‘वास्तवाशी संबंध नाही..’ खरंच?

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

ब्लॉग
 

जुलैच्या पहिल्या आठवड्यात द हिंदूवर मी एक बातमी वाचली. जयपूरच्या शाळकरी मुलांनी आधारकार्डचे फोटो मोबाइलमध्ये काढून, त्यात स्वतःची जन्मतारीख आणि वय बदलण्याचा उद्योग केला होता. बरं, ही अशी एक-दोन मुलं नव्हती, त्यांची संख्या बऱ्यापैकी होती. आता त्यांनी हे असं का केलं, हा प्रश्न पडला असेल, तर हा सगळा जुगाड होता तो ’A’ रेटेड असणारा कबीर सिंग सिनेमा पाहण्यासाठी.
 दोन सेकंद मला त्या पोरांच्या हुशारीचं कौतुकच वाटलं आणि त्यांच्या वयाचे असताना आपण अगदीच ‘बावळट’ कॅटगरीत होतो असंही उगाच वाटून गेलं. त्या बातमीत या सगळ्या छोट्या हिरोंच्या प्रतिक्रिया पण छापल्या होत्या, अर्थात त्यांची नावं बदलून. ‘आम्ही हे कसं केलं, कोणतं ॲप वापरलं, सगळे मित्र ग्रुपने कसे गेलो’ हे सगळं त्यात अगदी उत्साहानं सांगितलं होतं. बातमीच्या शेवटी एका मानसोपचारतज्ज्ञांचं मत होतं, ‘या वयातल्या मुलांना कबीर सिंगने त्याच्या मैत्रिणीबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल दाखवलेला ओव्हर पझेसिव्हनेस आवडतो आहे. कबीर सिंगसारखं वागणं म्हणजे आपण पण हिरो आहोत असं वाटतंय यांना. पण हा फक्त एक चित्रपट आहे आणि तो बघून सोडून द्यायचा, किमान एवढी जाणीव यातल्या काहींना तरी आहे, हेच त्यातल्या त्यात बरं!’

नवे चित्रपट आणि त्यांच्यामुळं होणारे वाद हा प्रकार आता बऱ्यापैकी कॉमन झाला आहे. चित्रपटाच्या नावापासून ते त्याच्या ट्रेलरपर्यंत, बॉलिवूडचे रोज नवे किस्से कानावर पडतातच की आपल्या. ‘कबीर सिंग’ नंतरचे वाद हे अगदी रोजचेच असल्यासारखे मला वाटत होते. मध्यंतरी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका मुलाखतीमध्ये ‘प्यार मे सब कुछ चलता है’ टाइप काही मत मांडली. ‘मारहाण, अधिकार गाजवणं’ हे सगळं एखाद्या प्रामाणिक नात्यामध्ये असतंच असं काहीसं त्यांचं मत होतं. मग मला वाटलं, की ‘बाजीराव-मस्तानी’च्या धर्तीवर या चित्रपट दिग्दर्शकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्य करायला हवं. पण समजा ते मान्यही केलं आणि ‘प्रेम करण्याच्या किंवा दाखवण्याच्या’ संदीप यांच्या पद्धतीला ‘ओके’ म्हटलं, तरी एकूणच कबीर सिंगच्या निमित्तानं उपस्थित झालेला एक मुद्दा मला झेपला नाही.

चित्रपटात दाखवतात ते सगळं खोटं असतं, हे मी अनेकदा ऐकलंय, अगदी लहानपणापासून! पिक्‍चरमधल्या व्हिलनची, भुतांची भीती वाटायला लागली, की आई हमखास हेच सांगायची. ‘सगळं खोटं असतं गं, बघायचं आणि विसरून जायचं’. हाच मुद्दा कबीर सिंगच्या समर्थकांचा होता. पण फरक एवढाच होता, की यावेळी ‘खोटं असतं गं जे दाखवतात ते’ हे स्पष्टीकरण व्हिलनसाठी नसून, हिरोसाठी होतं.

कोणत्याही चित्रपटात दाखवली जाणारी घटना, व्यक्त केलेले विचार, चित्रपटाची कथा, ‘सत्याचा किंवा प्रेमाचा विजय होतो’ असे साचेबद्ध शेवट. हे सगळं बघायचं आणि विसरून जायचं. अगदी सगळं विसरायला नाहीच जमलं, तरी किमान जे काही वाईट आहे ते तरी नक्कीच विसरायचं. ही फिलॉसॉफी ऐकायला खूप सरळ सोपी वाटते खरी, पण हे किती जणांना जमतं? आपल्याकडं रिलीज होणारे चित्रपट हे एकतर ‘मासेस’साठी असतात किंवा ‘क्‍लासेस’साठी. मग ‘कबीर सिंग’ हा ‘मासेस’वाला चित्रपट ठरतो. टिपिकल बॉलिवूड प्रकारातला. हिरोची हिरोगिरी, मारहाण करणं, नायिकेवरचं त्याचं जिवापाड प्रेम, ते व्यक्त करण्याची त्याची सो कॉल्ड पुरुषी पद्धत, प्रेमात पार वेडं होणं, प्रेमभंग हाताळताना दारू, ड्रग्ज, इतर बायकांशी कॅज्युअल सेक्‍स हे सगळं या चित्रपटात आहे.    
देशभरात रिलीज झालेला हा सिनेमा, जितका मल्टिप्लेक्‍समध्ये पाहिला गेला तितकाच किंवा कदाचित त्याहून अधिक छोट्या पडद्यावर अनेकांनी पाहिला असेल. यातले किती लोक चित्रपट साक्षर असतील आणि यातल्या किती जणांना ‘यातलं नेमकं घ्यायचं काय आणि सोडायचं काय’ हे कळलं असेल? कारण आजही सैराट म्हटलं, की अनेकांना ‘झिंगाट’ आणि ‘आर्ची’ हे एवढंच आठवतं, हेच काय लक्षात राहिलेलं असतं.

आता यावर ‘चित्रपटाकडं फक्त एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून बघायला शीक’ अशी मतं अनेकांची असतील. मला हे कळेल, मी बघेलही मनोरंजनाचं माध्यम म्हणून, पण ज्यांना ‘कबीर सिंग’चा हिरो म्हणजेच पुरुष ही डेफिनेशन वाटत असेल त्यांचं काय? ‘बाईला हे असं वागवलेलं चालतं’ किंवा ‘असली पुरुष ऐसाही होता है’ छाप विचार करायला कितीजणांनी सुरुवात केली असेल? कारण आपण कितीही नाकारलं, तरी चित्रपटाच्या नायकाला फॉलो करणारे, चित्रपटात त्यानं साकारलेल्या भूमिकेशी एकरूप होणारे अनेकजण असतीलच की आपल्या आजूबाजूला. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातून कोणी काय घ्यायचं हे असं सरळधोपट पद्धतीनं कसं ठरवता येईल? ‘ही कथा काल्पनिक आहे आणि याचा वास्तवाशी काही संबंध नाही’ हे फक्त एवढं डिस्क्‍लेमर लोकांना चित्रपट साक्षर करायला पुरेसं असेल? कोणत्याही चित्रपटाचं टोकाचं समर्थन आणि तितक्‍याच टोकाचा विरोध यांना जरावेळ बाजूला ठेवून, या प्रश्नावर किमान विचार करता आला, तरी क्‍या बात!

संबंधित बातम्या