चालायचंच! 

प्राजक्ता कुंभार
बुधवार, 21 मार्च 2018

ब्लॉग 

इमारतीच्या चाळीसाव्या मजल्यावरून संपूर्ण मॅनहटन शहर कसं दिसेल? 

ते टेरेसवर जातात. वेळ सूर्यास्ताची. तिचं लक्ष ते संपूर्ण शहर नजरेत सामावून घेण्याकडं लागलंय आणि त्याला तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं अस्तित्व जाणवतही नाहीये. ती आवडतीये त्याला. प्रेम नसेलही कदाचित पण आवडतीये हे नक्की. तो तिच्याकडंच बघतोय. ती वाऱ्यानं उडणारे केस सावरतीये. तिलाही जाणवलीये आता त्याची पाठलाग करणारी नजर. ती वळते. तिचा तोल जातो. सावरायला जाणाऱ्या ह्याच्या हाताचा आधार घेत ती खाली झुकते आणि ती सोबत असण्यानं वेडावलेला हा.. ही ट्राइझ टू किस हर... पण ती नाकारते त्याला आणि निघून जाते. अगदीच मिनिटभराचा प्रसंग आहे हा.. श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मधला.  

तिचा तो फ्रेंच मित्र, इंग्लिश ट्युशनमधला. फक्त मित्रच. त्याला तिच्या लग्नाबद्दल, मुलांबद्दल माहितीये सगळं. तरीही त्या बंधनांच्या पलीकडं जाऊन आवडली ती त्याला.. काय करणार.. चालायचंच. इथं त्या दोघांमध्ये फसवणूक नाहीये.. तुझ्यासाठी जगेन-मरेन अशी वचनांची कोणतीही डील नाहीये. प्रेम नाहीये.. आवड आहे.. आकर्षण आहे. तिच्या आयुष्यात आपण साइड कॅरॅक्‍टर आहोत याची जाणीव आहे त्याला; पण तरीही तो क्षणिक भूल पाडणारा सपोर्टिंग रोल जगण्याची हौसपण आहे. पहिल्यांदा हा मूव्ही पाहताना ती नाकारते त्याला त्या प्रसंगाचा फारसा विचार करावासा वाटला नाही मला. पण यावेळी त्याच प्रसंगापाशी अडकले मी. तिचं नाकारणं खरंच एवढं सरळ साधं असेल? 

ती बायको आहे.. आई आहे.. या दोन गोष्टींमुळं कदाचित.. किंवा समाजाच्या चौकटीत न बसण्याचं ‘पिअर प्रेशर’ असेल कदाचित!.. कारणं सापडतीलही अनेक.. पण तिचा नकार हा नक्कीच एवढा सरळसरळ नाहीये. त्यामागं प्रचंड गुंता आहे. त्यानं तो नकार अलगद पचवलाय खरा; पण नकार देतानाची सैरभैर अवस्था तिची तिलातरी कळली असेल का, हा खरा प्रश्‍न आहे. 

नकार देणं आणि नकार पचवणं यातलं अवघड काय असेल? ‘नाही म्हणून मी बरं केलंय की चुकीचं?’ हा प्रश्‍न डोक्‍यात घेऊन जगणं अवघड असेल की ‘का नाकारलं असेल?’ या प्रश्‍नाचं उत्तर शोधणं जास्त अवघड असेल? मजाय ना. नकार देणाऱ्याकडं निवडीचं स्वातंत्र्य असतं, तो ऐकणाऱ्याकडं ते स्वीकारण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. पण हे एवढं सरळसाधं नसतं ना आणि तिथंच तर सगळा घोळ होतो. आपल्याला नकार दिलाय यात ‘नकार दिलाय’ यापेक्षाही तो ‘मला दिलाय’ हे जास्त महत्त्वाचं ठरतं; किंबहुना त्याचाच जास्त विचार केला जातो. मग नकारांच्या कारणांचा शोधही ‘मला का’ याच दिशेनं होतो. ‘माझ्यात काय कमी होतं?’पासून सुरू होणारा हा प्रवास पुढं जातच नाही.  

याउलट नकार देणाऱ्याची मानसिकता काय असेल? जर नाकारण्यामागची कारणं स्पष्ट असतील तर फारसा फरक पडत नसेलही. पण हो की नाही हेच ठरवणं अवघड जात असेल तर? निर्णयाचं स्वातंत्र्य आहेच की पण उत्तर दिल्यानंतरची जबाबदारीही आहे. पुन्हा दिलेलं उत्तर निभावून नेणंही आलंच. आत्ता नाकारलेली गोष्ट - व्यक्ती - भावना भविष्यात हवीशी वाटली तर? नकार हा अनेक चौकटींमध्ये अडकलेला असतो. करायच्या अनेक गोष्टी या चौकटींमुळे राहून जातात. चौकटी तोडण्याचं किंवा त्यातून बाहेर पडून निर्णय घेण्यासाठी धाडस लागतं. एखादी गोष्ट आवडणं किंवा हवीशी वाटणं आणि आवडलेल्या त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन ती निभावणं यात फरक आहेच. आवडण्याची हौस अगदी कोणालाही असूच शकते, पण निभावण्यासाठी हिंमत लागते, चौकटी बदलण्याची ताकद लागते. नकार पचवताना हिंमत असावी लागते, मान्य; पण अनेकदा नकार देतानाही काळीज दगडाचं करावं लागतं त्याचं काय? 

प्रत्येकाच्या आयुष्यात असं एकतरी नातं नक्कीच असतं, ज्याला ज्ञात असणाऱ्या एकाही व्याख्येत बसवता येत नाही. तुम्ही कोणालातरी भेटता आणि कोणत्यातरी एका पातळीवर एकत्र येता. ते मित्र म्हणून असेल, कुटुंब असेल, प्रेम असेल किंवा यापलीकडं जाऊन काहीतरी वेगळंही असेल जे सांगता येत नाहीये पण अनुभवता येतंय. असं मोकळीक असणारं किंवा अमिबासारखं कोणतंही ठराविक प्रारूप नसणारं नातं कितपत निभावता येईल? असं अर्थहीन कितीकाळ निभावणार? मग सुरू होतो, या प्रारूपाला एका विशिष्ट चौकटीत बसविण्याचा प्रयत्न! नात्याला नाव देण्याचा एकतर्फी प्रयत्न. मग या एकतर्फी प्रयत्नांना मिळणारा नकार समजून घेता यायला हवा आणि मग ‘चालायचंच’ म्हणून स्वीकारताही यायला हवा. 

हा ‘चालायचंच’ ॲटिट्यूड नक्की देतो काय? हा पळपुटेपणा आहे का? मला विचारलं तर नक्कीच नाही. 
‘चालायचंच’ या शब्दात जी सहजता आहे ना, ती जमिनीवर आणते तुम्हाला. ‘काही जगावेगळं घडलं नाहीये तुझ्या आयुष्यात’ हे अगदी रफली कळतं या शब्दातून. हेही समजतं, की किती वेळ अडकून पडणार आणि त्या एकाच गोष्टीभोवती फिरत बसणार? ‘चालायचंच’मध्ये सकारात्मकता आहे, सहजता आहे, स्वतःला फारसा त्रास करून न घेता पुढं जायची ताकद देणारा कोणतातरी ‘एक्‍स फॅक्‍टर’ आहे. स्वतःमध्ये काय कमी होतं, समोरच्याला नकार देताना नक्की काय चुकलं या गुंत्याच्या पलीकडं जाऊन ‘मी सांभाळू शकते हे’चं सामर्थ्य आहे या शब्दात. बदलांना स्वीकारून प्रवास सुरू ठेवण्याचं बळ देतो हा ‘चालायचंच’ ॲटिट्यूड. 

एकूण काय, तर... नकार स्वीकारता तर यायला पाहिजेच; पण नकारातून सृजन घडविण्याची ताकदही स्वतःमध्ये निर्माण करता यायला पाहिजे.  

संबंधित बातम्या