जन पळभर म्हणतील...

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

ब्लॉग
 

मागचे काही आठवडे तसे बऱ्यापैकी अस्वस्थ करणारे होते. आत्महत्या, आत्मदहन, बलिदान, शहीद या संकल्पनांमागून डोकावणारी  ’मरण’ या नग्न सत्याची ओळख पुन्हा नव्याने करून देणारा. टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात दिसणाऱ्या ’आत्महत्यांच्या’ बातम्या  ’मरण स्वस्त’ झालंय याची जाणीव पुन्हा पुुन्हा करून देत होत्या. कारण, मग ते कोणतंही असो आणि त्याचे अपेक्षित परिणामही काही असो, पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या कृतीने संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. आठवड्याभराच्या काळात आत्महत्या केलेल्या या तरुणांच्या मानसिक अस्वस्थतेचा कितीही विचार केला तरी त्यांच्या या कृतीनंतर, त्यांच्या कुटुंबाला सहन करावं लागणार परिस्थितीच भयाण वास्तव अंगावर आल्याशिवाय राहत नाही. या आंदोलनाचे राजकीय लागेबांधे बाजूला करून, सामाजिक परिवर्तन (?) घडवू पाहणाऱ्या आंदोलनात आत्महत्या केलेल्या तरुणांकडे माणूस म्हणून पाहायचं म्हटलं तर?...

   वय असेल, तीस-पस्तीस. पाठीमागे आई-बाप, बायको, स्वतःची भावंडं. झालंच तर एक दोन चिल्लीपिल्ली. ज्यांना आई बाबा आजी-आजोबा या चौकटीपलीकडे नक्की काय आहे याचा अंदाजही न आलेला. दोन वेळच भागेल अशी नोकरी अथवा बेरोजगार. मुलांच्या भविष्याची किंवा आई वडिलांच्या वर्तमानाची तरतूद असेल- नसेल माहीत नाही. अशावेळी कोणत्यातरी सामाजिक कारणांसाठी आपण आपलं आयुष्य संपवावं असा विचार डोक्‍यात का येत असेल? आता यावर ’आंदोलनाविषयी ’ काही माहीत नसताना तुमची मतं मांडू नका किंवा ’तुला काय कळतंय आमचं दुःख, आमचा संघर्ष’ हेही ऐकायला मिळू शकता मला. पण मुळात हे आंदोलनाविषयी नाहीच आहे. हे आहे ते मरणाविषयी, आत्महत्यांविषयी, स्वतःच आयुष्य एका क्षणात संपविण्याविषयी.

   तीस-पस्तीस वय म्हणजे काही फार नाही. आयुष्यात काय करायचंय, कसं करायचंय याचा हिशोब मांडायचं वय खरंतर. ’नक्की काय हवंय आयुष्यात’ या प्रश्नाच्या उत्तराने अस्वस्थ होण्याचा काळ. अशावेळी कोणत्याही कारणांसाठी का असेना आयुष्य संपवावं, असा विचार डोक्‍यात का येत असेल? आत्महत्या करायला किती कारणं पुरेशी असतील? कोणत्याही एका कारणासाठी आयुष्य संपवण्याचा विचार करत असेल कोणी की वारुळातून एका रांगेत मुंग्या बाहेर पडाव्यात अशी कारणांची एकसंध रीघ लागत असेल? क्षणिक कारणासाठी किंवा समाजहितासाठी आयुष्य संपवावं असं का वाटेत असेल? कोणतीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाहीये असं वाटणं, भवतालच्या परिस्थितीमुळे- माणसांमुळे आयुष्याचा कंटाळा येणं, जगणं नकोस वाटणं किंवा रोजच्या जगण्यातलं नावीन्य संपलंय हे अनुभवणं किंवा असे विचार डोक्‍यात येणं तसं नॉर्मलच आहे म्हणा; पण या अशा भौतिक कारणांमुळे स्वतःच आयुष्य संपवणं? यात योग्य आणि अयोग्य ठरवायचं तरी कसं आणि कोणत्या निकषांवर?

जन्माला आलोय म्हणजे मरण अटळ आहे, अशी पुस्तकी फिलॉसॉपी बाजूला ठेवली, तरी परिस्थितीवर मात करत, संघर्ष करत, नवनव्या क्‍लृप्त्या- युक्‍त्या वापरत माणसाची जगण्याची धडपड तर आदिमानव काळापासून चालू आहे. त्यावेळी अन्न, निवारा, अग्नी, शेती अशा मूलभूत गरजांभोवती असणारी ती धडपड आता या मूलभूत परिघात इतर अनेक गरजा ओढू पाहतीये हे खरं. पण जगण्याची धडपड चालू आहे हेही कमी नाही. रोजच्या त्याच त्या रुटीनचा कितीही कंटाळा आला आणि जगणं कितीही नकोस झालं तरी आयुष्याबद्दल कोणत्या ना कोणत्या मार्गाने सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न आपल्यापैकी प्रत्येकजण नेटाने करत असतो. प्रत्येकाची जगण्याची प्रेरणा वेगळी असेलही कदाचित, पण या प्रेरणेचं एन्ड प्रॉडक्‍ट तर एकच असतं, आपण जगतो. या ना त्या मार्गाने, कोणत्या ना कोणत्या कारणाच्या आडून, कधी कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा तर कधी आर्थिक अपेक्षांचा टेकू लावत, कधी सत्वाच्या तर कधी इतरांच्या शोधात, आपण जगतो..जगत राहतो, आपल्या श्वासांमध्ये कोणतंही खंड पडू न देता.

मग जगण्याची अशी हजारो कारणं आजूबाजूला स्पष्ट दिसत असताना, कोणत्यातरी क्षणिक कारणासाठी ’बास, संपवून टाकू सगळं’ अशी इच्छा का होत असावी? स्पष्टीकरण काहीही द्या, त्या कृतीचे कोणतेही शारीरिक - मानसिक पैलू उलगडून दाखवा.

’आत्महत्या’  या गोष्टीचे समर्थन होणे अशक्‍य आहे. ’आत्महत्या करायलाही जिगर लागतं’ असं लॉजिक सांगणारे लोक, जगण्याचं एक कारण शोधायला एवढे का कचरतात हे आजही कोडंच आहे माझ्यासाठी. समाजहिताचा (?) विचार करताना आपल्या एका निर्णयाने आपलं कुटुंब, आपल्या मुलांचं भावविश्व उध्वस्त होऊ शकतं याची जाणीव का नसते? का भीती वाटते आयुष्याला खुल्या मनाने भिडायची? परिस्थितीमुळे येणारी हतबलता आपल्याला एवढं निष्क्रिय करून टाकत असेल, की मरण हा पर्याय सोप्या वाटावा? मग कोणत्याही क्षणिक कारणाने आत्महत्या करण्यापेक्षा जगणं सोप्पं आहे की. आयुष्यात अगदीच काही भव्यदिव्य मिळवायला नाही जमणार प्रत्येकाला कदाचित.  पण हातात गरम चहाचा कप घेऊन ’काय सालं आयुष्य आहे ’ असं म्हणत आयुष्यवर रोज वैतागायला काय हरकत आहे?

संबंधित बातम्या