फेमिनिझम, म्हणजे काय ताई?

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 13 मे 2019

ब्लॉग
 

‘फेमिनिझम म्हणजे काय गं ताई?’ हा प्रश्न पडावा आणि या विषयावर लिहावंसं वाटावं असा प्रसंग अगदी परवा परवाच घडला. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या मुलींच्या कपड्यांवर एका काकूंनी शेरेबाजी केली. ‘यात काय नवं, हे तर आपल्या आजूबाजूलाही सर्रास घडतंच की...’ असं माझ्याही डोक्‍यात येऊन गेलं. पण संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आलं, की याचा सिरियसनेस काहीतरी वेगळाच आहे बॉस. एखाद्या तिऱ्हाईताकडून ‘हे काय कपडे घातलेत’ असं तरी का ऐकावं हा प्रश्न असताना, ज्या मुलींना आपण धड ओळखतही नाही, त्यांना ‘तुम्ही हे असे कपडे घातलेत, म्हणून तुमच्यावर बलात्कार झाला पाहिजे,’ असं या काकू सांगत होत्या. बरं एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर रेस्टॉरंटमध्ये असणाऱ्या मुलांनाही त्यांनी ‘या अशा मुलींचा रेप व्हायला पाहिजे,’ असं सांगायला सुरुवात केली.

एखाद्या मुलीवर बलात्कार व्हावा असं एखाद्या बाईला वाटावं आणि तिने स्वतःच्या या ‘बिनडोक’ अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कौतुकानं गावभर मिरवावं या सगळ्याचं प्रात्यक्षिक होता हा व्हिडिओ. ‘तुम्ही जे बोलला, त्याबद्दल माफी मागा’ म्हणून या मुली मागे लागल्यावरही, या काकू मात्र बलात्कार ही जणू एखादी सेलिब्रेशनची गोष्ट आहे, या आविर्भावात शेवटपर्यंत ‘रेप व्हायला हवा, रेप व्हायला हवा’ यावरच आडून राहिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी यावर पोस्ट लिहिल्या. अनेक न्यूज चॅनेल, वेबपोर्टल्सनी यावर स्टोरी केली. आता तर यात महिला आयोगही इन्व्हॉल्व होणार आहे, असं कळतंय. प्रकरण हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर या काकूंनी स्वतःचे फालतू आणि फुकट संस्कारवर्ग थांबवत ‘मी चुकीचं बोलले, मला माफ करा’ अशा अर्थाची सपशेल शरणागतीही पत्करली (ज्याला माझ्या दृष्टीने फारसा काही अर्थ नाहीये).

बलात्काराचं एका बाईनं हे असं उदात्तीकरण करणं माझ्या आकलनापलीकडचं आहेच, पण या बुरसटलेल्या विचारांचं समर्थन करणाऱ्या अनेक बायका आजूबाजूला आहेत हे पाहिल्यावर सुन्न झाले मी. या व्हिडिओचा कॉमेंट सेक्‍शन चेक केला, की हिच्यासारख्या अनेक बायकांना ‘कपडे आणि राहणीमान’ यापलीकडं असणारं बाईपण कधी समजलंच नाही हे पाहून माझीच चिडचिड झाली. पुरुष काय विचार करतात, पुरुषांनी कसं वागलं पाहिजे, स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी पुरुषांनी कसा प्रयत्न करायला हवा, झालंच तर वूमन एम्पॉवरमेंटसाठी पुरुषांचा पुढाकार कसा गरजेचा आहे, या आणि अशा अनेक ‘पुरुषी प्रश्‍नांवर’ अमाप चर्चा झालीये, होतीये. या कॉमेंट प्रकरणात पुरुषही होतेच, पण ‘शरीराचा बलात्कार होतो म्हणजे नेमकं काय होतं’ याची जाणीव असतानाही, फक्त ‘असे कपडे घातले म्हणून बलात्कार व्हावा.’ याला प्रतिसाद देणाऱ्या बायकांना आपण नेमकं कोणत्या कृतीचं समर्थन करतोय हे तरी कळलं होतं की नाही कुणास ठाऊक.

आपल्याकडं बाईच्या मोकळेपणाला चारित्र्याशी जोडलं, की बाकी सगळं फार सोप्पं होऊन जातं आणि गंमत म्हणजे हे असे उद्योग बायकांनाच करायला जास्त आवडतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणं जगणारी, व्यक्त होणारी, स्वतःची मत मांडणारी, एकटी राहणारी, लग्न न करणारी, स्वतःच्या कृतीचं समर्थन करून त्याच्या परिणामांना सामोर जाण्याची तयारी असणारी ‘ती’ म्हणजे अनेक बायकांच्या दृष्टीनं उथळ, सेक्‍ससाठी इझिली अव्हेलेबल, पुरुषांना रिझवणारी, नात्यांमध्ये, सुखी संसारात विघ्न आणणारी ‘कोणीतरी’ ठरते किंवा ठरवली जाते. तिच्या बुद्धिमत्तेला, आकलनाला, समजूतदारपणाला ‘तिच्या कपड्यांची लांबी आणि तिचं मोकळंढाकळं वागणं’ यात मोजलं जातं. लोकांच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला साजेसं तिनं जगावं असाच अट्टाहास असतो या ठराविक बायकांचा. यामागे स्वतःला तसं जगता येत नाही याची अगतिकता असते, की तिला सतत स्पर्धक म्हणून पाहण्याची इच्छा हे मला अजून तरी समजलं नाहीये. पण स्वतःचं जगणं स्वीकारता येत नाहीये आणि तिचं फुलपाखरासारखं बागडणं सहन होतं नाहीये अशी सगळी गुंतागुंत वाटते मला ही.

फेमिनिझम किंवा स्त्रीवाद म्हणजे प्रत्येकवेळी पुरुषांच्या विरुद्ध बोलणं किंवा पुरुष कसा अन्याय करतो हे मांडत राहणं कसं असेल? फेमिनिझमची अशी संकल्पना मला तरी अर्धवट वाटते. जिथं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्न उपस्थित करते, तिथं इतरांना काही बोलण्याचा, ज्ञान देण्याचा हक्क उरतोच कुठे? आपल्याला. बलात्कार झाल्यावर ‘किती वाजता झाला, कोणते कपडे घातले होते, सोबत कोण होतं, नसेल तर रात्री एकटी का फिरत होती...’ या अशा अनेक प्रश्नार्थक नजरा आजूबाजूला असताना, एकमेकींना सोबत करण्यापेक्षा, असे संदर्भ नसणारे प्रश्न आपापसांत कुजबुजण्यात तरी काय अर्थ आहे? बाईचं बाईपण दोन अवयवांत गुंडाळून ठेवण्यापेक्षा, त्याचा शक्‍य तितक्‍या मोकळेपणानं स्वीकार होणं मला जास्त गरजेचं वाटतं. कदाचित प्रत्येकीच्या जगण्याला सपोर्ट करणं, किंवा तिने केलेल्या कृतीमागची कारणं समजून घेणं आपल्या हातात नसेलही, पण ‘ती’ आहे तशी तिला स्वीकारण्यात काय हरकत आहे?

संबंधित बातम्या