जातीची जातकुळी

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 1 जुलै 2019

ब्लॉग
 

मी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होते. हॉस्टेलचा कंटाळा आणि एकटीने मैत्रिणीसोबत फ्लॅट शेअर करून राहायची खुमखुमी. म्हणून कॉलेजच्या आसपास दोघींना राहता येईल, असा फ्लॅट शोधायला आम्ही सुरुवात केली. नेमकं अशातच मित्रानं कॉलेजजवळ पेइंगेस्ट म्हणून जागा मिळू शकेल असं सांगितलं. निवांत बंगला होता. खालच्या मजल्यावर ते काका काकू आणि वरच्या मजल्यावर पेइंगेस्टची जागा. गेटमधून आत शिरतानाच आम्ही दोघींनी ‘ही जागा फायनल’ असं ठरवूनही टाकलेलं. त्या काकांनीही आम्हाला अगदी काळजीपूर्वक जागा दाखवली. त्यांच्या नियम-अटी वगैरे सांगितल्या. भाडंही आमच्या बजेटमधलंच होतं.

जवळपास सगळं फिक्‍स झाल्यावर त्या काकांनी ‘मूळ गाव कोणतं? आई-बाबा काय करतात?’ अशी चौकशी सुरू केली आणि मग ते मूळ मुद्द्याकडं वळाले. कुंभार म्हणजे नेमकी कोणती जात? ‘जयभीम’वालं नाही ना तुमच्यापैकी कोणी? नाही तसं काही असेल, तर आताच सांगा, आम्हाला जागा द्यायची नाहीये. त्यांचे प्रश्न आणि स्पष्टीकरण ऐकून मला आपण नक्की कोणत्या काळात जगतोय असं वाटलं. जागा भाड्यानं देणं किंवा न देणं हे तिथं राहायला येणाऱ्या व्यक्तीच्या जातीवर कसं कोणी ठरवू शकत हे समजत नव्हतं. चिडचिड झाली, वैतागले आणि एकवेळ पुन्हा हॉस्टेलला राहावं लागलं तरी चालेल, पण ‘इथं राहायचं नाही’ असं त्यांना तोंडावर सांगून बाहेर पडले.

पुढे ‘आडनावावरून जात शोधणारे’ अनेक महाभाग आयुष्यात भेटले. पत्रकारितेचं शिक्षण घेताना, ‘एका ठराविक जातीमुळं वर्गात ही पहिली आली’ हे शेरेही ऐकले. पण एव्हाना या सगळ्यांवर रिॲक्‍ट होणं बंद झालं होतं. असे लोकं आणि त्यांचे जातीचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न दुर्लक्ष करायला शिकले होते. हे विचित्र आहे हे कळत होतं, पण आयुष्यात भेटणाऱ्या अनेकांच्या चांगुलपणामुळं हे असे अपवाद सवयीनं नजरेआड करायला शिकले... आणि कदाचित इथेच ‘पायल’ कमी पडली किंवा तिला होणारा त्रास हा या नजरेआड करण्याच्या बेसिक टप्प्यापलीकडचा असणार.

तिने आत्महत्या केली आणि सवयीचंच झाल्यासारखं पुरोगामी महाराष्ट्र हादरला, झालंच तर हळहळला. न्यूजपेपरचे मथळे, टीव्ही चॅनेलची ब्रेकिंग न्यूज सगळ्या सगळ्यांची जागा पायलनं घेतली. या घटनेचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर आले. चौकशी समिती नेमण्यात आली. आरोपींना अटक झाली आणि पुन्हा एकदा आपण जातीपातींच्या गाळात कितपत अडकलोय हे जगजाहीर झालं.

जातपंचायतीचे निर्णय, आंतरजातीय लग्नांना होणारा विरोध, देशभरात कुठे ना कुठे सुरू असणारे जातीय दंगे आणि जातींच्या समीकरणावर आधारलेलं राजकारण ही अशी जातीय कुरतड नेहमीच सगळ्या बाजूंनी सुरू असते. त्यात नवं काही नाही. पण शिक्षणानं आलेलं वैचारिक शहाणपण, अनुभवातून आलेली प्रगल्भता किमान यांमुळं तरी जातीची ही मगरमिठी सोडवता येईल असं मला उगाच वाटायचं. पण ‘पायल तडवी’ प्रकरणानं ते साफ चुकीचं ठरवलं.

झालेल्या बालमुकुंद भारती प्रकारणांनंतर, ‘कोटा स्टुडन्ट’ म्हणून हिणवलं जाणं, तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा तुमच्या जातीचा वारंवार उल्लेख करून तुम्हाला कमी लेखणं हे कितपत मानसिक खच्चीकरण करणार असू शकत याचं वास्तव समोर आलं होतं. या आत्महत्येनंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनं आपल्या अहवालात कॉलेजच्या शैक्षणिक वातावरणाशी आणि स्पर्धेशी जुळवून घेण्यात बालमुकुंदला अपयश आलं असं मत मांडलं. आपली जात लपवण्यासाठी, स्वतःचं नाव बदलून घेण्याची गरज वाटणाऱ्या बालमुकुंदला या वातावरणात निवांत श्वास घ्यायला वेळ तरी मिळाला होता की नाही कुणास ठाऊक? मग रोहित आणि आता पायल. त्यातल्या त्यात ‘आपल्याला किमान ही तीनच नावं माहिती आहेत’ हे सुख. या अशा प्रकारांकडं रोज ठरवून दुर्लक्ष करणारे कितीजण असतील कुणास ठाऊक.

शिक्षणपद्धतीमध्ये असणाऱ्या आरक्षणाविरुद्ध असणारी चीड, या नियमांमुळं टक्केवारीत मिळणारी सूट हेच विरोधाचं मुख्य कारण. पण या प्रश्नावर ‘एखाद्याचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्येला प्रवृत्त करणं’ हे उत्तर कसं असू शकेल. आरक्षणाविरुद्ध भांडायचंच आहे, तर एकमेकांविरुद्ध सर्व ताकदीनिशी उभ्या राहणाऱ्या दोन्ही गटांनी एकमेकांचा किमान जगण्याचा अधिकार मान्य करणं ही अपेक्षा रास्त नाही का? आरक्षणाविषयी व्यक्त होताना ‘आमच्यावर अन्याय होतोय’ हे वाटणं साहजिक आहे आणि ते वाटणं दोन्ही बाजूंनी असणारच. गरज आहे ती या दोन्ही बाजू समजून घेऊन सुवर्णमध्य काढण्याची. भाषा, शब्दांचे उच्चार, देहबोली, एकूण वागणूक यातून एकमेकांच्या जातींचा ‘गेसिंग गेम’ खेळणं आधी बंद करायला हवं. कोणत्याही जातीय संदर्भाशिवाय एकमेकांसोबत राहू पाहणारे, एकमेकांना मदत करणारेही अनेक सकारात्मक जीव आहेतच आपल्या आजूबाजूला. जातींच्या वास्तवाला न्युट्रल करायचं असेल, तर या अशाच अनेकांची गरज आहे. वैचारिक पुरोगामित्व मिरवायचं असेल, तर ते आधी स्वतःमध्ये रुजवायला हवं, नाहीतर ‘शाहू, फुले, आंबेडकर..’ फक्त भाषणापुरतेच उरतील, नाही का?  

संबंधित बातम्या