कुछ तो लोग कहेंगे

प्राजक्ता कुंभार
मंगळवार, 17 जुलै 2018

ब्लॉग
 

‘इंतजार क्‍यूँ, लिजिए ब्लॉक कर दिया‘... हे सहाचं शब्द. दहा दिवसांहून अधिक काळ सुरू असणाऱ्या ट्रोल्सला, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे असं सहा शब्दात उत्तर दिलं. लखनौच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये घडलेल्या एका घटनेनं या सगळ्या प्रकाराची सुरवात झाली. केवळ धार्मिक कारणामुळे पासपोर्ट नाकारण्यात आल्याचा आरोप करणारं जोडपं, पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकाऱ्याची करण्यात आलेली बदली आणि या निर्णयानंतर ट्‌विटरवर सुरू झालेला हा ट्रोल्सचा खेळ. पुढे या घटनेची शहानिशा केल्यावर अनेक वेगवेगळी स्पष्टीकरणं पुढे आली आणि ’धार्मिक’ रंग दिलेल्या घटनांपैकी ही एक घटना ठरली.

प्रत्येक प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा स्वराज यांच्या कार्यपद्धतीचं अनेकदा कौतुक झालं आहे; पण यावेळी ट्‌विटरवर त्यांच्या विरुद्ध असणारे ट्रोल्स पाहून, तुमचं कौतुक करणाऱ्यासोबतच, तुम्हाला जाब विचारणारे किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा वाट्टेल तसा वापर करून सल्ले द्यायला मागे-पुढे न बघणारे लोकही असतात, हे पुन्हा एकदा दिसून आलं. 

याच आठवड्यात, काँग्रेस प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांना त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. मध्य प्रदेशात सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या गॅंगरेपनंतर चतुर्वेदी यांच्या नावाने ट्‌विटरवर फिरणाऱ्या ’फेक कोट’ची परिणिती ही बलात्काराच्या धमकीत झाली. चतुर्वेदी यांनाही या फेक ट्‌विटमुळे ट्रोल करण्यात आलं होतं.  फक्त भौगोलिक भिन्नता नाही, तर वैचारिक, आर्थिक व सामाजिक भिन्नता दूर करून, एकमेकांशी जोडू पाहणाऱ्या या समाजमाध्यमांचा ओळखीचा वाटणारा पण अनोळखी असलेला चेहरा समोर आला. सोशल मीडियावर असणारी प्रत्येकाची सहज उपलब्धता ही एकतर्फी कधीच नसते हे या प्रकरणातून पुन्हा जाणवलं. 

या दोन्ही घटना आणि त्यात संदर्भ असणाऱ्या व्यक्ती राजकीय असल्या, तरी त्यांच्या या ट्‌विटरवरच्या गोष्टीत तुमच्या माझ्यासारख्या साइड कॅरेक्‍टर्सचा बराच मोठा वाटा आहे. कारण ट्रोलिंगच्या अशा अनेक घटनांचे आपण साक्षीदार असतो. ट्रोलिंग हे सध्याचं इंटरनेट कल्चर आहे. ते योग्य की अयोग्य हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण ही चर्चा करतानाही सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असणारा ट्रोलर्सचा वावर ही वस्तुस्थिती आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. व्यक्त होणं ही अन्न, वस्त्र, निवारा यांसारखीच मूलभूत गरज झाली आहे. हे व्यक्त होणं स्वतःपुरतं असतं, तर गोष्ट वेगळी होती, पण डिजिटल मॅपिंगचा विचार केला सोशल मीडियावर टाकलेली कोणतीही पोस्ट ही वैयक्तिक उरत नाही. फेसबुक आणि जी-मेल अकाउंटवर असणारा डेटा इतरत्र वापरलं जाणं किंवा आपल्या परवानगीशिवाय शेअर होणं हे याचं ताज उदाहरण आहे. समाजमाध्यमांवर आपण कितीही बुद्धिप्रामाण्यवादी विचार मांडले, त्याला योग्य संदर्भ दिले, तरी कोणतीही वैचारिक पातळी नसणारे प्रश्न उपस्थित केले जाणार, अशा प्रश्नांना उत्तरं द्यायला तुम्ही बांधील आहात असं गृहीत धरलं जाणार आणि उत्तरं न देता तुम्ही तुमचं काम करत राहिलात, तर तुमच्यावर पळपुटेपणाचा आरोप करत पुन्हा नव्याने हे चक्र सुरू होणार असाचं हा प्रकार असतो. मुळात सोशल मीडियावर होणाऱ्या अधिकाधिक चर्चा या समोरच्याने काय लिहिलंय यापेक्षाही मला त्यावर काय वाटतं आणि तेच कसं योग्य आहे ही मतं मांडण्यातच खर्ची पडतात.

 जमावाला किंवा झुंडीला जसा चेहरा नसतो, तसंच ट्रोल्सलाही नसतो. बऱ्याचदा फेक अकाउंटच्या आडून, स्वतःची खरी ओळख लपवून हे सुरू असतं. अनेकदा हे ट्रोलर्स एकटे असतात किंवा मग समूहाने येऊन समोरच्याला कचाट्यात पकडून त्यावर ट्रोलिंग सुरू करतात. पण मग आपल्या विचारांना ट्रोल केलं जाईल म्हणून व्यक्त होणंचं बंद करावं का? फेसबुक, ट्‌विटर नको आणि ट्रोल्सही नको, अशा भूमिकेने ट्रोलिंगचा प्रश्न सुटेल का ? मुळात या समाजमाध्यमांमुळे न बोलणारे अनेकजण मोकळेपणाने बोलायला लागले आहेत. घुसमटलेले अनेक आवाज शब्दांतून, छायाचित्रांतून समाजासमोर येऊ पाहताहेत. बंधन असणाऱ्या अनेक विषयांवर खुल्या चर्चा होताहेत. ’तुला यातलं काय कळतं’ या ठराविक सुरातल्या प्रश्नाचं प्रमाण कमी होऊ लागलंय. आपण बोलतोय, सतत, एकमेकांशी. जगाशी जोडले जातोय याच माध्यमातून. मग या बीन चेहऱ्याच्या, कोणत्यातरी साचेबद्ध विचारसरणीला कवटाळून जगणाऱ्या टीचभर लोकांसाठी स्वतःवर मर्यादा घालून घेणं, मला तरी पटत नाही. ट्रोलर्स रिॲक्‍शनचे भुकेले असतात. आपण चिडलो, तावातावाने विरोध केला, की ते अधिक चेवाने अंगावर येतात. मर्यादेबाहेर जाणाऱ्या शारीरिक इजा, बलात्कार अशा धमक्‍या देणाऱ्या या इंटरनेट हल्लेखोरांसाठी सायबर सेल आहेच, पण तोपर्यंत ’कुछ तो लोग कहेंगे’ म्हणून दुर्लक्ष करता आलं तर उत्तम !!.

संबंधित बातम्या