ओपन सिक्रेट

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 3 जानेवारी 2019

ब्लॉग
 

मध्यंतरी इंटरनेटवर काहीतरी सर्च करत असताना एक इंटरेस्टिंग माहिती डोळ्यासमोरआली. ‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलाॅजी’ या मासिकात ‘द एक्‍सपेरिन्स ऑफ सिक्रसी’ या नावाने एक पेपर पब्लिश  झाला आहे. सीक्रेट..गुपित...या आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या आणि कितीही प्रयत्न केले तरी न टाळता येणाऱ्या घटकावर या पेपरमधला रिसर्च बेतलेला आहे. यासाठी त्यांनी या शोध प्रक्रियेत सहभागी झालेल्या वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यातल्या जवळपास १३ हजार गुपितांचा अभ्यास केलाय आणि यातून समोर आलेले निष्कर्षही खरच जगावेगळे आहेत. 

कोणताही सामान्य माणूस त्याच्या आयुष्यातल्या सरासरी १३ गोष्टी इतरांपासून लपवून, सिक्रेट म्हणून ठेवू शकतो, आणि या  गोष्टींमधल्या ५ गोष्टी या अशा असतात, की ज्या त्या व्यक्तीखेरीज इतर कोणालाही माहिती नसतात. या गुपितांचे पण प्रकार वगैरे असतात..तेही वेगवेगळे म्हणजे आपल्या छंदांपासून ते मानसिक विकृतींपर्यंत, इतरांपासून लपवलेली प्रत्येक गोष्ट यात येते, आणि या गुपितांमध्ये पहिला नंबर लागतो तो विवाहबाह्य संबंधाचा. आपल्या साथीदाराशिवाय इतर कोणाविषयी तरी वाटणार शारीरिक आकर्षण याचा. बरं, हे गुपित फक्त स्वतःपुरते ठेवणेही मानसिकदृष्ट्या दमवणारे असते, हेही समोर आले आहे. या रिसर्च मधून. कारण इतरांना सांगितले नाही, तरी आपल्या डोक्‍यात मात्र सतत त्याचा विचार सुरू असतोच. आता हे सगळेच निष्कर्षच आहेत, त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत त्यात बदल होणं साहजिक आहे. पण तरीही ‘फक्त तुला सांगितलंय हा, प्लीज कोणाला सांगू नको’ एवढ्या पुरताच मर्यादित असणाऱ्या या गोष्टीवर पेपर पब्लिश होणे आणि त्यातून असे इंटरेस्टिंग निष्कर्ष समोर येणे, ही संकल्पनाच भन्नाट वाटली मला.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही माणसासोबत आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर जोडले जातो. बरेचदा प्रेम, आकर्षण, मैत्री, सहवासाची आवड यांसारखी सकारात्मकता सोडली तर नावड, द्वेष, पराकोटीचा तिरस्कार, विश्वासघात यांसारख्या निगेटिव्ह शेड असणाऱ्या भावनाही आपल्याला अनेक माणसांशी जोडून ठेवतात. पण त्यापलीकडेही एक गोष्ट आहे, जी आपल्याला माणसांशी जोडून ठेवते, ती म्हणजे सिक्रेट्‌स. फक्त आपल्याला आणि आपल्यालाच माहीत असणारी गोष्ट आपण एखाद्याशी शेअर करतो आणि आपल्यापुरतेच असणार हे सीक्रेट आपल्याला एखाद्याशी कायमचे जोडून टाकते. बरं, इतक्‍या वर्षांची मैत्री आहे आमची किंवा अमुक वर्ष बोलत नाहीये आम्ही एकमेकांसोबत यात असणारा नात्याचा कालावधी सिक्रेट्‌स शेअर करण्यासाठी गरजेचा असतोच असे नाही. अनेकदा काही तासांच्या प्रवासात सोबत असणाऱ्याआणि याआधी कधी ना भेटलेल्या माणसाला आपण अशा गोष्टी सांगून जातो, ज्या आपल्या आयुष्यातल्या अगदी जवळच्या व्यक्तींनाही माहीत नसतात.

जितका एखाद्यासोबतचा सहवास जास्त, तितकी तुमच्यामध्ये निर्माण होणारी गुपितं जास्त, असे असेल का? म्हणजे तुमची गोष्ट जितकी रंगत जाणार, तुम्ही एकमेकांचा सहवास जितका एक्‍सप्लोर करत जाणार, तितके तुम्हाला काहीतरी नवनवं गवसणार, एकमेकांविषयी, स्वतःविषयी. मग ही गुपितांची तुमची, आणि फक्त तुमचीच गोष्ट असणार. पण हे इतकेही सरळसोट नसणार. कारण? पुन्हा तेच.. मी वर्षभर एखाद्यासोबत राहिलीये काय किंवा १० वर्ष, मी कोणापासून काय लपवतीये आणि कोणाला काय सांगितले हे फक्त मीच ठरवणार. एकूण काय, तर आयुष्यातली ती पाच, कोणालाच माहीत नसणारी सिक्रेट्‌स सोबत राहणार आपल्या, अगदी चिरंतन वगैरे.

स्वानुभव म्हणा, पण अनेकदा आपल्याला गोष्टी लपवायच्या नसतात, कारण त्या लपवल्याने आजूबाजूचा गुंता वाढत जाणार हे कळत असते. खरेतर सगळे बोलून टाकायचे असते. असे वाटते राहते, की किमान एका माणसाला तरी आपण पूर्णपणे माहिती असावे. पण हे नाही शक्‍य होत, अगदी कितीही ठरवले तरी. नात्यात कितीही विश्वास असला आणि ‘आम्ही एकमेकांना अगदी आतून बाहेरून ओळखतो’ हा अमाप पातळीचा आत्मविश्वास जरी असला तर उरतातच काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्या. 

का लपवतो या गोष्टी आपण? प्रत्येकवेळी स्वतःचा विचार करून तर नक्कीच नाही. आपली इतरांसमोर असणारी प्रतिमा अशी असावी आणि ती जपली जावी म्हणून काही गोष्टी लपवणे साहजिक आहे. ‘हे इतरांना कळाले, तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील’ असंही वाटतेच आपल्याला. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अनेकदा हे गणित उलट असते. ज्याने आपल्यावर विश्वास ठेवला, त्या पार्टनरला हा खुलासा ऐकून किती त्रास होईल.. किती वाईट वाटेल हे सतत डोक्‍यात असते आपल्या. आपण आपल्या आनंदासाठी केलेली, किंवा आपल्याला चुकीची ना वाटणारी एखादी कृती, आपल्या साथीदाराला हादरवणारी असते. ही भीती.. हेच कारण असेल कदाचित ज्यामुळे इच्छा नसतानाही अनेक गोष्टी लपवल्या जातात. पण म्हणून, नात्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी गोष्टी न लपवणे हा एकच उपाय असेल? आपली सगळी गुपितं मोकळेपणाने सांगून टाकली म्हणून खरंच कितपत निवांत जगू शकू आपण?  

संबंधित बातम्या