बदल दरबदल

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 31 जानेवारी 2019

ब्लॉग
 

नक्की काय झालंय?’ बऱ्यापैकी वैतागून मी. ‘अगं कुठे काय, सगळं नॉर्मल तर आहे...’ शक्‍य तितक्‍या समजूतदार स्वरात तो.
‘काहीच नॉर्मल नाहीये, आधी असा नव्हता वागत तू...’ चिडचिड टोकाला पोचलेली मी.
‘म्हणजे नेमकं काय वागतोय, ते सांगशील’ तो, ‘ते नाही माहिती मला , तू बदललायेस हे नक्की.. दॅट्‌स इट’ मी एकतर्फी कन्क्‍लुजन काढून मोकळी.
 
माझ्यासाठी काही गोष्टी मी खूप सोप्या करून ठेवल्या आहेत, त्यातलीच ही एक. समोरचा नेमकं काय आणि कशामुळे वागतोय, हे माझ्या बुद्धीला झेपलं नाही, की ‘तू बदलालायेस’ असं डिक्‍लेअर करून मोकळं व्हायचं. त्यातही पुन्हा, मला हव्या तशा, हव्या त्यावेळी  गोष्टी घडल्या नाहीत, की मी हेच ‘तू बदललायेस’ ऐकवून मोकळी होती. आता यातला गंमतीचा भाग सोडला, ‘बदल’ या प्रकाराविषयी एकूणच आकर्षण आहे मला. मला सतत हवे असतात हे बदल. नव्या पुस्तकांच्या खरेदीपासून ते एखाद्याशी संवाद बंद करण्यापर्यंत, कुठल्याही रेंजमध्ये हे बदल घडतात माझ्या आयुष्यात; खरंतर, मी घडवून आणते. सतत काहीतरी नवं हवं असतं, त्याच त्या गोष्टींचा, कामांचा, रुटीनचा कंटाळा येतो, आणि माझ्याकडं यावर एकच उत्तर तयार असतं ’ बदल हवा’

शाळेत असतानाही डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत माझा अतिशय लाडका होता. ’सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या एका वाक्‍यात जणू काही त्याने आयुष्य जगण्याचं गुपित वगैरे सांगून ठेवलय असं वाटायचं मला. अजूनही वाटत. बरं, या ’फिटेस्ट’ शब्दाचीही गंमत वाटायची मला, म्हणजे खूप हुशार- बुद्धिवान किंवा अतिशय ताकदवान प्रजाती, या उत्क्रांतीत तरून जाईल, असं काही अपेक्षित नव्हतं डार्विनला. तर बदलांना स्वीकारणारा, त्यांना अनुकूल प्रतिसाद देणारा जीव वाचणार, उत्क्रांत होणार असं लॉजिक होतं त्याच, आणि झालंही तेच. आपण बदलत राहिलो आणि जगलो.

मुळात माझ्यापुरता विचार करायचा झाला, तर बदल हे फक्त भौतिक असतात असं नाही वाटत मला.  म्हणजे खरंतर आजूबाजूला घडणारे बदल स्वीकारायचं म्हटलं तरी तशी स्वतःची मानसिक तयारी करावी लागतेच. पण आपल्या विचारांमध्ये किंवा एखाद्या घटनेकडं पाहण्याच्या दृष्टिकोनातही सातत्यानं बदल होतं असतात, असं वाटत मला. वस्तूंशी निगडित असणारे बदल स्वीकारणं तसं तुलनेनं सोप्पं. कारण आपल्या भावना वस्तूंभोवती गुंतलेल्या असल्या तरी वस्तू बोलत नाहीत आपल्याशी, त्याची मतं मांडत नाहीत. त्यामुळे तसं ते रिलेशन एकतर्फीच असत, पण माणसांविषयीचे बदल स्वीकारणं, म्हणजे भूमितीच्या पेपरमधला ड गट. कारण इथं मतं, भावना असणाऱ्या लोकांशी डील करावं लागतं. त्यामुळे इथं अनेक अनपेक्षित बदल स्वीकारणं अपेक्षित असतं. आपल्या सहवासामुळं माणसांना बदलताना बघणं, म्हणजे कधी त्यांच्या गरजेनुसार, कुवतीनुसार किंवा सोईनुसार, इज अ जर्नी.  तसही असं एखाद्याचा सहवासातून माणसं खरंच बदलतात का हा प्रश्नच आहे, माझ्यासाठी. समजा जर बदलत असतील तर मग ज्यांना माझ्या सहवासातून काही बरं मिळालंच नाहीये, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चुकीच्या बदलांनाही मीच जबाबदार असणं अपेक्षित आहे. खरंतर अनेकदा ‘बदल स्वीकरण्याशिवाय दुसरा पर्याय आहेच कुठे’ अशी अपरिहार्यता असते आपल्या वागण्यात. पण खरंच, इतर कोणताही पर्याय नसतो, की आपल्यालाच हवा असतो तो बदल?

आजूबाजूची माणसं बदलतात. त्यांचे स्वभाव बदलतात. आपली स्वप्नं बदलतात. जगण्याच्या इच्छा बदलतात. आवडी निवडी तर कैकदा बदलतात, आणि आपण अनेकदा स्वतःच्याही नकळत हे बदल स्वीकारतो. कधी पर्याय नाही म्हणून किंवा कधी अगदीच जग बदलायची खुमखुमी म्हणून. पण मेंदूच्या एका कोपऱ्यात, आपल्याला मनापासून  हव्या असणाऱ्या बदलांचं नोटिफिकेशन मात्र सतत फ्लॅश होतं असतं. बाकी रोजचं रुटीन बदल तर स्वीकारतोच आपण, पण जगण्याची धडपड सुरू असते ती त्याकाही हव्या असणाऱ्या बदलांसाठी, आणि गंमत म्हणजे, हे हवे ते बदल घडले तरी पुन्हा काहीतरी नवं हवंच असतं. बदलांमुळं आयुष्यात येणाऱ्या या नावीन्याची  हौस असते आपल्याला.

खरंतर बदलांच्या बाबतीत बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक असतो आपण. ‘तुझ्यासाठी म्हणून मी किती बदललय स्वतःला’ हे दाखवायचं तर असतं आपल्याला, पण असं सहज कोणीही कोणासाठी काही बदलत नाही. एकतर तो बदल आपल्याला मनापासून पटलेला तरी असतो किंवा कुठेतरी स्वतःचा मोठेपणा बिंबवायचा असतो. याउलट, आपण सांगितलेला प्रत्येक बदल समोरच्याने स्वीकारलाच पाहिजे असं अट्टहास असतो आपला. बदलांना सोईस्कर करून घेतो आपण आपल्यापुरतं. आपल्याला घडावासा वाटणारा प्रत्येक बदल हा एखाद्याच्या भल्यासाठीच आहे, या अविर्भावातच असतो अनेकदा आपण. आता त्यामागे अनुभवाची गणितही असतात. पण तरीही एखाद्याला आहे तसं स्वीकारून आपल्या आयुष्यात बदल करून घेण्यापेक्षा, आपल्याप्रमाणे बदलून मग स्वीकारणं जास्त सोयीचं वाटत अनेकदा. का होतं असावं असं, कुणास ठाऊक?  

संबंधित बातम्या