ताराची गोष्ट

प्राजक्ता कुंभार
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

ब्लॉग
 

नेटफ्लिक्‍स ओरिजिनलचा एक मूव्ही आहे, ‘वन्स अगेन’ नावाचा. अगदी सरळ सरळ सांगायचे, तर वयाची चाळिशी ओलांडलेल्या, स्वतःच्या दोन मुलांबरोबर मुंबईमध्ये रेस्टॉरंट चालवणाऱ्या विधवा बाईची आणि होऊ घातलेल्या घटस्फोटातून, नव्याने आयुष्य जगू पाहणाऱ्या एका हिंदी चित्रपट अभिनेत्याची ही गोष्ट आहे. चाळिशीनंतरच्या प्रेमाची गोष्ट. तसंही आजही आपल्याकडे पस्तिशी - चाळिशीनंतर असणारी सहवासाची गरज समजून घेतली जात नाही. या गरजेला असणारी शारीरिक आकर्षणाची जोड तर शक्‍य तितकी दुर्लक्षित केली जाते. अशावेळी, घरातल्या मुलांचं लग्नाचे वय झालेलं असताना, स्वतःच्या एकटेपणाला दूर करायचा प्रयत्न करणारी बाई अगदी एका क्षणात स्वार्थी ठरते... म्हणूनच असेल कदाचित, पण दोघांची असणारी ही गोष्ट मला ‘तारा’ची जास्त वाटते. 

ही तारा अगदी आपल्यातलीच वाटावी अशी. नवरा गेल्यानंतर, मुलांची जबाबदारी घेऊन, स्वतःच्या हिमतीवर जगणारी. रोज रात्री ‘अमर कुमार’ बरोबर ५-१० मिनिटांचा संवाद तिला पुरेसा आहे. तो तिच्या रोजच्या आयुष्यातला विरंगुळा आहे. तिने पाठवलेला डबा त्याने खाल्लाय, तो त्याच्या दिवसाबद्दल, कामाबद्दल तिच्याशी बोलतोय.. हे संवादाचे क्षण पुरेसे आहेत तिला, पण तरीही त्याला भेटण्याची हुरहूरही आहे. ही हुरहूर अगदी नव्याने प्रेमात पडलेल्या अल्लड मुलीसारखीच आहे, त्याला वयाचे बंधन नाही. त्याला जाणून घेण्याची स्त्रीसुलभ उत्सुकता आहे, त्याची काळजी घ्यायचीय तिला, पण हे सगळे करताना तिला स्वतःच्या मध्यमवर्गीय चौकटींची जाणीवही आहे. तारामध्ये झिंग आहे, ती स्वच्छंद आहे, तिच्या सहवासात वेडावण्यासारखे - गुंतण्यासारखे काही तरी आहे. ती एकाचवेळी मुक्त आहे, तर त्याचवेळी जखडलेली. तिचा निःशब्द सहवासही प्रचंड बोलका आहे. 

नवरा गेल्यापासून अगदी मुलाचे लग्न ठरेपर्यंत, स्वतःच्या कोणत्याच इच्छांचा विचार न करणारी तारा आता स्वतःसाठी जगू पाहतेय. तिला त्याचा, अमर कुमारचा सहवास एक्‍सप्लोर करायचाय. त्याच्याकडून काही फारशा अपेक्षा नाहीयेत तिला, न त्याच्या प्रसिद्धीचा हव्यास! ती समर्थ आहे स्वतःपुरती. तिला मदत नकोय, पाठिंबा नकोय, फक्त त्याचा सहवास, त्याची सोबत हवीय. 

अनेकदा नाते, मग ते नैतिक असो व अनैतिक, टिकवणे ही बाईची जबाबदारी समजली जाते. प्रसंगी नमते घेऊन, जमतील तशा तडजोडी करून ते नाते निभावून नेण्यासाठी तिला गृहीत धरले जाते. ‘आईने असेच वागावे’ ‘बायको अशीच असली पाहिजे’ ‘मैत्रिण म्हणजे अशीच’ या अशा व्याख्या आपण आपल्याही नकळत तयार करतो. आईमध्ये असणारी प्रेयसी फारशी सहजतेने स्वीकारली जात नाही, कारण आपल्या मनात असणाऱ्या ठराविक आईपणामध्ये तिचे प्रेयसी असणे बसत नाही. त्यामुळेच असेल कदाचित, पण तारा कितीही  वेगळी असली, तरी तिचे आईपण तिला पुन्हा त्याच सर्वसामान्य पातळीवर आणून ठेवते. ती मुलाच्या विरोधाला समजून घेते, स्वतःच्या इच्छांकडे मुलाच्या नजरेतून बघते. पण हे सगळे करत असताना ती, स्वतःच्या सहवासाच्या ओढीला कुठेही तिरस्कृत  नजरेने बघत नाही. तिच्या भावना नैसर्गिक आहेत, हे इतरांना पटवून देता आले नाही, तरी तिचे स्वतःपुरते ते स्वीकारणे अगदीच भावते. 

चार भिंतींआड हवीहवीशी वाटणारी अनेक नाती, दाराबाहेर पडल्यावर नकोशी वाटतात, त्यांची जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही. मुळात, ज्यांची जबाबदारी घ्यावी लागणार नाही, अशीच नाती टिकवण्याकडे कल असतो आपला. अनेकदा समोरच्याचा समजूतदारपणा गृहीत धरण्याची सवय होते. तारा आणि अमर कुमारच्या नात्यातही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नसताना एकमेकांचा हा समजूतदारपणा गृहीत धरला जातो. त्यामुळेच असेल कदाचित, पण अमर कुमारबरोबर नाव जोडले गेल्यावर, त्याचा मनःस्ताप सहन करावा लागला तरी तारा त्या परिस्थितीचा दोष त्यांच्या नात्याला देत नाही. ती स्वतः त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करते. ताराच्या प्रेमात पडायला होते ते यासाठीच. 

आजूबाजूच्या माणसांना, सतत गृहीत धरणाऱ्या आपल्याच लोकांना पुन्हा एकदा नव्याने संधी देण्याची गोष्ट म्हणजेच ताराच आयुष्य. ती तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला अशी संधी देते, चुकते, रडते, स्वतःला त्रास करून घेते, तरी पुन्हा संधी देते. तिच्यासाठी तो प्रवास स्वतःला शोधण्याचा आहे. स्वतःच्या मर्यादा तपासण्याचा आहे. अशी संधी देणे प्रत्येकाला नाही जमत, आणि समजा जमलेच तरी त्यातही ‘मी किती उपकार केलेत’ हे सतत दाखवले जाते. स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असताना, स्वतःचा स्वाभिमान, आयुष्यभर सांभाळलेली तत्त्वे हे सगळे बाजूला ठेवून नाते टिकवण्याचा प्रयत्न करणे.. मला नाही वाटत, याहून अवघड काही असेल. तुम्ही झुकता, नमते घेता, ‘आपलेच काही तरी चुकले असेल’ अशी स्वतःची समजूत घालत, पुन्हा पुन्हा त्याचे माणसाकडे जाऊन, गोष्टी वर्कआऊट करायचा प्रयत्न करता. मनासारखे काही घडणार की नाही याची कोणतीही खात्री नसताना असे स्वतःला विसरणे किती जणांना जमत असेल?

संबंधित बातम्या