ओझं

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 3 मे 2018

ब्लॉग

पुस्तकं आणि चित्रपट यांचं एका बाबतीत साटलोट आहे.. ते म्हणजे आवड. आवडलेल पुस्तक कितीही वेळा वाचलं आणि आवडणारा सिनेमा कितीही वेळा पहिला तरीही प्रत्येक वेळेचा अनुभव नव्यानं समृद्ध करणारा असतो. अशा आवडणाऱ्या चित्रपटांमधे आपल्या हसण्याच्या आणि रडण्याच्या ठराविक जागाही ठरून गेलेल्या असतात, अनेकदा शेवटही तोंडपाठ झालेले असतात, पण तरीही आपला अतृप्त जीव घुटमळतो त्यांच्याभोवती. माझे असे ठराविक आवडते चित्रपट आहेत. या आवडीला विषयाचं फारसं बंधन नाही पण भावनिक गुंतागुंत यातल्या प्रत्येक चित्रपटात असतेच हेही तितकंच खरं. ’सेव्हन पाउंडस’ हा याच लिस्ट मधला. ’द परस्युट ऑफ हॅपिनेस’ सारखा अफलातून चित्रपट देणाऱ्या गॅब्रिएल मुसिनोचा सिनेमा. जोडीला ’विल स्मिथ’, और क्‍या चाहिये? 

 असं म्हणतात, की मनुष्य मेला, की त्याच्या शरीराच्या एकूण वजनातलं ’सेव्हन पाउंडस’ वजन कमी होतं, ते आपल्या आत्म्याचं वजन असतं म्हणे. मग आपल्या चुकीमुळे सात लोकांचा जीव गेला तर? तसं सिनेमाच्या या नावाला शेक्‍सपिअरच्या ’द मर्चंट ऑफ व्हेनिस’चा संदर्भपण आहे म्हणा.  ‘In seven days, God created the world. And in seven seconds, I shattered mine‘ अशा नरेशनने सुरू होतो हा सिनेमा. तुम्हाला इकडंतिकडं भटकायला क्षणभरही वेळ देत नाही. हुशार, सुसंस्कृत विल स्मिथला गाडी चालवताना मेसेज करण्याचा त्याचा निष्काळजीपणा भोवतो आणि एक भयानक अपघात होतो. ज्यात सातजणांचा जीव जातो. त्यातली एक त्याची वागदत्त वधू असते. निवांत सुरू असणारं आयुष्य सात सेकंदात बदलत आणि सात जणांच्या मृत्यूच्या जबाबदारीचं ओझं त्याच्या अंगावर येतं. दोनेक वर्ष जगतो तो कसाबसा पण त्याचा भूतकाळ सतत सोबत असतोच. या ’गुन्हेगार’ असण्याच्या टोचणीतून बाहेर पडण्यासाठी सात अनोळखी लोकांचं आयुष्य बदलण्याचा त्याचा या चित्रपटातला प्रवास विलक्षण आहे. आणि विलक्षण आहे ते स्वतःच्या चुकीची जबाबदारी घेऊन ती निस्तरण्यासाठी वाट्टेल ते सहन करण्याची त्याची तयारी. आपल्याला इतरांवर आपण केलेल्या उपकाराचे हिशेब तोंडपाठ असतात; किंबहुना आपण इतरांवर आपण केलेल्या उपकारच ओझं कसं वाढेल याचा स्वतःच्याही नकळत आपण विचार करत असतो. मनात हिशेबाची यादी तयार असते आपल्या. आपण कधी, कुठे, कसा आणि किती त्याग केला, आपण सतत किती समजून घेत राहिलो, गरज नसताना केवळ एखाद्याला हवं म्हणून किती बंधन घालत राहिलो स्वतःवर अशी न संपणारी चांगुलपणाची यादी तयार असते आपल्याकडे. कोणासाठी एखादी गोष्ट करताना, जर ती खरंच निःस्वार्थ भावनेनं केली जात असेल तर मग आपल्या हिशेबाच्या यादीत ती गोष्ट यायलाच नको. पण कोणत्याही भांडणात, कोणताही वाद सुरु असताना’ तू काय केलं आणि त्याबदल्यात मी काय काय केलं’ यावर जरा जास्तच भर असतो आपला. प्रत्येकवेळी हे समोरच्याला दाखविण्याची गरज असेलच असं नाही, पण मनातल्या गुडबुकमध्ये आपण स्वतःला अतिशय महान वगैरे ठरवून मोकळे झालेलो असतो. ’किती केलंय मी कोणाकोणासाठी’ या संदर्भाला लगेच ’पण कोणालाच माझ्या चांगुलपणाची काही जाणीव नाहीच’ स्पष्टीकरण तयार असतं आपल्याकडे. क्वचित ही सहनशीलता, समजूतदारपणाची एलओसी समोरच्याच्या मनाप्रमाणे क्रॉस करावी लागलीच तर तो ’सुपीरिअर’ असण्याचा फॅक्‍टर आपल्याच बाजूला राहण्याची आपण पुरेपूर काळजी घेतो. पण ही उपकारांची, समजून घेण्याची, ॲडजस्ट करण्याची सकारात्मकता सोडली तर, आपल्यामुळे समोरच्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक नकारात्मक गोष्टींची जबाबदारी घेण्याची कितपत तयारी असते आपली?  ‘माझ्यामुळे नाही झालं ते, तुला जमलं नाही सावरायला‘ असा ॲटिट्यूड असतो आपला तेव्हा. ’एवढं काय मोठं घडलय, नॉर्मल तर आहे आणि असं होतच राहत, की याहून मोठी संकट येतात’ हे सांगायलाही कमी करत नाही आपण. काही गोष्टी अनुभवणं कुठं शक्‍य असतं आपल्याला. आपली सारवासारव वरवरची असते. चुकीची जबाबदारी, तो प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न अशावेळी बाजूला राहतात आणि आपण स्वतःला वाचवण्याची जीवतोड मेहनत घेतो. ’माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात कधीच काहीच वाईट घडूच शकत नाही’ असा कोष असतो आपला स्वतः भोवती. 

 आपण वरवर कितीही दाखवलं तरी आपणही असं कित्येक ’मनाचं’ओझं घेऊनच फिरत असतोच. आपल्याही आयुष्यात अशा अनेक व्यक्ती येऊन, डोकावून जातात ज्यांच्या आयुष्यात आपल्यामुळे बदल होतात जे चांगले, सकारात्मक असतीलच असं नाही . आपल्याला जाणवतात हे नकारात्मक बदल. पण किती उघडपणे आपण जबाबदारी घेतो या इतरांच्या आयुष्यात आपल्यामुळे आलेल्या नकारात्मतेची? अशी जबाबदारी घेणं किंबहुना त्याची तीव्रता कमी कशी करता येईल याची प्रयत्न करणं हे खरंच एवढं अवघड असेल? की नकारात्मकता, अडचणी, समस्या या शब्दांची छटा नकोशी वाटते आपल्याला? गोष्टी शेवटाकडे येतात म्हणजे प्रत्येकवेळी त्यातून कोणतीतरी निगेटिव्ह शेड पुढे आली पाहिजे असं थोडंच आहे? चुकांतून शिकतो आपण असं म्हणतात. मग आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात घडलेली चूक स्वीकारून, नव्याने गोष्टी घडवायला काय हरकत आहे? आणि हे अगदीच शक्‍य नसेल, तर ’काही का असेना, माझ्यामुळे घडलंय हे’ एवढी जबाबदारी तरी नक्कीच घेऊ शकतो की आपण. 

संबंधित बातम्या