लेट इट गो बेबी...!

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

ब्लॉग
 

मध्यंतरी फेसबुकवर कोणत्या तरी लाइफकोचचा व्हिडिओ ऑटोप्ले झाला. आता त्याचं नाव आठवत नाही, पण कंटेंट चांगला होता. सायकॉलॉजीच्या मुलांचं लेक्चर. या वर्गात त्यांची प्राध्यापिका, पाणी पिण्याची एक छोटी बाटली हातात घेऊन विद्यार्थ्यांसमोर उभी असते. तिचा प्रश्न, ''समजा मी ही पाण्याची बाटली अशीच १० मिनिटं हातात पकडली, तर काय होईल?'' कोणाचं तरी उत्तर, ''काही नाही होणार.'' ''मग समजा ही बाटली अशीच मी तासभर हातात पकडली तर?'' ''तुमचा हात दुखेल, त्रास होईल तुम्हाला'' '' ...आणि तरीही हट्टानं मी बाटली अशीच दिवसभर हातात पकडून ठेवायचं ठरवलं तर?'' ''तर तुम्हाला प्रचंड वेदना होतील, तुमच्या हाताला, जॉइंट्सच्या लिगामेंट्सला दुखापत होईल, कदाचित तुम्हाला तुमचा तो हात पुढचे काही दिवस हलवताही येणार नाही,'' हे विद्यार्थ्यांचं एकत्रित उत्तर. 

 ''खरंय, पण तुमच्या लक्षात येतंय का, बाटली हातात पकडण्याची वेळ वाढली असली तरी बाटली, त्यात असणारं पाणी यांच्या वजनात काही बदल होत नाहीये. मी जी गोष्ट पकडून ठेवतीये, तिचं वस्तुमान तेच आहे, पण मी जशी जशी ते पकडून ठेवण्याची वेळ वाढवतेय, तसतसं त्याच सहज वाटणाऱ्या वजनाचा मला त्रास होतोय.'' एकूण काय, तर ''लेट इट गो..'' 

 मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी, भावना, वेदना सोडून द्यायला शिका. तुम्ही जितका वेळ त्याच त्या गोष्टींवर घालवाल, तितका वेळ तुम्हाला फक्त त्रासच होईल. 

 आता कोणालाही हे सगळं थोडं फिल्मी वाटू शकेल, अगदी मलाही वाटलं... पण मग हा प्रश्न पडला, की आपला हात त्या वजनाला रिॲक्ट करतोय, म्हणून दुखतोय खरं तर. तिच बाटली तिनं शेजारच्या टेबलावर अगदी चोवीस तास जरी ठेवली असती, तरी कोणालाच काहीच फरक पडला नसता. म्हणजे प्रत्येक वेळी गोष्टी सोडून देण्यापेक्षा, कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट करायचं, ते किती वेळासाठी आणि किती इंटेन्स करायचं, कशाला प्रायोरिटी द्यायची हे ठरवता येणंही महत्त्वाचं असेल का?

एक तर नक्कीच आपल्याकडं गोष्टी सोडून देण्यापेक्षा त्या जपून ठेवायला, सोडवायला जास्त ताकद लागते, हाच समज आहे. आता इथं गोष्टी म्हणजे, आपल्या आयुष्यातली नाती, व्यक्ती, घटना, भावना असं सगळं कॉकटेल. ''सोडून तर कोणीही देतं, टिकवून ठेवता आलं तर बोला'' हाच एक टिपिकल फंडा उराशी जपत आपण जगतो. सगळ्यांचं कशाला, माझ्याही आयुष्यात मी हेच करते, मला नाती तोडायला, माणसांना सोडायला आवडत नाही. एखादं नातं टिकलं नाही, की मी हरले वगैरे फिलिंग मलाही येतं. त्या क्षणाला मला सगळं सॉल्व्ह करायचं असतं. मला असंही वाटत राहतं, की समजा त्या क्षणी मी ते भांडण किंवा झालेले वाद सोडवू शकले नाही, तर ती व्यक्ती मला कायमची दुरावेल. त्यामुळं अनेकदा, गरज नसताना माघार घेणं, सॉरी म्हणणं असे उद्योग मीही अगदी निगुतीनं करत असते. ''आपण असंच 'समजुतदार' वागायला हवं,'' हे माझं मीच ठरवलंय. पण एकाच व्यक्तीसोबत, एकाच चुकीसाठी असं कितीवेळा वागायचं? माझ्याकडं याचं कोणतंही लिमिट नाहीये. जोवर या सतत माघार घेण्याचा किंवा गोष्टी सोडवत राहण्याचा त्रास होत नाही... आणि हे वागणं ''समंजस आहे मी'' या चौकटीच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत ठीकही असेल कदाचित. पण याची सवय व्हायला लागली. तर, स्वतःला आणि समोरच्यालाही? स्वतःपेक्षा नात्यांना आणि आजूबाजूच्या माणसांना महत्त्व देणं कितपत योग्य असेल?

 नाती न टिकवणं हा अजूनही आपण कमीपणा समजतो. मुळात एखादं नातं किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात टिकली नाही, की आपण चुकतोय, कमी पडतोय ही बोचणी आपल्याला लागून राहते. पण प्रत्येक नातं, प्रत्येक वेळी आनंद देणारं कसं असेल?

 सुरुवातीला ''हॅपिली एव्हर आफ्टर'' वाटणारं नातं, कालांतरानं जुनं, बुरसटलेलं वाटू शकतंच की. मग अशावेळी हात दुखेपर्यंत बाटली हातात पकडायची, की सरळ काहीवेळ टेबलावर ठेवून मोकळं व्हायचं? प्रत्येकवेळी स्वतःला त्रास करून घेत प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करत राहणं बंद करता यायला हवं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे डोक्यात सुरू होणारं हिशोबाचं गणित थांबवता यायला हवं. ''मी एवढं केलं, इतपत सहन केलं, माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन फक्त आणि फक्त त्याच्यासाठी म्हणून जगले... आणि शेवटी मला काय मिळालं?'' हा हिशोब आयुष्यातला सगळ्यात फ्रस्ट्रेटिंग प्रकार आहे. यावर उत्तम उपाय एकच, एक तर आजवर मिळालेला सगळा आनंद बरोबर घेऊन सरळ ''मूव्ह ऑन'' करा किंवा त्या गोष्टीवर कितीवेळ रिॲक्ट करत राहायचं हे ठरवून घ्या. आजूबाजूची माणसं चुकत राहणार आणि त्याचा त्रास आपल्याला होणार, हे बाय डीफॉल्ट असणारच आहे. आपल्याला स्वतःला जपत ''लेट इट गो'' म्हणता आलं म्हणजे झालं.

संबंधित बातम्या