आदत जिसको समझे हो।

प्राजक्ता कुंभार    
शुक्रवार, 16 मार्च 2018

ब्लॉग    

टरनेटवर काहीतरी सर्च करत असताना एक इमेज अचानक डोळ्यांसमोर आली. २१/९० रुल. थोडक्‍यात काय तर, एखाद्या गोष्टीची सवय होण्यासाठी जवळपास २१ दिवसांचा कालावधी पुरेसा असतो आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग किंवा लाइफ स्टाइल व्हायला किमान ९० दिवस लागतात. आता हा जो काही रुल आहे, तो नक्की कोणत्या सवयींबद्दल आहे, तो आयुष्यात नव्याने येणाऱ्या माणसांना आणि वस्तूंना एकसारखाच लागू होतो का, हे प्रश्न मला पडले. उत्सुकता वाढली म्हणून या रिलेटेड बऱ्याच गोष्टी शोधून पहिल्या. अमेरिकेतला कुणी Maxwell Maltz नावाचा प्लास्टिक सर्जन होता म्हणे. त्याने त्याच्याकडे आलेल्या पेशंटसची मानसिक अवस्था, शरीराच्या बाह्यरूपात होणाऱ्या बदलांना स्वीकारताना होणारी भावनिक उलघाल यांची नोंद केली.
  कातडं एक असलं तरी अवयवांशी जुळलेले विचार आणि भावना कुठे एकसारख्या असतात आपल्या? आता १९५० मध्ये त्याने ही निरीक्षणं नोंदवली, तेव्हाच प्लास्टिक सर्जरीचं तंत्रही आजच्या तुलनेत मागास असणार. शस्त्रक्रियेनंतर शरीरावर बसवलेला स्वतःच्याच कातडीचा तो तुकडा खूप वेगळा दिसत आणि वाटत असणार. त्याच्याकडे येणाऱ्या आणि शस्त्रक्रिया झालेल्या लोकांशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं, की त्याच्या पेशंट्‌सना किमान २१ दिवस लागतायेत, या नव्या बदलाशी जुळवून घ्यायला आणि नंतर  ’कुठे काय बदललं, असंच तर होतं नेहमी’ हे विचार हळूहळू सुरू होतात त्यांच्या डोक्‍यात. डोक्‍यातली आधीची प्रतिमा पुसली जाऊन, तिची जागा नव्या प्रतिमेने घेणं याला एकवीस दिवस लागतात, असं निरीक्षण नोंदवलं त्याने. पुढे त्यावर पुस्तकं आली.  त्याच्या  या ’२१ डेज टू फॉर्म अ न्यू हॅबिट’ला  मुळापासून खोडून टाकणाऱ्या नव्या थिअरीजपण मांडल्या अनेकांनी. काहींनी ’काहीही...कसं शक्‍य आहे हे’ असं म्हणून उडवूनही लावला त्याला. 
आता ही थिअरी कितपत खरी-खोटी, माहिती नाही. पण वेळं आणि दिवसांच गणित बाजूला ठेवलं, तरी बदल स्वीकारायला किमान काही वेळ तरी नक्कीच लागतो, हेही तितकच खरं. निदान तो बदलाचा क्षण स्वीकारणं, पचवणं तरी भाग असतं. आता गरज म्हणून स्वीकारावे लागणारे बदलं सोडले तरी हवहवंस नावीन्य जुळवून घ्यायला किमान काही दिवस तरी द्यावे लागतातच. नव्या टूथ ब्रशने पहिल्या दिवशी दात घासताना, त्याचं वेगळेपण जाणवतच की, आपल्याला तोंडात. तिथे कोणतीही मानसिक - भावनिक गुंतवणूक नसतेच. रुटीन असतं. झाले आता इतके महिने झाले, ब्रश बदलूया, इतकं सोप्पं असतं ते. खरेदी करताना कितीही सवडीने- आवडीने घेतला तरी नकळत हेही मान्य असतं आपल्याला, की ’हा तात्पुरता बदल आहे’ आणि असे तात्पुरते बदल सतत होतं राहणार आहेत.  सवयीचा झालेला माऊस आणि किबोर्ड बदलला तर चुकल्या-चुकल्यासारखं होतंच की. आपले तळहातंच बंड पुकारल्यासारखे सांगतात,’काहीतरी बदललंय’ पण मग कालांतराने या बदलाचीही सवय होते.आयुष्यात नव्याने येणाऱ्या आणि ’कायम सोबत आहोत’ या कॅटेगिरीमध्ये असणाऱ्या माणसांच्या बाबतीतही हे असंच लागू होत असेल? सर्वात मोठी बदलांची उलथापालथ माणसंच तर घडवतात माणसांच्या आयुष्यात. माणसांचीही सवयच होतेच आपल्याला. अगदी नजरेसमोर नकोसा असणारा माणूस ’हा नजरेसमोर नकोय’ म्हणून सवयीचा होतो. अनेकदा ज्या लोकांशी पटत नाही, ज्यांचा त्रास होतो त्यांच्यासोबत न पटण्याची, त्रास होण्याचीही सवय होते आपल्याला. एखाद्याकडे जाणूनबुजून केलेलं दूर्लक्षही सवयीचं होऊन जातं आपल्याला. बोलण्याची सवय होते..नजरेची सवयं होते..आवाजातल्या चढ उताराची सवय होते... मिठीची सवय होते.. ओठांच्या स्पर्शाची सवय होते.. शरीराच्या वासांची सवय होते...त्रास होणाऱ्या अनेक गोष्टींची सवय होते आणि एका ठराविक टप्प्यानंतर एकटं राहण्याचीही सवय होते. असं होतं ना अनेकदा, कोणीतरी अचानक बोलायचं बंद करत आपल्यासोबत. म्हणजे आत्ताआत्तापर्यंत सगळं ठीक, सुरळीत चालू असतं आणि मग अचानकच थांबत सगळं. झेपत नाही, सहन होत नाही, जगायचं कसं अशा प्रश्नांची वारुळं तयार होतात आणि ’बास..संपलं सगळं’ असं वाटायला लागत आपल्याला. मग तास जातात, दिवस जातात, वर्ष जातात. पूर्वी सतत भळभळून येणारी जखम फक्त व्रण मागे ठेवते आणि मग लक्षात येत आपल्याला जगतोय की आपण. ज्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही केलेली नसते आपण, आता सवय झालेली असते त्याशिवाय जगण्याचीही. सवय..प्रकारचं भन्नाट आहे हा. तुम्हाला घडवण्याची आणि उद्‌वस्त करण्याची एकसारखी ताकद असणारा.
 या २१/९० प्रकरणाची गंमत वाटली मला. ९० दिवसांचं ’लाइफ स्टाइल’च गणित मांडायचं झालंच  तर? म्हणजे सवयीच्या जवळपास चौपट वेळ दिला तर कोणीतरी आयुष्याचा अविभाज्य भाग वगैरे होतं? एकवीस दिवसात लागणारी सवय मोडायची झाली तर? ’कुछ इश्‍क़ किया, कुछ काम किया’ असं सांगणाऱ्या पियुष मिश्राचा एक भन्नाट शेर आहे,
आदत जिसको समजे हो, 
वह मर्ज़ कभी बन जायेगा।
फिर मर्ज़ की आदत पढ़ जाएगी,
अर्ज़ न कुछ कर पाओगे।
 

संबंधित बातम्या