दूरियाँ भी है ज़रूरी। 

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

ब्लॉग    

असच मोबाईलवर उगाच उचकापाचक करत बसलेली असताना इनशॉर्टवर एक नोटिफिकेशन फ्लॅश झालं. राधिका आपटेची स्टोरी होती. ’Long distance relationship with husband is exhausting ’ अशी काहीशी हेडलाईन होती. राधिका आपटे हा तसाही टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे माझ्यासाठी, म्हणून मग नोटिफिकेशन ओपन करून ती स्टोरी पाहिली. मुळात ही कन्सेप्ट आणि त्यावरच तिचं मत भन्नाट वाटलं मला. तिनं या आर्टिकलमध्ये तिच्या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपला ’exhausting आणि expensive’ म्हटलं होतं, म्हणजे त्यात कोणती नकारात्मकता नव्हती किंवा ’बघा मी कसा सहन करतीये, ॲडजस्ट करतीये’ असा आविर्भावही नव्हता. जितक्‍या सहजतेने ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजे बेनेडिक्‍ट टेलरच्या प्रेमात पडली असेल, जितक्‍या सहजतेनं तिनं ते नातं एकसेप्ट केलं असेल त्याच सहजतेने ती नात्यातल्या या फेजबद्दल किंवा सिच्युएशन बद्दल व्यक्त झाली होती. तिचा अनुभव सांगताना तिने लिहिलंय, ’अनेकदा विमानप्रवासात सहप्रवासी मला विचारतात, की तुम्ही इकॉनॉमी क्‍लासने का प्रवास करता?, आता त्यांना मी कसं सांगू ,की त्याला भेटायला लंडनला जायचा प्लॅन मी इतक्‍या शेवटच्या क्षणी ठरवते आणि त्यात पुन्हा महिन्यातून ३ - ४ वेळा लंडनला जायचं.. कसं जमवू.. कसे जुळवू शेवटच्या मिनिटाचे प्लॅन?’ 

आता या सगळ्यात मला कौतुक कशाचं वाटलं असेल तर, कसलं भन्नाट नातं एक्‍सप्लोर करायला मिळत असेल ना अशावेळी, म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत आपल्या पार्टनरच्या सोबत राहणं, दिवसाचे चोवीस तास सतत उपलब्ध राहणं किंवा असा सततचा सहवास शक्‍य असणार नातं आणि असं ’लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ तेही लग्नानंतर वगैरे...तशीही आमच्या पिढीची गणितं जरा वेगळीच असतात. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप, रिबाउंड रिलेशनशिप, फ्रेंड्‌स विथ बेनिफिट्‌स, लिव्ह इन रिलेशनशिप असे नात्यांचे जमतील तसे आणि परवडतील तसे प्रकार आम्हाला सहजशक्‍य आहेत आणि सांगायचं झालं तर हे सगळे प्रकार खरंच बरे पडतात. यातून नात्यांचा गुंता नेमका कमी होतो, की वाढतो हा वेगळा मुद्दा झाला. महत्त्वाचं काय, भावनांचं नियोजन करणं आणि समोर असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं यामुळे सहज होतं. ’मला या नात्यातून हेच हवंय आणि या नात्याचा शेवट असाच झालं पाहिजे’ अशी ओढाताण यामुळे कमी होते. आता हा माझा विचार किंवा मत झालं. पण नात्यांच्या या नव्या प्रकारांबद्दल कितीही मतभिन्नता असली तरी ’आहे हे असं आहे’ असा प्रकार आहे हा. कोणी कितपत स्वीकारावं याबद्दल प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच की. 

 तर मूळ मुद्दा, लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप! मग ते दोन वेगवेगळ्या शहरात राहणं असुदे किंवा दोन देशांमध्ये, या अंतरानं कोणताही फरक न पडू देता, किंबहुना हे कित्येक किलोमीटरमध्ये मोजलं जाणारं अंतर नात्याच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, असंच स्वीकारून टिकवण्याची कसरत म्हणजे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप. भौगोलिक अंतरामुळे नाती टिकत नाहीत, ती फुलत नाहीत किंवा सहज दुरावा निर्माण होतो या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, असं वाटायला लावणारा प्रकार म्हणजे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप. कोणत्याही नात्याची कसोटीच असते ही, जमलंच पाहिजे टाईपची.  हे अंतर खूप काही शिकवून जातं अनेकदा. मुळात कोणत्याही नात्यात एकमेकांशिवाय राहणं हा प्रकार कितीही भयाण असला तरी आपण ते स्वीकारतो आणि सुरवात होते ती एका वेगळ्या टप्प्याची.

 स्पर्श अनेकदा जास्त व्यक्त होतात. शब्दांपेक्षाही नजर जास्त बोलते. पण लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप बॉस.. तिथे तुमचा पार्टनर समोर नसतो, वेळेची गणितं जुळत नाहीत, शब्दात मांडता येत नाही, तो दिसतोय स्क्रीनवर पण त्याच्या व्हर्च्युअल सोबतीचा काही फरक पडत नाही... असं खूप खूप..आणि बरच काही. पण सांभाळावं लागतं, त्यासोबत ॲडजस्ट करावं लागत, अनेक गोष्टी नव्याने पथ्य म्हणून का असेना पण स्वीकाराव्या लागतात. मुळात लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप गरज म्हणून स्वीकारावं लागत असलं तरी या नात्यातून कोणत्याही इन्स्टंट गरजा पूर्ण होण्याचा चान्स नसतो. साध्यासाध्या गोष्टी स्वतः मॅनेज तर कराव्या लागतातच पण स्वतःला सांभाळताना तुमच्या नात्यावर त्याचा काही चुकीचा इफेक्‍ट होणार नाही ना यासाठीही सतत अलर्ट राहावं लागत. मग हा सगळा वैताग कशासाठी सांभाळत बसायचा? का उगाच बदल करायचे स्वतःमध्ये? हे असं अंतरावरच नातं सांभाळणं खरंच एवढं गरजेचं असतं का? पण मग सतत तुमच्यासोबत असणारा तुमचा पार्टनर मनाने अंतरावर राहत असेल तर? हातभर अंतरावर किंवा अगदी तुमच्या कुशीत झोपणारा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत ’लॉन्ग डिस्टन्स रिलेशन’ मध्ये नसेल कशावरून ? मग तिथेही काय गरज असते नाती टिकवण्याची? 

 मुळात गरजेतून नाती निर्माण होतात हे ठीके, पण ती गरजेतूनच टिकली पाहिजेत असं वाटणं चुकीचं नाही का? म्हणजे मला तू सतत सोबत असण्याची गरज आता नाही वाटत, पण कोणत्याही गरजेशिवाय तुझं सोबत असणं हवंय मला यात चुकीचं काय? आपल्या जोडीदाराचं आपल्यावाचून फारसं अडत नाही, ही गोष्ट म्हणजे नात्यात ’ नथिंग इज हॅपनिंग’ असं कस असू शकेल. रादर आपल्या आयुष्यातली सगळीच नाती गरजेतूनच निर्माण होतात. मग ते कोणत्यातरी कुटुंबात आपला जन्म झाला म्हणून सांभाळावी लागणारी नाती असुदे किंवा स्वतःहून निर्माण केलेली नाती, ’गरज’ हा मुख्य हेतू असतोच त्यामागे. मग कालांतराने ही गरज कमी होऊन, फक्त सहवासावर येणार नातं टिकणं किंवा टिकवणं एवढं अवघड का वाटत असावं? उलट ही संकल्पनाच अफलातून नाहीये का, कोणत्याही गरजेशिवाय एखाद्याच्या सोबत राहणं.. ते नातं अनुभवणं, की सोबत राहणं हीच गरज असेल अशा नात्यांची?

संबंधित बातम्या