राँग टाइम, बट राइट शॉट

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

ब्लॉग
 

मला टेनिसमधलं कितपत कळतं? फार नाही. टीव्हीवर जितक्‍या रसिकतेने, एकाग्रतेने मी क्रिकेट पाहिलं असेल, त्या तुलनेत टेनिस क्वचितच पाहिलं असेल; पण सेरेना विल्यम्स या वादळाची ओळख व्हायला तुम्ही टेनिसचे डाय हार्ट फॅन असणं हा काही निकष नाही.  माझ्यापुरतं बोलायचं झालं तर ’ग्रॅंडस्लॅम’ या शब्दाची मोहिनी मला सेरेनामुळे पडली. कदाचित तिच्यामुळेच गुगल करून या खेळाची जमेल तितकी माहिती गोळा करून माझ्या उथळ ज्ञानात जमेल तशी भर घालण्याचाही प्रयत्न मी केला. त्यामुळेच  यूएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाची वर्तणूक आणि त्याविषयी निर्माण झालेला वाद मी शक्‍य तितका फॉलो केला. खरंतर सेरेना आणि वाद किंवा एकूणच टेनिस आणि वाद ही गोष्ट काही फार नवी नाही. पण हा वाद वेगळा ठरला तो सेरेनाच्या आक्रमक वर्तणुकीमुळे आणि त्यातच तिने केलेल्या लिंगभेदाच्या आरोपाने तिच्या या आक्रमकतेला वेगळा अर्थ मिळाला.

यूएस ओपनची अंतिम फेरी सेरेनासाठी खास होती हे नक्कीच. अनेक विक्रमांची बरोबरी करणाऱ्या, स्वतःचे नवे विक्रम रचणाऱ्या सेरेनाला मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी या विजेतेपदाने मिळणार होती. कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रॅंड स्लॅम टायटलसाठी, स्वतःच्या आयडॉल विरुद्ध अंतिम सामना खेळणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकासाठीही ही लढत स्वप्नवत वाटावी अशीच असणार. पण ही अंतिम फेरी गाजली ती वेगळ्याच कारणामुळे सेरेनाच्या वर्तणुकीमुळे. यानंतर झालेल्या चर्चेत सेरेनाच्या वागण्याचं समर्थन आणि तिला टोकाचा विरोध अशा दोन्ही सूर होते.

पण आपल्या वागण्याचं समर्थन सेरेनाने ‘I just feel like the fact that I have to go through this is just an example for the next person that has emotions, and that want to express themselves, and want to be a strong woman‘ 

या शब्दात केलं. मला नाही, पण किमान इतर महिला खेळाडूंना तरी माझ्या या वागण्याचा फायदा होईल असंही तिने सांगितलं. आता यात नेमकं सेरेनाचं कुठे चुकलं, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी तिच्या आक्रमक वर्तणुकीचा प्रश्न हा उरतोच. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कसे व्यक्त होता, ही गोष्ट तुम्हाला माणूस म्हणून डिफाईन करते, असं म्हणतात. तणावाच्या परिस्थिती, गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतानाही कोणतीही आदळआपट ना करता संयमाने वागलं, की तुम्ही ’गुड बॉय’ कॅटेगरीमध्ये विराजमान होता. मग हा संयम अचिव्ह करण्यासाठी तुम्ही किती मानसिक स्थित्यंतरातून जाता याच फारसं घेणंदेणं नसतं आजूबाजूच्यांना. तुमच्याकडून एक आदर्शवत वागणूक अपेक्षित असते आणि तुम्ही तसंच वागावं हे अगदीच ठरलेलं असतं. गोष्टी मनाविरुद्ध घडताना, परिस्थिती हाताबाहेर जाताना, ग्रेसफूली वागणारा - शांत राहणारा माणूस आपला आदर्श असतोच की. मग आपणही त्याने त्याच्यासाठी शोधलेली पण आपल्याला आदर्शवत वाटणारी उत्तरं स्वतःच्या आयुष्यात वापरायला सुरवात करतो. पण या सगळ्यात माणूस म्हणून असणारं आपलं  वेगळेपण आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आपली वेगळी पद्धत हे वैविध्य आपण विसरून जातो.

आताही सेरेनाच्या वागण्याच विश्‍लेषण केलं जाईल, या क्षेत्रातले अनेक दिग्गज तिचं वागणं कसं चूक किंवा कसं बरोबर हे उदाहरणांसह स्पष्ट करतील.  इतर अनेक संयमी खेळाडूंशी तिच्या वर्तणुकीची तुलनाही केली जाईल. तिचे मुद्दे योग्य असले तरी तिच्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही, असही बोललं जाईल.  माझ्यापुरत विचाराल, तर कदाचित तिची वाद घालण्याची वेळ चुकली असेल, पण तिची पद्धत चुकीचीच होती असा सरळधोपट विचार करून नाही चालणार. ’वेळेप्रमाणे गोष्टी बदलतील’ किंवा ’इतर कोणीतरी बघेल काय करायचं ते’ असा विचार करणाऱ्या अनेकांच्या तुलनेत तिचं वागणं आदर्श  नसेलही कदाचित; पण त्याला पूर्णपणे चुकीचं ठरवणं मला तरी पटत नाही. अनेकदा इतरांनी घडवलेले बदल आदर्श वाटतात आपल्याला. पण या बदलांची सुरवात स्वतःपासून करायला काय हरकत आहे? जगज्जेती खेळाडू असताना तिने असं बेजबाबदार(?) वागणं अपेक्षित नाही ही अपेक्षा रास्त आहे, पण ती आपल्यापुरतीच. माणूस म्हणून तिचं असणार वेगेळेपण नजरेआड करून कसं चालेल. तिचं वेगळेपण तिने कसं जपावं हा सर्वस्वी तिचं प्रश्न नाही का? बाईला लेबल म्हणून पाहण्यापेक्षा व्हिक्‍टिम म्हणून पाहणं जास्त सोईच असतं. कदाचित त्यामुळेच, तिने केलेल्या लिंगभेदाच्या आरोपांनी या वादाचं एकूण स्वरूपच पालटून टाकलं. पण तरीही तिने व्यवस्थेला तिच्या आक्रमक वर्तणुकीतून विचारलेला प्रश्न नजरेआड करता येणार 

नाही. तिची वेळ चुकली असेल, तिने वापरलेली पद्धत योग्य की अयोग्य यावर चर्चाही होऊ शकेल, पण प्रसंगी पेटून उठून स्वतःसाठी आक्रमकतेने लढण्याच्या तिच्या या वागण्याचं मला माझ्यापुरतं तरी नक्कीच कौतुक आहे. 
 

संबंधित बातम्या