दोन टोकांचा वर्तमान

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

ब्लॉग
 

काय भन्नाट होता मागचा आठवडा. कोणताही न्यूज पेपर घ्या, सोशल मीडिया ओपन करा किंवा न्यूज चॅनल बघा. एका मागं एक, सतत कानावर पडणाऱ्या गुड न्यूज. बॅडमिंटनमध्ये जगज्जेती ठरलेली सिंधू, पॅरा-बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी मानसी जोशी आणि फर्स्ट फिमेल फ्लाइट कमांडर म्हणून ओळख मिळवलेली विंग कमांडर शालिझा धामी. आपल्यापैकी प्रत्येकाला भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशीच कामगिरी होती या तिघींची, वूमन एम्पॉवरमेंट या शब्दाला समानार्थी ठरणारी. बाईचं बाईपण दोन अवयवांत गुंडाळण्याची मानसिकता अजूनही आजूबाजूला असताना, या तिघींनी मात्र या वास्तवाकडं थोडावेळ का असेना दुर्लक्ष करायला भाग पाडलं.

या तिघींकडं पाहून, माझ्या आसपास रंगीबेरंगी फ्रॉक घालून हुंदडणाऱ्या चिमुकल्या डोळ्यांना ''मोठेपणी काय होणार?''ची किमान स्वप्न पाहता येतील असं काहीतरी छान माझ्या डोक्यात येत होतं. मग बातमी आली ती पुणे स्टेशन परिसरात तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची. पुढं आरोपीला अटक झाली, पोस्टमोर्टममध्ये बलात्कार नाही, तर बाल लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. पण या बातमीच्या निमित्तानं बाईपणाचं हे वेगळं वास्तव समोर आलं. दोन्ही बातम्या मुलींच्याच. एक गोल्ड मेडल मिळवून देशाला जागतिक ओळख मिळवून देणारी आणि दुसरी, जिच्या असण्यानसण्यानं कोणाला फरक पडणार नाही अशी कोणीतरी, आईवडिलांसोबत, फुटपाथवर राहणारी. दोन्ही आपलेच वर्तमान, दोन्ही आपलेच चेहरे.

खरं तर बलात्काराच्या किंवा बाल लैंगिक अत्याचाराच्या बातम्या, त्यातले संदर्भ, छोटेमोठे डिटेल्स हे सगळं पाठ झाल्यासारखं वाटत हल्ली. फक्त नाव, वय आणि ठिकाण हे संदर्भ बदलतात. बाकी बातमी तोंडपाठ असते. काहीतरी विशेष झाल्यासारखी कधी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर, नाहीतर मग अगदी सहज कुठंतरी कोपऱ्यात जाऊन बसलेली, अगदी नेहमीचीच असल्यासारखी. आधी अंगावर येणारे संदर्भ, हळहळण्यापुरते उरतात आणि मग हळूहळू काही वाटेनासं होतं. ''या आधी बलात्कार होतं नव्हते का? होतं होतेच... आता फक्त बायका पुढं येऊन त्याबद्दल व्यक्त होतात, न्याय मागतात, पोलिसांकडं जातात म्हणून आपल्याला ते कळतं...'' हे एक फालतू स्पष्टीकरणही तयार असतंच. मग हीच बातमी का? कारण या तीन वर्षांच्या चिमुरडीनं आठवडाभर संपूर्ण देशानं मिरवलेलं बाईपण क्षणभरात विसरायला लावलं. एकाच आठवड्यात बाई म्हणून जन्माला येणाचे दोन टोकाचे संदर्भ समोर ठेवले. तिच्या निमित्तानं का असेना, आपल्याला या दोन टोकांच्या वर्तमानांना एकत्र पाहावं लागलं.

प्रियांका दुबे ही एक फ्रीलान्स रिपोर्ताज करणारी महिला पत्रकार आहे. तिनं एक पुस्तक लिहिलंय, 'नो नेशन फॉर वूमन’ या नावाचं. या पुस्तकाचं सब हेडिंग पण भारी, ''रिपोर्ताज ऑन रेप फ्रॉम इंडिया, द वर्ल्ड्‌्‌स लार्जेस्ट इकॉनॉमी''. एकूण १३ प्रकरणं असणाऱ्या या पुस्तकात प्रियंकानं भारताच्या प्रत्येक छोट्या गावामध्ये जाऊन रिपोर्टींग केलंय. हे प्रत्येक प्रकरण वाचताना, स्वतःच्या बाई असण्याची दया येते आणि किमान आपलं नाव नाहीये त्यात हे असलं काहीतरी डोक्यात येऊन जातं. या पुस्तकात दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांचं प्रमाण ८७३ टक्के वाढलंय. भारतात प्रत्येक दिवशी १०६ स्त्रियांवर बलात्कार होतो. बलात्कार होणाऱ्या १० बायकांमध्ये चार छोट्या मुली असतात, ज्यांना शारीरिक संबंध, लैंगिकता यातलं काहीही कळतं नसतं. म्हणजे प्रत्येक पंधराव्या मिनिटाला भारतात कुठं ना कुठं, कोणत्यातरी बाईवर, मुलीवर, अगदी लहान बाळावरही बलात्कार होत असतो. अगदी आताही, या क्षणाला कोणावर तरी बलात्कार होतोय, या वाक्याचा अर्थ मेंदूपर्यंत जातही नाही.

आजही बलात्कार म्हटलं, की आपल्या डोक्यात ठराविक साचेबद्ध विचार येतात. तेच ते विचार, तेच ते प्रश्न, तीच ती उत्तरं. कपडे कसे घातले होते, सोबत कोण होतं आणि कोणतं सामाजिक वर्तुळ हाच क्रायटेरिया अजूनही असतो. मध्यंतरी बेल्जियमच्या ब्रुसेल्स शहरात एक आगळं वेगळं प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनात बलात्कार किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या व्हिक्टिम ठरलेल्या महिलांचे कपडे ठेवले होते. बलात्कार होतात ते मुलींच्या कपड्यांमुळं किंवा त्यांच्या राहणीमानामुळं असे फालतू विचार करणाऱ्या प्रत्येकाला जागं करणारा हा उपक्रम होता. या अशा प्रदर्शनामुळं वैचारिक क्रांती वगैरे व्हावी अशी अपेक्षा नाहीये माझी, पण किमान जिच्यावर बलात्कार झालाय तिलाच प्रत्येकवेळी जज करणं कमी व्हावं इतकीच अपेक्षा आहे.

शेवटी काय, तर ''संवेदना बोथट झाल्यात, घटना नेहमीच्याच आहेत, हे तर होतच राहतं, या सरकारच्या काळात या घटना वाढल्यात, असं व्हायला नको होतं, झालं ते वाईट झालं,'' या सगळ्या पलीकडं जाऊन काही करता येतं का ते पाहायला हवं. ही अशी कारणं देऊन अत्याचाराची प्रत्येक घटना जनरलाइज करणं थांबवायला हवं. प्रश्न मोठा आहे, उत्तरंही तितक्याच लार्ज स्केलवर शोधायला हवीत. किमान ''नेहमीचंच झालंय हे, काही वाटत नाही हल्ली अशा बातम्या वाचताना,'' हा विचार बदलता आला तरी खूप झालं. 

संबंधित बातम्या