द बेस्ट वुई कॅन बी

प्राजक्ता कुंभार
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

ब्लॉग
 

‘द  बेस्ट अ मॅन कॅन गेट...’ ही ओळ वाचल्यावर डोक्‍यात नेमकं काय क्‍लिक होतं? जाहिरात आठवते?  जिलेट रेझरची? जिलेट या ब्रॅण्डची ही टॅग लाइन आहे. अगदी मोजक्‍या शब्दात, फारफारतर एखाद्या ओळीत आपल्या ब्रॅण्डची फिलॉसॉफी मांडणाऱ्या या लोकांची क्रिएटिव्हिटी मला नेहमीच भन्नाट वाटते. तर या ‘जिलेट’ने मागच्या महिन्यात एक दोन मिनिटांची शॉर्टफिल्म युट्युबला अपलोड केली होती. मागच्या वर्षभर सुरू असणाऱ्या #MeToo  ध्यानात ठेवून जवळपास तीस वर्ष मिरवलेली ‘द बेस्ट अ मॅन कॅन गेट..’ ही ओळख बदलण्याचा हा प्रयत्न होता. ‘द बेस्ट अ मॅन कॅन गेट..’कडून ‘द बेस्ट मॅन कॅन बी’ हा शब्दांचा प्रवास उलगडण्याची, त्यामागचं वास्तव समोर आणण्याची आणि खरंतर ‘पुरुषार्थाला’ नव्याने व्याख्येत बसवण्याची गोष्ट होती ही.

जिलेट रेझरची कोणतीही जाहिरात म्हणजे, आरशासमोर उभं राहून दाढी करणारा पुरुष आणि त्याच्या त्या रूपावर भाळणारी एखादी सुंदर ललना याच टिपिकल प्रकारातलं काहीतरी असणार याची सवय असणारे आपण आणि ही ठराविक गोष्ट संपल्यावर पुन्हा ‘द बेस्ट अ मॅन कॅन गेट..’ असं ऐकवून, ‘पुरुषार्थ वगैरे म्हणतात तो हाच, की काय’ असं उगाच वाटणंही आलंच. पण जवळपास तीस वर्षांची ही ओळख पुसून नव्याने ‘द बेस्ट’ जगासमोर मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न मला मनापासून आवडला.

Bullying, the MeToo movement against sexual harassment, toxic masculinity, is this the best a man can get? अशी प्रश्नार्थक सुरुवात असणाऱ्या या दोन मिनिटांनी मला खरंच विचारात पाडलं. ‘आजूबाजूला जे काही घडतंय, ते खरंच बेस्ट आहे?’ मी टू असु दे किंवा सतत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना, स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन हेच काय ते बेस्ट घडू शकतं? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांची सवय होणं, त्यात काय नवं’ असं वाटणं, गोष्ट घडल्यावर ’ कपडे कसे घालते, किती वाजता बाहेर पडली होती, सतत पुरुषांशी तर बोलत असते’ ही तीच ती कारणं देणं, आणि शेवटी पुरुष आहे तो, तुला स्वतःला जपायला हवं’ हे असे फालतू एक्‍सक्‍यूझेस देणं म्हणजे बेस्ट का? मुळात ‘पुरुषाला’ या अशा एका ठराविक चौकटीतून बघणं बेस्ट असेल? आजूबाजूला वावरणाऱ्या ओळखी- अनोळखी पुरुषांच्या अस्तित्वानं अस्वस्थ वाटणं बेस्ट असेल? नक्कीच नाही. ‘हे बेस्ट नाही’ असं उत्तर तर मिळालं, मग गरज नेमकी आहे कसली? नक्की काय बदलायला हवं?

हे १५० सेकंद सोशल मीडियावर चांगेलच हिट झाले, अर्थात दोन्ही प्रकारे. काहींनी कौतुक केलं तर काहींनी या संकल्पनेला मनापासून झिडकारलं. काहींनी ‘आम्ही आता जिलेट वापरायचं बंद करणार’ असं ठरवलं तर काहींनी ‘पुरुषांना जगूद्या की पुरुषांसारखं’ असं म्हणून उगाच निषेध वगैरेही नोंदवला.  टीव्हीवर चर्चासत्र झाली, उत्तमोत्तम वर्तमानपत्रात कॉलम छापून आले आणि कदाचित जिलेटच्या डोक्‍यात नसणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी हिट झाली. पण या सगळ्या चर्चेने  ‘आहे हे असं आहे’ या रुटीन वृत्तीला बाजूला ठेवण्याची अतिशय गरज आहे हे जगासमोर मांडलं हेही कमी नाही.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संदर्भ एकाच प्रकारे जोडत जाण्याची, आपल्याला सवय होतं जाते, अगदी आपल्याही नकळत. त्यात पुन्हा स्त्री - पुरुष असे संदर्भ घटनेला जोडले गेले, की तोच तो ठराविक विचार डोक्‍यात सुरू होतो. मग तीच ती कारणं समोर येतात आणि आपण तीच स्वतःला देत राहतो. मुद्दाम केले जाणारे स्पर्श दुर्लक्षित करणं, नजरेने अस्वस्थ वाटलं तरी समोरच्याशी हसून, नम्रतेने बोलणं मीही अनेकदा केलंय हे आणि हे सगळं होतं असताना स्वतःला तीच ती कारणंही दिलीयेत. पण या दोन मिनिटांच्या शॉर्टफिल्मने हे ‘बेस्ट’ असणं केवळ पुरुषांची गरज नाही तर माझीही गरज आहे हे लक्षात आणून दिलं माझ्या. 

चांगला माणूस असणं ही कोणत्याही एकाची गरज असूच शकत नाही. हा चांगुलपणा फक्त पुरुषांकडून अपेक्षित करणं चुकीचं आहे तसंच कोणत्याही बाईने ‘चालायचच’ म्हणून तिला अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना दुर्लक्षित करणंही चुकीचं वाटतं मला. हा चांगुलपणा, हे ‘बेस्ट’ असणं दोन्हीकडून असायला हवं. जसं घडणाऱ्या घटनांना ठराविक कारणं देणं बंद करण्याची गरज आहे, खरंतर तितकीच गरज आहे ती एकमेकांना ठराविक स्टिरीओटाइप नजरेनं पाहणं बंद करण्याची. ‘पुरुषांनी हे असं वागावं’ किंवा ‘बायकांनी असं वागायला नको’ हे ठरवत बसण्यापेक्षा कोणत्याही संदर्भ आणि दाखल्यांशिवाय एक व्यक्ती म्हणून  ‘बेस्ट’ होण्याचा हा प्रवास आपल्यापासूनच सुरू करता आला तर?      

संबंधित बातम्या