमंचावर भालबा द्रोणाचार्यासारखे वावरले. त्यांनी वसंतराव कानेटकरांसारखे स्वतःचे दालन निर्माण करणारे नाटककार, डॉक्टर श्रीराम लागूंसारखे नटसम्राट आणि जब्बार पटेलांसारखे कुशल दिग्दर्शक निर्माण केले. पीडीए हे आधुनिक मराठी रंगभूमीचे महाविद्यालय ठरले आणि त्यांनी अशा ताऱ्यांना जन्म दिला, की भालबांचे कर्तृत्व शिष्यांच्या कार्यकौशल्याने सतत चमकत राहिले. १९७८ च्या डिसेंबरमध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी भालबांची निवड झाली, तेव्हा या नव्या नाट्यपिढीचा जनक सिंहासनाधिष्ठ झाला अशी भावना प्रकट झाली होती. पीडीए म्हणजे नैतिक मूल्यांचे कठोरपणे जतन करणारी संस्था होती. १९५७ मध्ये गो. नी. दांडेकर यांचे ‘जगन्नाथाचा रथ’ हे नवे नाटक नव्या धाटणीने रंगमंचावर आणले. पुढे वसंतराव कानेटकर यांच्या ‘वेड्याचे घर उन्हात’ या नाटकाने मराठी रंगभूमीला तीन श्रद्धास्थाने मिळाली. डॉक्टर श्रीराम लागू या नटवर्याचा सूर्य उगवला, वसंतराव कानेटकर यांचा प्रतिभाशाली नाटककार म्हणून जन्म झाला; तर भालबांना स्पर्धांच्या पातळीवर आणि नव्या कलावंताच्या वर्तुळात एक द्रष्टा दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली. 

वसंतराव कानेटकरांचे ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक आणि त्यामधील भालबांची प्रा. बल्लाळ ही भूमिका अजरामर ठरली. १९५१ ते १९७२ हा पीडीएचा गौरवशाली कालखंड ठरला आणि अनेक नवी नाटके सादर झाली. पुढे पीडीएचा रौप्यमहोत्सव साजरा झाला आणि भालबा नाट्यशिक्षणाच्या कार्यात गढून गेले. भालबांनी श्रीराम खरे, सेवाताई चौहान, दिलीप वेंगुर्लेकर असे अनेक उत्तम कलाकार तयार केले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यशिक्षण असा नवा झेंडा घेऊन भालबा तरुणांबरोबर रमलेले दिसत. ‘प्रतिभासंपन्न दिग्दर्शक, नाटकासाठी  विलक्षण मेहनत घेण्याची ताकद असलेला निर्माता,’ अशा शब्दात वसंतराव कानेटकरांनी सावंतवाडी येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात भालबांचे कौशल्य प्रकट केले. पीडीएने सुमारे ४० हून अधिक नाटके, १५ जुनी पण नव्या पद्धतीने नाटके सादर केली. भालबा जसे उत्तम दिग्दर्शक होते, तसेच ते उत्तम नटसुद्धा होते. याचा प्रत्ययही त्यांनी अनेक छोट्या मोठ्या भूमिकांतून घडवला. इतरांनी जरुरीपुरते प्रयोग केले, परंतु भालबांनी प्रयोग हीच आपली नित्याची जरुरी मानली आणि भालबा अखेरपर्यंत प्रायोगिकच राहिले. ते कधी दुभंगले नाहीत. व्यावसायिक रंगभूमीची अनेक प्रलोभने, पैसे समोर आले, परंतु त्यांनी आपली तत्त्वे आणि प्रायोगिक रंगभूमी सोडली नाही. रंगकर्मी सभ्य आणि चारित्र्यसंपन्न असावा याबद्दल भालबा आग्रही होते. कलावंतच जर सुसंस्कारी नसेल, तर त्या संस्काराचा आविष्कार प्रेक्षकांसमोर कोठल्या तोंडाने करणार, असे ते नेहमी म्हणत. भालबा भाविक रंगभूमीचे निष्ठावंत वारकरी होते. 

विज्ञान उपासक, प्रसारक आणि साहित्यिक 
भालबांचे नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही विख्यात होण्यात त्यांच्या नाट्यविषयक कर्तृत्वाचा फार मोठा वाटा  आहे, यात शंकाच नाही. परंतु भालबा खरेखुरे विज्ञानाचे उपासक होते. सर्वसामान्य लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनापासून काम करणारे विज्ञान उपासक होते. भालबांनी कॉलेजमध्ये भौतिक रसायन (फिजिकल केमिस्ट्री) हा विषय शिकवला. हा तसा किचकट विषय आहे, परंतु भालबा हा विषय इतका रंजकपणे आणि खुलवून शिकवत असत, की विद्यार्थी त्यामध्ये रंगून जात आणि त्यांना हा विषय सहज ध्यानात येई. भालबांना विज्ञानाची आणि विज्ञान प्रसाराची खरी आवड होती. ते सृष्टिज्ञान मासिकाच्या संपादक मंडळाचे २५ वर्षे सदस्य होते. तसेच, विज्ञानयुग या मासिकाचे सल्लागार म्हणून १९ वर्षे काम केले आणि या मासिकातून त्यांनी अनेक लेख लिहिले, अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या विज्ञानकथांचे सर्वत्र स्वागत झाले. ‘कमाल आहे बुवा’ ही त्यांची कथा ‘कमाल आहे भालबा’ अशी कमालीची लोकप्रिय झाली. विज्ञानविषयक लेखनाबरोबरच भालबांनी आकाशवाणी, तसेच अनेक गावात जाऊन विज्ञानावर अनेक व्याख्याने दिली. 
शेरलॉक होम्स हे भालबांचे लाडके व्यक्तिमत्त्व. यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘बनगरवाडीचे श्‍वान’सारखी त्यांची अनेक पुस्तके गाजली. भालबांच्या ‘भांडी बोलू लागली’ या लेखमालेतील पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन रामायणकार गदिमा यांच्या हस्ते झाले. सभागृहात रसिकांनी अमाप गर्दी केली होती. ज्याला मंतरलेला सोहळा म्हणता येईल, असा साहित्यसंपन्न थाटाचा प्रकाशन समारंभ होता. भालबांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे समाधान होते. सत्काराला उत्तर देताना भालबा म्हणाले, ‘गदिमांसारख्या प्रतिभासंपन्न अशा महान कवीच्या शुभहस्ते माझ्या पुस्तकांचे प्रकाशन होते आहे, हे मला मिळालेले वरदान आहे.’

कुटुंबवत्सल भालबा  
भालबा म्हणजे माझ्या वडिलांचे ज्येष्ठ बंधू. आमची एकत्र कुटुंबपद्धती होती. आम्ही त्यांना भालूकाका असे संबोधत असू. भालूकाकांच्या इंद्रधनुष्यस्वरूपी व्यक्तिमत्त्वाचा आम्हा भावंडांसमोर मोठा आदर्श आणि प्रभाव होता, आहे आणि भविष्यातही राहील. भालूकाकांना क्रिकेटची मोठी आवड होती आणि त्यांना क्रिकेटमधील बारकावे कळत. सर ब्रॅडमन, सुनील गावस्कर यांच्या क्रिकेट कौशल्याबद्दल ते भरभरून बोलत. कसोटी क्रिकेट म्हणजे तंत्रशुद्ध क्रिकेट आणि वन डे सामन्यांमध्ये तंत्रशुद्ध क्रिकेट हरवले आहे, असे ते नेहमी म्हणत. क्रिकेटमुळे आम्ही काकांशी सहजरीत्या जोडले गेलो. भालूकाका कधीही कोणालाही दुखावत नसत. ते आपल्या पत्नीला ‘अहो सौ’ असे म्हणत असत आणि मोठा मान देत असत. एखादा पुरस्कार मिळाला, की तो प्रथम देवापुढे ठेवायचा आणि नंतर तो आपल्या पत्नीला दाखवायचा असा त्यांचा शिरस्ता. निधनाच्या काही दिवस अगोदर नाट्य परिषदेने त्यांच्या नाट्य क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल, त्यांचा चांदीचे पदक देऊन सत्कार केला होता. नेहमीप्रमाणे ते पदक देवापुढे ठेवून नंतर पत्नीला दाखवले. अशा रीतीने त्यांनी आपल्या पत्नीशी सुसंवाद साधला होता. भालूकाकांची जोगेश्‍वरी देवीवर फार श्रद्धा होती. ते लहान असताना एकदा खूप आजारी होते, तेव्हा त्यांच्या मातोश्रींनी आमच्या बाळाला बरे कर, तुला दर नवरात्रात दोन किलो तेल अर्पण करेन, असा नवस जोगेश्‍वरीला  बोलला होता. आपल्या मातोश्रींचा शब्द त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ते थोर मातृभक्त होते. आपल्या मातोश्रींचा शब्द कधी मोडला नाही, दुरुत्तर केले नाही. आईच्या संस्कारांनी मी मोठा झालो, असे ते आवर्जून सांगत. त्यांच्या अंगी नम्रता तर इतकी होती, की ते नेहमी नाटकाच्या प्रयोगाला जाताना, गावाला जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घेत असत. आमच्या मोठ्या काकूंना ते नेहमी नमस्कार करत असत. भालबा नेहमी फेल्ट हॅट वापरत असत. एकदा डॉक्टर विश्‍वास मेहेंदळे यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारले ‘सर तुम्ही फेल्ट हॅट रात्रीसुद्धा का घालता?’ त्यावर भालबा उत्तरले, ‘चंद्र प्रकाश म्हणजे सूर्याचाच परावर्तित प्रकाश म्हणून घालतो आणि आयुष्यातील उन्हात वावरताना डोक्यावर फेल्ट हॅट असलेली बरी.’ या उत्तराने सारे रसिक आणि डॉक्टर मेहेंदळे मंत्रमुग्ध झाले. 
तर, असे होते भालबा. अष्टपैलू, अष्टावधानी, रंगकर्मी, चतुरस्र असलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आयुष्याच्या रंगमंचावरून ६ नोव्हेंबर १९८७ रोजी अचानक एक्झिट घेतली आणि साऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शेवटी ‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’ हेच खरे. परंतु भालबा, आमचे भालूकाका आमच्या स्मरणातून कधीही एक्झिट होणार नाहीत, त्यांच्या अनेक आठवणी चिरंतन आहेत.     

संबंधित बातम्या