दोघात तिसरा? 

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 18 मार्च 2019

ब्लॉग
 

सरळ मुद्द्यावर येते. आपल्याकडे काही नियम अगदी ठरलेले असतात. आपल्याला बरे-वाईट सांगणारे, योग्य-अयोग्य ठरवायला मदत करणारे, झालेच तर ‘आदर्श व्यक्ती’ म्हणून घडवणारे हे नियम-कम-संस्कार आपण स्वीकारतोही. खरेतर नैतिक-अनैतिक, समाजामध्ये काय स्वीकारले जाईल, काय जाणार नाही या आधारावर तयार झालेले हे नियम पडताळून बघू, जरा त्यापेक्षा वेगळा विचार करू, हे असे काही डोक्‍यातही येत नाही अनेकदा. शिवाय हे असे ‘ठरलेले’ वागताना ते संदर्भ तुम्ही अनुभवायलाच हवेत अशी कोणतीही गरज नसते. त्यामुळे अगदी विनासायास आपण ते आपलेसेही करतो.  

एकूण काय, तर आपले एकत्र राहणे सुरळीत व्हावे म्हणून आखलेल्या या चौकटी आहेत, हा सरळसोप्पा विचार असतो त्यामागे. या नियमांच्या चौकटी सवयीच्याही होतात. ‘सगळे म्हणतात चूक, ते चूकच’ असा मेंढाळलेला प्रवास सुरू होतो आपला आणि मग ब्लॅक अँड व्हाइट यापलीकडे बघणे, स्वीकारणे शक्‍य होत नाही. व्यक्तींना, घटनांना ‘चूक की बरोबर’ यापलीकडे स्पष्टीकरण असू शकते, असू शकते एखादी ‘ग्रे’ शेड हे चटकन डोक्‍यात येत नाही.

तर मुद्दा आहे, तो दोघात डोकावणाऱ्या तिसऱ्याचा. आखून दिलेल्या नियमांमध्ये कुठेही न बसणारी आणि स्वतःसोबत नेहमीच अनेक कॉम्प्लिकेशन्स घेऊन येणारी ही तिसरी व्यक्ती कोणत्याही नात्याच्या कोणत्याच चौकटीत बसत नाही. म्हणजे विचार करायला गेले, तर आपल्याकडे गोष्टही असते ती राजा राणीची. पण या ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ प्रकारामध्ये कधीही ‘राजाची मैत्रीण’ किंवा ‘राणीचा मित्र’ डोकावत नाही. का? कारण दोघांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची गरज असू शकते, हेच आपल्याला मान्य होत नाही. दोघांचे नाते टिकवायला, दोघांमधले गैरसमज दूर करायला असणारी तिसऱ्या व्यक्तीची गरज ही फक्त तेवढ्यापुरतीच मान्य केली जाते. पण दोघांपैकी एकाच्याही आयुष्यात नैतिक(?) जोडीदाराशिवाय येऊ पाहणारी ही दुसरी व्यक्ती कधीच स्वीकारली जात नाही. स्वीकारणे ही खूपच मोठी अपेक्षा असेल कदाचित, पण या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जो त्याच त्या स्टिरीओटाइपपद्धतीने विचार केला जातो, तो जरा पडताळून बघूया असेही होत नाही.

आपल्या जोडीदाराच्या १०० टक्के गरजा आपल्याकडूनच भागाव्यात, हा विचार म्हणजे अतिरेक वाटतो मला अनेकदा. कदाचित मी जे लिहितीये किंवा जितक्‍या उघडपणे त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जरा वेगळा विचार करू बघतीये, ते चुकीचे वाटेल किंवा असेलही. पण तरीही, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ आणि ‘तू फक्त माझा आहेस’ या दोन्ही वाक्‍यांमध्ये आपला प्रेफरन्स हा ‘फक्त आणि फक्त माझा’ यालाच जास्त असतो. प्रेमापेक्षा मालकीहक्क जवळचा का वाटावा? आपल्या पार्टनरची एखादी गरज, जी आपण पूर्ण करू शकत नाही, ती दुसरे कोणीतरी पूर्ण करतेय, असे साधेसोप्पे कधी नसेलच का हे ‘तिसऱ्या’ व्यक्तीचे येणे? कदाचित हा विषय खूप गंभीर असेल... आणि माझे मत खूप वरवरचे आणि उथळही असेल, पण विचार करून बघायला काय हरकत आहे? 

कसंय, सतत नकारात्मकतेनेच बघतो आपण या तिसऱ्या व्यक्तीकडे. पण माझे कन्फ्युजन होते कुठे माहितीये... ही नकारात्मकता, त्या व्यक्तीचे खलनायक असणे आपण ठरवतो नेमके कसे? म्हणजे, माझ्या पार्टनरच्या आयुष्यात येणारी तिसरी व्यक्ती हे माझ्या वैतागाचे कारण असेलही, पण तिच्या येण्याने माझा जोडीदार आनंदी होत असेल, तर ती व्यक्ती वाईट कशी? तिचे वाईटपण फक्त मी कसे ठरवू शकते? माझ्या जोडीदाराशी असणारे नैतिक नाते मला हा अधिकार देतही असेल आणि ‘सो कॉल्ड’ समाजाच्या दृष्टीने तिचे हे ‘वाईट असणे’ जस्टीफायही होत असेल, पण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ती सर्वार्थाने आहे, त्याचे मत कोणीच विचारात घेणार नाही? त्या दोघांना चूक ठरवताना, माझी बाजू योग्य ठरणार, ती फक्त यासाठीच का की मी असे काही वागले नाही, मी प्रामाणिक वगैरे राहिले? मग त्याची गरज मोठी की माझा प्रामाणिकपणा? माझ्या अमुक एक वर्ष प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहण्याने जर माझ्या जोडीदाराच्या गरजा, मग त्या शारीरिक असो, बौद्धिक, वैचारिक किंवा मानसिक, पूर्ण होत नसतील, तर उपयोग काय? रादर, त्यानेही माझ्याप्रमाणेच वागावे ही अपेक्षा का करावी मी? एकात एक असणाऱ्या प्रश्नांचा गुंता आहे हा.. असे फक्त चूक किंवा बरोबर ठरवून नाही सुटणार. 

आता, दोघांच्या नात्यात येऊ पाहणारी प्रत्येक तिसरी व्यक्ती ही अगदीच सोज्वळ असेल किंवा फक्त अर्पण भावनेनेच येत असेल, असेही नाहीच म्हणा. कधी स्वार्थ असेल, कधी अगदीच वेळ जात नाहीये किंवा बदल हवाय अशीही कारणे असतीलच. मला गरज वाटतीये, ती ही कारणे समजून घेण्याची आणि झालेच तर त्या तिसऱ्या व्यक्तीलाही. कदाचित ज्या गरजेसाठी ती तिसरी व्यक्ती दोघांमध्ये आली, ती गरज भागवणे आपल्या हातात नसेल, पण किमान आपल्या जोडीदाराची गरज समजून घ्यायला काय हरकत आहे?   

संबंधित बातम्या