चेहऱ्यामागचा मुखवटा

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

ब्लॉग

लहानपणी आजी आजोबांसोबत गावच्या जत्रेत फिरायला गेले, की काही वस्तूंची खरेदी ही दरवर्षी ठरलेली असायची. माझ्यासाठी त्यातली अति महत्त्वाची गोष्ट असायची ती म्हणजे ‘हनुमाना’चा मुखवटा. मातकट पिवळ्या रंगाचा, लाल भडक रंगाने ओठ रंगवलेल्या त्या मुखवट्याच कोण अप्रूप वगैरे असायचे. तो विकत घेतानाही, चेहऱ्यावर नीट बसतोय का? मुकुटाची चमकी कमी तर नाहीये ना? अशी साग्रसंगीत पारख व्हायची, आणि मग तो चेहऱ्यावर चढवायला मिळायचा. पुढचे किमान काही दिवस चेहऱ्यावर तो मुखवटा घालून आणि हातात प्लास्टिकची गदा घेऊन अंगणातून माजघरात मी ‘जय हनुमान’ वगैरे म्हणत शिस्तीत फिरायचेही.

माझ्या स्वतःच्या चेहऱ्याचे, माझ्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे काही अस्तित्व आहे, हेच विसरून जायचे मी या दोन-चार दिवसात. चेहऱ्याच्या कातडीला चिकटून असणारा हा प्लास्टिकचा मुखवटा, चेहऱ्याच्या सोबतीने माझे मी पण, क्षणभर का असेना  मला विसरायला लावायचा. काही दिवसांची झिंग असायची ही. मग हा खेळ आपसूक बाजूला पडायचा, मी दुसऱ्या खेळण्यांमध्ये रमायचे, आणि हा मुखवटा कुठेतरी अडगळीत पडायचा. मला लपवणारा, माझ्या खऱ्या अस्तित्वाला जगाच्या नजरेपासून वेगळे ठेवणारा मुखवटा दरवर्षी ना चुकता घरी येत राहिला. मात्र पुढे, स्वतःच खरे रूप इतरांपासून लपविण्यासाठी प्लॅस्टिकच्याच मुखवट्याचीच काही गरज नसते याची जाणीव झाली आणि जत्रेतील हा मुखवटा स्टॉलवर पाहण्यातच मजा वाटायला लागली.

चेहऱ्याच्या कातडीला ओढून ताणून हसवून किंवा डोळ्यातून चार थेंब गाळून स्वतःला हव्या त्या मुखवट्यामध्ये बदलता येऊ शकते, हा शोधही लागला नंतर. मग कधी स्वतःच्या स्वार्थासाठी, कधी गरज म्हणून, पुढे नोकरी वगैरे करताना, व्यावसायिक निकड म्हणून हे मुखवटे आलटून पालटून स्वतःच्या सोईनुसार वापरायला सुरुवात झाली. स्वतःला या मुखवट्याआड लपवायला शिकले. इतरांसाठी वेगळी आणि स्वतःसाठी खास, अशी स्वतःची दोन वेगळी अस्तित्व स्वतःच्याही नकळत गोंजारायला शिकले. स्वतःच्या गरजा मुखवट्याआडून मांडायला शिकले, इतरांशी बोलताना चकचकीत हसू चेहऱ्यावर मिरवायला शिकले. गंमत म्हणून चेहऱ्यावर अडकवायच्या मुखवट्यातली ‘गंमत’च विसरून गेले. अगदी आजही स्वतःपेक्षा जास्त मी माझ्या मुखवट्याच्या प्रेमात आहे, त्याला जपण्यात गुंग आहे यातच सगळे आले. 

आपण आहे तसे किती जगतो? हा माझ्यासाठी नेहमीच प्रश्न आहे. प्रश्नांना सरळसरळ भिडायची कोणती भीती असते. आपल्या मनाला हेही कळत नाही. पण स्वतःची नैसर्गिक अवस्था किंवा नैसर्गिक व्यक्तिमत्त्व स्वीकारणे फार अवघड करून ठेवले आहे आपण, असे मला तरी वाटत. तुमच्या असण्याचा कोणाला त्रास होत नसेल निदान तोपर्यंत तरी ‘आहे मी अशी‘ हे सांगताना कोणतीही लाज किंवा कमीपणा का वाटावा? कोणीतरी कुठेतरी मांडून ठेवलेल्या आदर्शवत वागण्याच्या कसोटीत अगदी कच्चे लिंबू असू आपण, पण हे किमान स्वतःशी  कबूल करण्यात कमीपणा का वाटत असावा? पण तो वाटतो. स्वतःला आदर्श म्हणून प्रोजेक्‍ट करण्याच्या नादात, आपल्यातली सहनशीलता आणि आपला समजूतदारपणा या भांडवलावर माणसं जोडतो खरी आपण. पण ही माणसं आपल्याहीपेक्षा जास्त आपल्या मुखवटी आदर्शवादाच्या प्रेमात असतात हेच विसरून जातो. 

का गरज वाटत असेल आपल्याला हा मुखवट्यांची?  स्वतःची नकोशी बाजू लपविणे हा फक्त त्याचा एक आस्पेक्‍ट झाला. पण खरेतर माणसांच्या गर्दीमध्ये वावरताना या भावनिक मुखवट्यानी मिळणारी सहजता हा खरा मुद्दा आहे. अगदी सोशल मीडियाच्या आभासी जगातही आपल्याला स्वतःची खरी ओळख लपवावीशी वाटते, काही कारण नसताना. आपल्याला सतत लपायला आवडते आणि स्वतःशीच सुरू असणाऱ्या या लपाछुपीच्या खेळात आपणच कधी भोज्या होतो हे कळतही नाही. 

जगाचे जाऊ दे, पण आपल्याला स्वतःविषयीच अनेक तक्रारी असतात, स्वतःच्या असण्याविषयी आपण अनेकदा फारसे समाधानी नसतो. माझ्याबाबतीत तर हे अनेकदा होते. मला सतत बदल हवे असतात. मग ती आजूबाजूची माणसं असू देत, आयुष्यातली नाती किंवा अगदी मी स्वतः, मला अपडेटेड राहायची प्रचंड हौस असते. काळानुसार बदलायला हवे, सतत भावनिक राहून कसे चालेल, मला माणसं त्यांच्या मूड नुसार टिकवता आली पाहिजेत, मला सतत समोरच्याला समजून घेता आले पाहिजे, अशी रोज नवी लिस्ट मी स्वतःसाठी तयार करत राहते. मग ही यादी वाढत जाते आणि मी स्वतःसाठी नवे नवे मुखवटे तयार करत राहते. स्वतःला लपवीत राहते त्यांच्यामागे. या सगळ्यात बिनधास्त जगू, खळखळून हसू, स्वतःसाठी निवांत वेळ काढू या गोष्टी माझ्या खिजगणीतही नसतात. मुखवट्यांमध्ये रमताना आपण अनेकदा स्वतःचा खरा चेहरा विसरून जातो, हे भयाण आहे, पण तितकेच खरेही आहे. स्वतःला आहे तसे स्वतःपुरते तरी स्वीकारता यायला हवे खरेतर. किमान एवढे जमले तरी गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होतील. निदान स्वतःपुरता तरी चेहऱ्यामागचा मुखवटा बाजूला करता यायला हवा.

संबंधित बातम्या