‘...तेरी याद साथ है’

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 27 मे 2019

ब्लॉग
 

मी  चौथीत असताना आजोबा गेले, आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील. खरंतर त्या वयातल्या मला माणूस जातो म्हणजे नेमकं काय होतं, हे कळण्याइतपत अक्कलही नव्हती. ‘आता पुढच्या वर्षीचा शाळेचा निकाल बघून पाचशेची करकरीत नोट माझ्या हातावर कोण ठेवणार,’ हा एवढाच विचार माझ्या पिटुकल्या मेंदूत सुरू होता.

माझ्या डोक्‍यात नोंदवली गेलेली त्यांची शेवटची आठवण म्हणजे, आजोबांच्या पायांकडं बघत अगदी स्वतःला ऐकू जाईल इतपत आवाजात पसायदान पुटपुटणारी मी, बास! पुढं सगळंच ब्लॅंक आहे... कधीतरी गमतीत त्यांनी मला सांगितलं होतं, ‘मी कधी मेलो वगैरे ना, तर माझ्या शेजारी उभं राहून तू पसायदान म्हण, मला खूप बरं वाटेल’. त्यावेळी त्यांचं असं कायमचं सोडून जाणं कळलं नाही, पण ते जिथं कुठं निघालेत, तिथं जाताना त्यांना बरं वाटलं पाहिजे, हे मात्र पक्कं होतं. नंतर आजी होती, गाव होतं, पण त्या दिवसानंतर आजोळ तुटलं ते कायमच.

माझं आणि माझ्या दादाचं लहानपण आजी-आजोबांसोबत गेलं, पण वेगवेगळ्या काळात. आई-बाबांचा जॉब, सेटल व्हायच्या अनंत अडचणी. या काळात आमच्याकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून आजोबा आम्हाला गावाला घेऊन गेले. मी आजोबांना बाबा म्हणायचे. उत्तम शिकलेले, ‘भाऊसाहेब’ म्हणून गावात मान असणारे, कौतुक-लाड करणारे आणि कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारे.

मी आईकडं परत आल्यावर, त्यांना पत्र लिहायचे. म्हणजे आईनं लिहिलेल्या पत्रात उगाच तोडकी मोडकी वाक्‍यं आणि शब्द रचना असणारा एखादा परिच्छेद. माझी आई पण ग्रेटच! माझ्यासाठी ती त्या निळ्या रंगाच्या आंतरदेशीय पत्रात एक कोपरा राखून ठेवायची. शिवाय पेन्सिल आणि पट्टीनं त्यावर रेषा मारून द्यायची. मग मीही अगदी पोक्तपणे ‘साष्टांग नमस्कार’ वगैरे करून माझ्या आयुष्यातल्या घडामोडी आजोबांना लिहून पाठवायचे. ‘पुण्यात कुठल्यातरी फन-फेअरमध्ये मी कसं एक बॉलपेन जिंकलं आणि ते मी खास दिवाळीत त्यांना कसं देणार आहे...’ इथपासून ते ‘तुमचं आडनाव जाधव आहे, मग मी कुंभार का?’ इथपर्यंत काहीही असायचं त्यात, अगदी संदर्भाशिवाय... आणि तरीही मला उत्तर मिळायचं. तेही फक्त माझ्यासाठी लिहिलेल्या वेगळ्या छोटेखानी पत्रातून. बावनकशी सुख असायचं ते!

दिवाळीत आजोळी जायचं म्हटलं, की मला दुसरं काही सुचायचं नाही. कधी एकदा ते अभ्यंगस्नान उरकतोय अन्‌ स्कूटरवर बॅग ठेवून आजोबांकडं पळतोय असं व्हायचं. मग त्यादिवशी फुलबाजे, फटाके कशाकशाकडं म्हणून लक्ष नसायचं माझं. आता आजोबांकडं जायचं म्हटल्यावर आख्खे दोन घाट लागणार आणि घाट आले, की बाबाच्या शेजारी ॲक्‍सेलेटरवर हात ठेवून मोठ्यानं ‘भुईंग...’ करणं तर आलंच.

त्यातही मी जेवढ्या जोरात ‘भुईंग’ करून ओरडणार, तेवढा जास्त स्पीड स्कूटरला मिळणार हे माझ्या यडच्याप डोक्‍यात अगदी फिक्‍स असायचं. गाडीवर मागं बसलेल्या तिघांना, घाटातून पलीकडं नेण्याची जबाबदारी इटुकल्या खांद्यांवर आहे, या ‘हाय जोश’मध्येच मी तेव्हा असायचे. माझ्या डोक्‍यातला हा मोठेपणा मी एकदा आजोबांनाही सांगितला होता. त्यावर ‘अशीच जप सगळ्यांना आयुष्यभर’ या अर्थाचं ते काहीतरी बोलले होते, जे त्यावेळी माझ्या डोक्‍यावरून गेलं होतं. डोक्‍यात शिरलं ते इतकंच की ‘आता आजोबांनीही कौतुक केलंय म्हटल्यावर आपल्या भुईंगमध्ये नक्कीच पॉवर आहे.’

मी रांगोळी काढणार म्हणून आजोबा अंगण तयार करून घ्यायचे, अगदी कौतुकानं. आजीही जमतील तितके रंग आणि किमान किलोभर पांढरी रांगोळी आणून ठेवायची. मग मीही फ्रॉक सावरत, अंगणात फतकल मांडून शक्‍य तितक्‍या अगम्य रांगोळ्या काढायचे आणि तरीही आजोबांना त्याचं कौतुक असायचं. माझ्यासारख्या हट्टी आणि चिडका बिब्बा असणाऱ्या नातीला ते कसं सहन आणि मॅनेज करायचे हा आजतागायत प्रश्नच आहे माझ्यासाठी. मुळात माझंही जमायचं ते फक्त त्यांच्यासोबतच. ‘काय करू, बोअर होतंय’ असा प्रश्न पडावा इतकाही मोकळा वेळ ते ठेवायचे नाहीत. फक्त सहवासातूनही माणूस घडतो हे कळालं ते त्यांच्यामुळंच. 

कधीकाळी मला आजोबांच्या देवघरातल्या मूर्तीचं प्रचंड अप्रूप होतं. आजोळी असताना या देवांना अंघोळ घालणं, अगदी जीव लावून पूजा करणं हे सगळं अगदी कौतुकानं करायचे मी. पण निघायचा दिवस आला, की मला ते सगळे देव सोबत हवे असायचे. त्यावेळी भोकाड पसरून रडणाऱ्या मला उगी करताना आजोबा सांगायचे ‘अगं तुझेच तर आहेत, तुलाच देणारे. फक्त थोडे दिवस मी सांभाळतो.’  

मध्यंतरी आजीला भेटायला गावी गेल्यावर तिनं त्याचं सगळ्या मूर्त्या मला दिल्या. ‘एकटी असतेस, सोबत ठेव’ म्हणून. खरंतर आता ना देवाचं अप्रूप उरलंय ना देवपूजेचं. मला परवडेल आणि जमेल अशी श्रद्धा आहे फक्त आता. पण तरीही आजीला नाही म्हणता आलं नाही. त्या निर्जीव सोबतीत आजोबांचं असणं... सरळसरळ ब्लॅकमेलिंग आहे यार...!

संबंधित बातम्या