वो जो था ख्वाबसा...

प्राजक्ता कुंभार 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

ब्लॉग

 

माणसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतात, त्यांच्याकडं एक्‍झिक्‍युशनचा कोणताही प्लॅन नसतो. कारण मुळात या स्वप्नवेड्यांना, स्वप्नं पूर्ण होणार की नाही ही भीती कधी नसते. यांना भीती असते ती स्वप्नांचा हा प्रवास संपण्याची! भीती असते, ती ‘आता पुढं काय?’ या डोकं पोखरणाऱ्या प्रश्‍नाची.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात. एक जे रुळलेल्या वाटांवर चालतात, मोजूनमापून स्वप्न बघतात, ‘जमेल ना आपल्याला’ हे आधी मनाशी ठरवतात, मग अगदी विचारपूर्वक आखणी करून स्वप्न बघायला सुरवात करतात.. आणि दुसरी जी स्वप्नांसाठी जगतात. ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात, त्यांच्याकडं एक्‍झिक्‍युशनचा कोणताही प्लॅन ए किंवा प्लॅन बी नसतो. कारण मुळात या स्वप्नवेड्यांना, स्वप्नं पूर्ण होणार की नाही ही भीती कधी नसते. यांना भीती असते ती स्वप्नांचा हा प्रवास संपण्याची! भीती असते, ती ‘आता पुढं काय?’ या डोकं पोखरणाऱ्या प्रश्‍नाची. 

कसंय ना, स्वप्न बघायला जशी हिंमत लागते तशीच किंबहुना त्याहून किंचित जास्तच हिंमत अवाजवी प्रयत्न करूनही पूर्ण न झालेली स्वप्नं डोळ्यातल्या पाण्यासोबत गिळायलाही लागते. हे पाणी पापणीबाहेर येऊ द्यायचं नाही.. डोळ्यातल्या स्वप्नाचा अपमान असतो तो. गिळून टाकायचं स्वप्न, कोणाला कानोकान खबर लागू द्यायची नाही, अगदी आपल्यापुरतंच ठेवायचं! चेहऱ्यावर दगडी हसू ठेवायचं आणि एकूण काय तर नाटकी जगायचं.. आणि जगतोय की आपण.. याचं समाधान मानायचं... 

स्वप्नं पूर्ण न होणाऱ्याची अवस्था, गर्भपात झालेल्या बाईसारखी असते. स्वप्नांचं ॲबॉर्शन की काय ते.. उखडून टाकायची मुळापासून.. अनवाँटेड वगैरे... ‘बाई.. मला तुझं दुःख कळतंय.. मला ते जाणवतंय...’ असं आपण कितीही म्हटलं तरी तिच्या वेदना स्वतःच्या गर्भाशयात अनुभवणं आपल्याला कुठं शक्‍य असतं? वेदना या कळू किंवा जाणवू कशा शकतात..? आपण आपले अनुभव.. ऐकीव माहितीची ठिगळं जोडून वेदना जाणवून घेण्याचा निरर्थक प्रयत्न मात्र करतो.. बरं या केवळ शारीरिक वेदना झाल्या.. मानसिक वेदनांचा हिशेब कोणी करायचा?.. 

अशी स्वप्नांसारखी स्वप्नं पहिली आणि ती पूर्ण झाली नाही की मग समजवायचं स्वतःला आणि पुन्हा चालू लागायचं. ‘अवघडंय पण अशक्‍य नाही..’ असं कुठंतरी वाचलेलं तत्त्वज्ञान आरशासमोर उभं राहून स्वतःच्या तोंडावर फेकायचं, स्वतःचीच फसवणूक करायची  आणि मग समोर येणाऱ्या वास्तवाला खदाखदा हसतं सामोरं जाण्याचं नाटकं करायचं. हे असं खदाखदा.. नाटकी हसणं महत्त्वाचं. कारण जगासोबत स्वतःचीदेखील फसवणूक करण्याचं याहून चांगलं माध्यम अजून जन्माला यायचंय. 

स्वप्नासोबत जगताना, कोणीतरी न बोलता समजून घेणं ही एक अत्यंत महत्त्वाची निकड आहे. तुमच्या स्वप्नांमध्ये तुमच्यापेक्षाही जास्त विश्‍वास ठेवणारं आणि ती पूर्ण करताना होणारी तुमची धडपड, तो प्रवास पाहून, ‘करशील गं तू’ असा अव्यक्त विश्‍वास देणारं कोणीतरी हवं. जसा स्पर्श न करता आधार देता यायला हवा, तसं समोरच्यानं काही न सांगताही त्याला समजून घेता यायला हवं. तसंही आधार कोणाला नको असतो? फक्त आधाराची व्याख्या ज्याची त्याची वेगवेगळी असते. 

मध्यंतरी मित्र भेटला होता, खूप दिवसांनी. गप्पा मारत असताना सहज त्याला विचारलं, ‘काय रे, अशी कोणती तीन स्वप्नं आहेत तुझी, जी तू मरायच्या आधी काही करून तुला पूर्ण करायची आहेत?’ तो दोन मिनिटं शांत. खूप विचार करून मग त्यानं दोन स्वप्नं शोधली, ‘मला आयुष्यात बरं काहीतरी लिहायचंय हे एक आणि मला जगभर हिंडायचंय हे दुसरं...’ तिसरं स्वप्न काही केल्या सुचेना त्याला. अर्धा तास घालवल्यावर त्यानं उगाचंच मला सांगितलं, ‘मला एक घर बांधायचं, पांढऱ्या भिंती आणि खूप साऱ्या खिडक्‍या असणारं..’ 

मला हसू आलं. जेव्हा मी इंटरनेटवर कुठंतरी ‘लास्ट थ्री ड्रीम्स’बद्दल वाचलं होतं, मी पण अशीच आवाक्‍यातली, परवडणारी तीन स्वप्नं सांगून मोकळी झाली होते. म्हणजे मरणाच्या आधीची तीन स्वप्नं म्हटली तरी ती बघताना किंवा त्यांच्याबद्दल विचार करताना आपल्यातला प्रॅक्‍टिकल अलर्ट इतका शाबूत असतो, की आपण स्वप्नही अगदी आवाक्‍यातली किंवा जी पूर्ण करणं आपल्या हातात आहेत अशीच बघतो. तिथं मरण दुय्यम ठरतं आणि ‘मला काय जमू शकेल’ हा विचार कल्पनाविष्काराच्या आधी उडी घेतो. त्यातल्या त्यात काय जमेल आपल्याला आणि कशानं हसू होणार नाही, आपला हा विचार पहिला केला मी. क्षणभर मीदेखील हे विसरले होते, की स्वप्नात काहीही बघण्याचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य असतं आपल्याला. 

स्वप्न बघणारा, त्या स्वप्नासाठी वेडा होणारा आणि ते स्वप्न अपूर्ण राहिल्यावरही नव्या जोमानं नवी स्वप्न बघणारा प्रत्येक जण माझा सहप्रवासी आहे. 

रुळलेल्या वाटांवर तर कोणीही बिनधास्त चालतं. 
पण नव्या वाटा जोखायला हिंमत - वेडेपणा असावा लागतो... 

आणि हा वेडेपणा फार क्वचित सापडतो.

संबंधित बातम्या