अगं अगं म्हशी

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 1 एप्रिल 2019

ब्लॉग
 

माणसाची सुखाची कल्पना काय असते? कदाचित ‘सुख म्हणजे नेमकं असतं काय’ या प्रश्नाचं उत्तर देणं फारसं सोप्पं नसेलही. पण मी माझ्यापुरता सोडवलाय हा प्रश्न, काही वर्षांपूर्वीच! माझी सुखाची व्याख्या अगदी सरळसाधी आहे. सुख म्हटलं, की रस्त्याच्या मधोमध, चेहऱ्यावर अतिशय बेफिकीर अविर्भाव घेऊन बसलेली आणि आजूबाजूला अस्तित्वात असणारी प्रत्येक व्यक्ती ‘शिंगावर’ मारलेली, काळी-किचीट्ट, वेटोळ्या शिंगांची म्हैस आणि तिच्याकडे चोवीस तास टक लावून बघण्याची मुभा असलेली मी! हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत. मला म्हैस प्रचंड आवडते. म्हणजे जरा जास्तच वगैरे. एरवीच्या कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांना सोडलं आणि चिऊ, काऊ या लाडिक नावांची यादी संपली, की माझं ‘हम्मा’ प्रेम असं उफाळून येतं.
 त्यातही रस्त्याच्या मधोमध फतकल मांडून बसलेली, आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे दुर्लक्ष करणारी, कर्कश वाजणाऱ्या हॉर्न्सची सुरेल मैफल जमवून, स्वतःची स्कीन टॅन करत, सनबाथ घेत बसलेली म्हैस मला प्रचंड प्रिय आहे. खरंतर अशावेळी, गाडी बाजूला लावून तिच्या शेजारी जाऊन बसावं, तिच्याशी दोन-चार शिळोप्याच्या गप्पा माराव्यात, जमलंच आणि तिने परवानगी दिली, तर तिच्या शेपटीला गुलाबी रिबिनीचा एखादा छानसा बो बांधून यावा, हे असं बरंच काही माझ्या डोक्‍यात असतं. पण एकूण तिचा ॲटिट्यूड बघता, ती मला खिजगणतीतही धरणार नाही, अशी भीती वाटते. मग मी माझं हे एकतर्फी प्रेम उराशी घट्ट कवटाळून, तिच्याकडे फक्त लांबूनच बघते. रस्त्यात ठाण मांडून बसणाऱ्या गाय, बैल या जीवांविषयी मला फारसं अप्रूप नाहीये. पण रस्त्यात बसलेली किंवा समोरून गाडीवर धावून येणारी म्हैस हा माझा वीकपॉइंट आहे.
 माझ्या आजूबाजूला असणाऱ्या अनेकांमध्ये लहानपणी म्हशींबरोबर फिरलेल्या, त्यांना घासून, रगडून अंघोळ वगैरे घालण्याचं सुख अनुभवलेल्या मित्रांबद्दल मला नेहमीच मत्सर वाटतो. ते त्यांच्या म्हशींना कशी अंघोळ घालायचे, त्यांच्या पाठीवर कसे बसायचे याची वर्णनं ऐकून मी आयुष्यात खूप मोठं काहीतरी मिस केलंय, असंही वाटत राहतं सतत. मध्यंतरी मी मित्राशी, ‘म्हशींची शिंग रंगवतात की नाही’ यावर चर्चा केली. हा मित्र म्हणजे, रस्त्यात कुठेही दिसणारी म्हैस मला दाखवण्याचं अखंडित व्रत घेतलेला मनुष्य आहे. अंग रंगवून, शिंगाना रिबिनी बांधून, अगदी नटून-थटून गावभर हिंडण्याचं काम फक्त गाय आणि बैल हेच करतात, असा समज होता माझा याच्याशी बोलेपर्यंत. मग त्याने ‘म्हशींची शिंगं पण रंगवतात’ असं सांगितल्यावर, मला अति-प्रचंड आनंद झाला होता. मग मी त्याला म्हणाले, पण नेलआर्ट करून देणाऱ्या स्टुडिओज सारखा म्हशीच्या शिंगावर कलाकुसर करून देणारा एखादा स्टुडिओ असायला हवा होता, असंही वाटून गेलं होतं मला तेव्हा. आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक म्हशीला किमान एकदातरी गावाकडे घेऊन जावं, तिथल्या नदीत मनसोक्त डुंबू द्यावं, हा विचारही सुरूच असतो, मेंदूच्या एका कोपऱ्यात. एकूण काय, तर जगाला जवळपास त्रासदायकचं वाटणारी ती मला मात्र नेहमीच आपलीशी आणि माझीच का वाटते, हे एक जिगसॉ पझल आहे, अजून तरी न सुटलेलं.
 माझा म्हशीसोबतचा हा इश्‍किया कधी आणि का सुरू झाला, हे आता आठवतही नाही मला. माझी स्वतःची दुधाची डेअरी वगैरे आहे किंवा घरी गोठ्यात दोन-चार म्हशी आहेत दावणीला बांधलेल्या, हे असं काही कारणही नव्हतं. त्यातही आजवरचं आयुष्य ‘पुण्यात’ घालवलेल्या मला भेटणारी ती आणि तिचा नखराही शहरीकरण झालेला. गावाकडच्या रस्त्यावर, सकाळच्या कोवळ्या उन्हात पाठ शेकत नदीकडे निवांत हलतडुलत, अंगावर धूळ उडवत जाणारी ती मला कधी दिसली नाही. पाण्यातून बाहेर आल्यावर तिच्या काळ्याशार अंगावरून टिपटिपणारं चंदेरी पाणी मी अजून एकदाही पाहिलं नाहीये. खरंतर मी अजून एकदाही स्पर्श केला नाहीये तिला. माझ्या आयुष्यात असणारी ती म्हणजे कधीतरी भर ट्रॅफिकमध्ये रस्त्याच्या एका बाजूने चालत जाणारी, झालंच तर कधीतरी नदीपात्रातल्या रस्त्याने गेल्यावर, पाण्यातून वर येऊन अधिक कळकट्ट दिसणारी. पण तरीही आय ॲड्‌मायर हर.
 तिचं बेफिकीर जगणं, मला नेहमी भूल पाडतं. ना सात्त्विकता, ना रांगडेपणा, पण तरीही तिचा स्वतःचा एक वेगळा ‘स्वॅग’ आहे. तिला डुंबायचं असेल, तर ती डुंबणार, हुंदडायचं असेल, तर रस्ता, ट्रॅफिक, गाड्या यांची फिकीर न करता हुंदडणार, शेपटीनं अंगावरच्या माश्‍या उडवत स्वतःच्या मस्तीत जगायचं तसं जगणार. वाटलंच तर एका रांगेत चालणार आणि ते नाहीच जमलं, तर रांग मोडून एखाद्या गाडीला आडवं जाणार. स्वतःचा रंग, स्वतःचा आकार याची कोणतीही तुलना नाही, की त्याविषयीची खंत नाही. स्वतःची वेटोळी शिंगं आवरत-सावरत, वेगळ्याच धुंदीत रस्त्यावरून जाताना ही दिसली, की मला क्षणभर घुटमळायला होतंच आणि कदाचित आयुष्यभर होत राहील.    

संबंधित बातम्या