शेवटाची परिपूर्ण अपूर्णता

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

ब्लॉग
 

‘‘मग पुढे काय होतं?’’
’’मग राजकुमार त्या पोपटाच्या कंठातला मणी काढून घेतो आणि चेटकिणीला मारून टाकतो..’’
’’मग पुढे...?’’
’’पुढे काय.. त्याचं लग्न होतं राजकुमारी सोबत..’’
’’आणि मग पुढे?’’

’’... आणि मग राजा- राणी सुखाने नांदू लागतात....दे लिव्हड हॅप्पिली एव्हर आफ्टर.’’
  आकर्षण, आवड, प्रेम या वर्तुळाची अखेर ही ’लग्न’ याच शेवटाने झाली पाहिजे ही परंपरा आहे. मुळात प्रत्येक गोष्टीला शेवट हा असायलाचं हवा? समजा ’आणि मग पुढे काय होतं?’ या प्रश्नाला , ’नाही माहिती रे, नेमकं काय होतं पुढे ते..’ असं ‘शेवटाची कोणतीही कल्पना नसणारं‘ उत्तर मिळालं तर? क्षणभर का असेना अस्वस्थ वाटेल, काही सुचणार नाही. विचार पुनःपुन्हा ’शेवट काय असेल?’ याभोवतीच घुटमळेल.  आपल्याकडे एक समीकरण फार पक्कं आहे. सुरू झालेली कोणतीही गोष्ट शेवटाकडे नेण्याचं. कसाही का असेना, पण शेवट महत्त्वाचा. मग सुरू झालेली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहून कशी चालेल? 

कालांतराने होत जाणारे बदल, येणारी स्थित्यंतर यांचा कितीही विचार केला, तरी सुरू झालेली गोष्ट कुठेतरी संपली पाहिजे हे नक्की. त्यातही तो शेवट ’सुखद’ ’हवाहवासा’ ’पॉझिटिव्ह’ या अशा चौकटींमध्येच बसणारा असेल तर क्‍या बात. पण नाहीच शक्‍य झालं, तर आदळआपट करून, गोष्टी- नाती-माणसं तोडून-मोडून-वाकवून, प्रसंगी आयुष्यातल्या अनेक संदर्भांचा वाट्टेल तसा वापर करून मिळणाऱ्या पूर्णत्वाचा सोस आपल्यापैकी प्रत्येकाला असतो. बीजगणितातलं एखादं समीकरण सोडवताना, शेवटच्या पायरीला     ’X = ...’ लिहिताना मिळणार आनंद असतो हा. तिथे अपूर्णतेला किंमत नसते; पण मग आयुष्यात नव्याने येणारी किंवा कायम सोबत असणारी माणसं, नाती असं कोणताही ठराविक वर्तुळ पूर्ण न करता, अपूर्णच राहिली तर? हव्याहव्याशा पूर्णतेची जागा, नकोशा, किंबहुना नावडत्या अपूर्णतेने घेतली तर? अनेकदा असं होतं. अगदीच चुकीच्या वेळी, योग्य माणूस आयुष्यात येतो. आता ही ’ योग्यतेची’ व्याख्या व्यक्तिपरत्त्वे बदलेलही. पण वेळ चुकीची आहे, अगदी स्पष्ट कळत असतं आपल्याला. त्या व्यक्तीसोबतच्या नात्याला कोणत्याही परिघात ठेवलं तरी पूर्ण करू शकणार नाही आपण, याची जाणीवही असते. पण तरीही या सर्व जाणिवांच्या पलीकडे जाऊन तो माणूस आयुष्यात असणं अगदीच महत्त्वाचं होऊन जात. अशावेळी तुमची गोष्ट पूर्ण होणार नाही, तिला कोणताही अपेक्षित शेवट गवसणार नाही हे स्वतःला अनेकदा समजावूनही, त्या सहवासासाठी झुकणारे आपण, अडकतो- गुंततो, आपल्याही नकळत. या नात्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हा आपल्याला माहीत नसतं किंवा नातं निर्माण होण्यामागे कोणताही ठराविक हेतू नसतो. कुठे थांबायचं, कोणत्या दिशेने प्रवास करायचाय, कुठे जाऊन पोचायचं हा कोणताही विचार आपण करत नाही.. आणि मग इथे मात्र अपूर्णता हवीशी वाटू लागते.
 नावीन्यतेचा ध्यास आणि अपूर्णतेची ओढ प्रत्येकालाच असते. पण अपूर्ण, अर्धवट  नाती- माणसांच्या गोष्टी प्रत्येकाला  सोसतीलंच असं नाही. एखादी गोष्ट अपूर्ण सोडण्याची तुमची झालेली मानसिक तयारी अनेकदा ’स्वार्थ’ म्हणूनही स्वीकारली(?) जाऊ शकतेच. प्रत्येक नात्याला ठराविक शेवटासह बघण्याची तयारी झालेलीच असते आपली. आपण आपल्यापरीने त्या चौकटी आखूनही घेतोच की. पण चौकटीच्या बाहेरची ही अशी अपूर्ण राहणारी नाती जगण्यात- अशा अर्धवट गोष्टी अनुभवण्यातही मजा असेल. एक ठराविक ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेला प्रवास तुलनेने सोप्पं असेल कदाचित. पण जिथे आपल्या वाट्याला फारसं काही येणार नाही, किंवा बदल्यात मिळणार काय हेच माहीत नसताना असं स्वैर भटकणं कसं असेल?

इतर कशाच्याही तुलनेत, नात्यांच्या वाट्याला येणारी अपूर्णता अधिक प्रगल्भ करणारी वाटते मला. अशा नात्यांमध्ये ना कोणती बंधन आहेत, ना ’हे असंच करायचंय- असंच व्हायला हवं’ अशा सुशिक्षित जाणिवा. हवं तसं एक्‍सप्लोर करा, पुढे नाही जावंस वाटल तर थांबा, पण इथेच जाऊन थांबायचं असा शेवटाचा कोणताही विचार करू नका. समोरच्याच्या आयुष्यातल्या इतर आखीव रेखीव कोणत्याही प्लॅनिंगला धक्का ना लावता, प्रसंगी फक्त देण्याचीच तयारी करून उतरायचं या खेळात, ज्याचा शेवट काय असणार हे माहीत नाही. अनुभव घ्या, समृद्ध व्हा आणि कंटाळा आला की दूर व्हा. विचार करताना, अगदी सहजसोप्प वाटतंय खरं पण सतत स्वतःच्या इच्छा किंवा स्वप्न अर्धवट ठेवणं इतकं सोप्प असेल? ’तुला सोडून जायचं नाहीये गं..पण...’ हा गोष्टी अर्धवट ठेवणारा ’पण’ प्रत्येकवेळी तितक्‍याच निर्विकारपणे स्वीकारणं शक्‍य होईल? अपेक्षित शेवटाची सवय असते आपल्या. ’सुफळ संपूर्ण’ यावर श्रद्धा असते. अशावेळी कोणताही हक्क नसला तरी सोबत संपतीये, नात्याचे संदर्भ बदलताहेत ही हुरहूर तर वाटणारच. पण ही अशा अपूर्णतेची हुरहूर सोबत घेऊन जगण्यातही मजा असेल ...अनुभवायला काय हरकत आहे?

संबंधित बातम्या