हरवलेला भातुकलीचा खेळ 

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 28 जून 2018

ब्लॉग
 

त्या क्षणी मला फक्त तिला उचलून घ्यायचं होतं; पण नाही शक्‍य झालं ‘ पुलित्झर पुरस्कार मिळालेल्या जॉन मूर या छायाचित्रकाराचं हे वाक्‍य. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका-मेक्‍सिकोची सीमा पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक स्थलांतरितांच्या चेहऱ्यावरची रेषांरेषा आपल्या कॅमेराच्या फ्रेममध्ये कैद करणारा हा अवलिया. मागच्या आठवड्यात त्याने काढलेला एका दोन वर्षाच्या चिमुरडीचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. वर्षानुवर्षे स्थलांतराचे फोटो काढणारा, त्यांच्या अस्वस्थतेला, त्यांच्या डोळ्यातल्या प्रश्नचिन्हांना सरावलेला हा माणूस. स्वतः काढलेला ’तिचा’ हा फोटो पाहून हादरला. ’माझ्यासाठी हे भयाण आणि अवघड होतं’ असं म्हणाला हेच त्या फोटोच अस्वस्थ वास्तव म्हणता येईल.

   अमेरिका-मेक्‍सिको बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या होंडुरास देशातल्या या कुटुंबाला सीमेवर गस्त करणाऱ्या पथकाने पकडलं. चौकशीसाठी या चिमुरडीच्या आईला ताब्यात घेण्यात आलं. दोन वर्षांचं पिल्लू ते. आईच्या कडेवरून खाली उतरवल्यापासून, तिने रडायला सुरवात केली असणार. तिचं आईकडे बघून रडायला सुरवात करणं साहजिक आहे. कारण त्यावेळी तिच्या चिमुरड्या मेंदूमध्ये सुरू असणारी भीती आणि प्रश्नांची अस्वस्थता कोणालाच कळणार नाही, ना तिला ते शब्दात सांगता येणं शक्‍य आहे. तिच्या चेहऱ्यावरच्या भीतीच्या याच वादळाला जॉनने त्याच्या फ्रेममध्ये कॅप्चर केलंय. ‘झिरोटॉलरन्स’ या अमेरिकेमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्यांसाठी असणाऱ्या धोरणाचं प्रतिनिधित्व करणारा हा फोटो. टाइम मॅगझीनने त्यांच्या जुलैच्या इश्‍यूसाठी हाच फोटो वापरलाय. ’Welcome to America ’ ही एवढी एकच ओळ असणाऱ्या टाइम्सच्या कव्हरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या चिमुरडीसोबत दिसत आहेत. याआधी २० वेळा टाइम्सच्या कव्हरवर झळकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही एकविसावी खेप नक्कीच नेहमीसारखी हॅपनिंग नाहीये.

   हा फोटो माध्यमांमध्ये आला आणि अमेरिकेला त्यांच्या या स्थलांतरितांसाठी असणाऱ्या ‘झिरोटोलरन्स’ धोरणामध्ये बदल करावा लागला. या पॉलिसीमुळे लहान मुलं, अगदी बाळही आपल्या स्थलांतरित आई बाबांपासून दूर केली जातात. कारण त्यांना या ’बेकायदेशीर प्रवेशाबद्दल’ तुरुंगात ठेवणं शक्‍य नसत. पण या चिमुरडीच्या फोटोनंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या कुटुंबाना, त्यातल्या चिल्यापिल्यांना आता वेगळं न करण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला. ’देशाच्या सीमा मजबूत ठेवताना, प्रत्येकाचं कुटुंबही एकत्र असायला हवं’ असंही ट्रम्प या निर्णयावेळी म्हणाले; पण हे सगळं इतकं सोप्पं आहे का खरंच? स्थलांतरित म्हणून वळणाऱ्या पावलांना अडवणं एवढं सहज असेल? वैयक्तिक कारणांमुळे असुदे किंवा कोणत्याही राजकीय संघर्षामुळे, स्वतःच असलेलं अस्तित्व पुसून, एका नव्या देशात नव्याने रुजायचं,  नावागावाची ओळख विसरून स्थलांतरित म्हणून ओळखलं जायचं, हे इतकं वरवरचं असू शकेल?

  स्थलांतरितांचा हा प्रश्न जिगसॉ पझलसारखा आहे. सगळे तुकडे एकमेकांमध्ये एकसंध बसतच नाहीत. माणसाला माणूस म्हणून जगू द्या, असं भावनिक उत्तरं शोधायचं म्हटलं तर प्रत्येक देशामध्ये कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या, त्या देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या प्रत्येकालाचं माणूस म्हणून पाहायला हवं. मग असा विचार केला तर मूलभूत सोयीसुविधांपासून रोजगाराच्या संधींपर्यंत प्रत्येक गोष्ट हा त्या कायदेशीर नागरिकाचाच अधिकार झाला. राजकीय उत्तरं शोधायचं म्हटलं तर स्थलांतरितांचा प्रश्न हाच अनेक सत्तासंघर्षांतून, राजकीय मतभेदांतून निर्माण झालाय. याला जातधर्म अशा समीकरणाचा आधार घेऊन सोडवायचं म्हटलं तर धर्मयुद्ध, जातींची बेगडी लक्तरं, स्व-धर्माचं श्रेष्ठत्व असे अनेक उपप्रश्न तयार आहेतच.

   स्थलांतरित आणि त्यांचे प्रश्न, हे वास्तव भयाण आहे. नागरिकत्त्वाचा पत्ता नाही किंवा असलेल्या नागरी ओळखीचा काही फायदा नाही. हक्क सांगायला घर नाही, का जातोय, कुठे जातोय, कशासाठी जातोय या प्रश्नांची ठराविक उत्तरं नाहीत. हेच करायचंय आणि असाच करायचंय अशा कोणत्याही सुशिक्षित जाणीवा नाहीत. तुम्ही अमेरिका-मेक्‍सिको म्हणा किंवा सीरिया, लीबिया म्हणा. उत्तम राहणीमान, उत्तम वेतन, कामाच्या अनेक संधी विरुद्ध ड्रग्ज, बकाल वस्त्या, दैनंदिन गरजांच्या पूर्ततेची मारामार हेच वास्तव. देशांची नाव बदला. सीमा प्रश्नांच्या व्याख्या बदला. गरिबी, युद्ध, नैसर्गिक आपत्ती, सत्तासंघर्ष अशी कारणं शोधा. वास्तव हे एकचं. भयाण, आणि त्याहून भयाण आहे या दोन वर्षांच्या चिमुरडीसारख्या अनेक लहानग्यांचं भविष्य. स्थलांतरित या लेबलचा अर्थ न कळण्याच्या वयात, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या या वास्तवाला आपल्याकडे कोणताही उत्तर नाहीये. ही हतबलता अस्वस्थ करणारी आहे.

प्रकाश संतांच्या शारदासंगीत कथासंग्रहात ’परचक्र’ नावाची गोष्ट आहे एक. त्यात गुडघ्यापर्यंत जाणारा मॅड फ्रॉक घालणारी हिरा, लंपूला गावकऱ्यांनी त्यांचं घर कसं हिरावून घेतलं, घरातलं सामान कसं पळवलं हे सांगताना, ’त्यांनी माझा भातुकलीचा खेळपण चोरून नेला’ असं सांगते आणि लंपूला ’भातुकलीचा खेळ चोरून नेल्यावर कसं वाटतं असेल? असा प्रश्न पडतो. इथे तर या चिमुरड्यांचं निरागस बालपण चोरलं जातंय आपल्या मोठ्यांच्या राजकारणात. कसं वाटतं असेल?

संबंधित बातम्या