#Me too

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 18 मे 2018

ब्लॉग
 

या वर्षी साहित्य नोबेल कोणाला देण्यात येणार नाही, असं जाहीर केलं स्वीडिश अकादमीनं. असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला. हे महाभारत झालं ते जीन क्‍लाऊड अरनॉल्ट यांच्यामुळं. स्वीडिश अकादमीमधलं महत्त्वाच व्यक्तिमत्त्व, कवयित्री कतरिना फ्रोस्टेनसन यांचे पती जीन क्‍लाऊड अरनॉल्ट हे स्विझर्लंडच्या सांस्कृतिक वर्तुळातलं एक महत्त्वाचं नाव. या जीनवर जवळपास १८ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. आता जी अकादमी नोबेल पुरस्कार द्यायचे निर्णय घेते तिच्याच सदस्याचा महिला शोषणाशी असा संबंध उघड झाला म्हटल्यावर हा निर्णय साहजिक होता. याआधीही एक बातमी होती ऑस्कर संदर्भात ॲकॅडमी ऑफ मोशन पिचर्स अँड आटर्स सायन्स समितीने बिल कॉस्बी आणि रोमन रोलंस्की या दोघांच सदस्यत्व रद्द केलं. आता ही ॲकॅडमी म्हणजे ऑस्कर पुरस्कार देणारी. यातल्या रोमन पोलंस्कीने १९७७ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, जे कालांतराने सिद्ध झालं. बिली कॉस्बी हा अमेरिकेतला अतिशय गाजलेला टेलिव्हिजन कॉमेडियन आहे. गुगल सर्च केलं तर १९८० मध्ये असणारा बिलीचा ’द कॉस्बी शो’ पहिल्यांदा सापडेल. ’अमेरिकाझ डॅड’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या माणसाला नुकतंच लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं. हे शक्‍य झालं अँड्रिया कॉन्स्टॅंड या बाईमुळे. तिने कॉस्बी नावाच्या विकृतीचा, कामाच्या निमित्ताने होणाऱ्या शारीरिक बळजबरीचा फक्त विरोध केला नाही तर ती त्याविरुद्ध लढली आणि जिंकलीही. The Woman Who Brought Down Cosby या न्यूयॉर्क टाइम्सच्या व्हिडीओमध्ये आहे अँड्रिया कॉन्स्टॅंड हीची गोष्ट. आता या दोन्ही  बातम्यांमागचं राजकारण, ’त्याने काय फरक पडणारे’चा हा नेहमीचा विचार बाजूला ठेवला तर यात महत्त्वाचं काय? महत्त्वाचं आहे ते  #Me too. #Me too या मोहिमेचं फलित म्हणता येतील अशा या दोन बातम्या. ऑस्कर आणि नोबेल या जगभराला भुरळ पडणाऱ्या व्यासपीठांपर्यंत पोचलेली ही लैंगिक शोषणाची कीड यानिमित्ताने जगासमोर आली. मग हॉलिवूड, भारतीय सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्री पुढं आल्या आणि ’बोलू नका’  

कॅटेगिरीमधे असणाऱ्या या विषयावर बोलायला लागल्या. काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांनी ’भारताची संसदही याला अपवाद नाही’ 

सांगितल्यानं या विषयाचं वास्तव भसकन अंगावर आलं.

  #Me too, #हो बयो हे हॅश टॅग मलाही सामना करावा लागलाय या विकृतींचा असं सांगण्याचं बळ देणारा. रस्त्यावरून चालताना असो, बस रेल्वेनं किंवा अगदी विमानानं प्रवास करताना असो, सिनेमागृहात अनोळखी व्यक्तीच्या शेजारी बसताना असो,  शाळा, कॉलेज अगदी विद्यापीठ, कार्यालयीन जागा.. कुठे नाही ते विचारा. तुम्ही फक्त ठिकाण-जागा सांगा राव, आमच्यातली किमान एकजण पुढे होऊन त्या जागेविषयीचा, परिस्थितीविषयीचा तिचा विकृत अनुभव सांगेल. आर्थिक विषमतेमुळे लैंगिक शोषणाचा सामना कराव्या लागणाऱ्या स्त्रियांना बोलत करण्यासाठी ताराना बर्क या सामाजिक कार्यकर्तीमुळे सुरु झालेली ही ’मी टू’ गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात नव्या रूपात आली, हॅशटॅग Me too बनून. किमान यामुळे का असेना पण लैंगिक शोषणाविषयी बायकांनी बोलायला सुरवात केली. Me too च्या वेबसाइटवर जाऊन चेक केलं तर  You are not alone. १७,७००,००० women have reported a sexual assault since १९९८ असं पहिलं वाक्‍य ठसठशीत नजरेत भरतं आपल्या. त्यातही विचार करायला गेल तर जगभरातल्या या १ कोटी ७७ लाख बायका निदान बोलल्या, ’हो आमचं लैंगिक  शोषण झालंय’ असं. पण ज्यांना आपल्या शरीरासोबत होणारी कृती ही लैंगिक शोषण हेच कळत नसेल अशा अव्यक्त आवाजांचा हिशेब कोणी मांडायचा?

आजही किती मोकळेपणाने बोलतो आपण लैंगिक शोषणाविषयी? याविषयी व्यक्त होणाऱ्या स्त्रियांना ’फेमिनिस्ट’ या ठराविक चष्म्यातून पाहतो आपण. शरीराच्या कोणत्या भागाचा वापर नक्की कशासाठी होतो याची किंचितही जाणीव नसणाऱ्या, सर्वार्थाने पिल्लू असणाऱ्या मुलींना या विकृतींना सामोरं जावं लागतं असेल तेव्हा त्याविषयी निर्माण होणारी घृणा त्यांना शब्दात मांडता येत असेल? अशावेळी ’बाई, नको बोलू यावर, लोक काय विचार करतील तुझ्याबद्दल’ असा उलटा प्रश्न आपणच नाही का तयार ठेवत? नकोशा स्पर्शांविषयी दाद मागताही येईल कदाचित, पण नजरेनंच न्याहाळणाऱ्या आणि स्वतःच्या बाईपणाविषयी स्वतःला लाज वाटायला लावणाऱ्या प्रवृत्तींविषयी बोलणं, त्याविरुद्ध लढणं हा पल्ला लांबचाच आहे अजून मुळात अशा किती नजरांना प्रश्न विचारणार ना? पण काही का असेना, बरं वाटतंय माहितीये कोणत्याही निमित्ताने का असेना पण किमान बोलायला लागलोय आपण. हे नाहीये मर्यादित कोणत्या एका क्षेत्रापुरतं, जवळपास प्रत्येक क्षेत्रात, रोज जातायेताना या लैंगिक विकृतींचा सामना करावाच लागतोच मग याविषयी बोलायला, व्यक्त व्हायला, लढायलाच का हरकत असावी? कमीतकमी ’समाज काय म्हणेल’ या चौकटीतून तरी बाहेर पडता येईल.

संबंधित बातम्या