‘लिकी’ नव्हे, ‘लकी’ पाइपलाइन
ब्लॉग
मध्यंतरी ‘फर्स्ट पोस्ट’च्या वेबसाइटवर मी एक लेख वाचला, ''व्हॉट हॅपंड टू अवर वूमsन सायंटिस्ट?'' लेख तसा जुनाच, मार्च महिन्यातला. पण या लेखात अडकून पडण्याचं कारण म्हणजे मी झिया मोदींकडून एका कार्यक्रमात ऐकलेली ''लिकी पाइपलाइन'' ही संकल्पना. झिया मोदी म्हणजे भारतातल्या नावाजलेल्या कॉर्पोरेट लॉयर. ''फॉर्च्युन'' मासिकानं २०१८ मध्ये ''मोस्ट पॉवरफुल वूमेन'' अशी जी ५० स्त्रियांची यादी जाहीर केली होती, त्यातल्या नंबर वन.
बांधकाम क्षेत्रात अजूनही उच्च पदांवर असणाऱ्या, काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी का आहे हा मुद्दा मोदी स्पष्ट करत होत्या आणि इथंच उल्लेख झाला ''लिकी पाइपलाइन''चा. कन्स्ट्रक्शनमध्ये महिला फक्त प्रोजेक्ट डिझाइन, आर्किटेक्चर अशा काहीच पातळ्यांवर अजूनही काम करतात. ऑनसाइट तर फारशा नाहीतच. कारण बांधकामाच्या साइटवर म्हणे काम करणाऱ्या मुकादमांना आणि मजुरांना, बायकांकडून सूचना ऐकायची सवय नसते, आजही नाहीये. त्यामुळं बांधकाम क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण घेऊनही जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते, तेव्हा तेच ते, ठरावीक काम बायकांच्या वाट्याला येत. नोकरीमध्ये सर्वप्रकारचे अनुभव घेऊन आणि ऑन फील्ड काम करून एखादा पुरुष जितका परिपक्व होतो, ती संधी बायकांना फारशी मिळत नाही. साहजिकच ज्यावेळी कोणत्याही कंपनीच्या उच्च पदांवर निवड होण्याची वेळ येते, त्यावेळी ऑन फील्ड अनुभवाच्या पातळीवर बायका मागं पडतात.
लिकी पाइपलाइन हे एक रूपक आहे. स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) या विषयांचं उच्च शिक्षण घेणाऱ्या, संशोधन करू पाहणाऱ्या किंवा या क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण आजही खूप कमी आहे. लिकी पाइपलाइन म्हणजे, पदवीपर्यंत या ''स्टेम''मध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येला, पुढं मास्टर्स किंवा पीएचडीपर्यंत पोचताना गळती लागते. या विभागांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांचं प्रमाण तुलनेनं कमी होत जातं. हीच परिस्थिती या 'स्टेम'मध्ये काम करणाऱ्या कंपन्या, विविध विद्यापीठं इथंही आढळते. याठिकाणी ज्युनिअर लेव्हलला काम करणाऱ्या आणि मोठ्या पदांवर काम करणाऱ्या महिलांच्या संख्येत जाणवेल इतका फरक जाणवतो आणि हे फक्त भारतात नाही, तर जगभरात होतं.
''व्हॉट हॅपंड टू अवर वूमेन सायंटिस्ट?'' या लेखाची सुरुवातच मुळात Donna Strickland या महिला शास्त्रज्ञाला २०१८ मध्ये फिजिक्ससाठी मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या उल्लेखानं होते. गेल्या ५५ वर्षांमध्ये, फिजिक्समध्ये नोबेल मिळवणारी Donna Strickland ही पहिली महिला शास्त्रज्ञ आहे. जगभरात सायन्समध्ये महिलांच्या सहभागाची ही परिस्थिती असेल, तर भारताबद्दल बोलायलाच नको. जानेवारी महिन्यात ''वूमेन सायन्स काँग्रेस''चं उद्घाटन स्मृती इराणी यांनी केलं होतं. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातही हा लिकी पाइपलाइनचा मुद्दा मांडला गेला, पण वेगळ्या प्रकारे. इराणी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, आज भारतात विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ, इंजिनिअर्स मिळून सुमारे दोन लाख ८० हजार लोक काम करतात. यात महिलांचं प्रमाण फक्त १४ टक्के आहे. हीच अवस्था अनेक शैक्षणिक संस्थांचीदेखील आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरमध्ये असणाऱ्या एकूण ४५० प्राध्यापकांमध्ये महिलांची संख्या अवघी नऊ टक्के असल्याचा उल्लेख या ''फर्स्ट पोस्ट''च्या लेखामध्ये आहे.
हे असं का व्हावं? बौद्धिक क्षमतांचा विचार करायला गेल्यास, कुठेही पुरुषांच्या तुलनेत कमी नसणारी स्त्री, या क्षेत्रांतून अर्ध्यावर का बाहेर पडत असावी? मुळात फक्त याच क्षेत्रांतून महिला बाहेर पडतात, की फिल्ड कोणतंही असो उच्च पदावर पोचणाऱ्या महिलांचं प्रमाणच कमी आहे? याची कारणं काय असावीत? कोणत्याही ऑफिसमध्ये सुरू असणारं अंतर्गत राजकारण, स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्याची पुरेशी संधी न मिळणं किंवा लग्न, संसार, मुलं-बाळ या जबाबदाऱ्यांमध्ये कधी काळी पॅशन असणारं क्षेत्र ''सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा'' इतपत उरणं? हा असा कोणता घटक असावा, की ज्याचा परिमाण आपल्यासमोर ''लिकी पाइपलाइन'' म्हणून येत असेल?
जर लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळं बायकांचा फिल्डवर्क सोडून द्यावं लागतं असेल, तर त्यावर काहीतरी उपाय शोधण्याची गरज आहे. मुलं सांभाळणं ही जबाबदारी दोघांनी स्वीकारणं, लग्नानंतरच्या काही काळात अॅडजस्ट होताना, काम थांबवण्यापेक्षा, कामाचा वेग कमी करणं पण क्षेत्राबरोबर जोडलेलं राहणं, बायकांना शक्य होईल अशी कामाची वेळ उपलब्ध करून देणं, असं खूप काही करता येईल. मुळात शैक्षणिक संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांना उच्च पदावर काम करायला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. तसं सपोर्टिव्ह वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
आज स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीनं उभ्या आहेत असं म्हणताना, उदाहरणं द्यायची वेळ येते, तेव्हा त्याच बोटावर मोजण्याइतक्या नावांभोवती फिरतो आपण. या नावांचा अभिमान प्रत्येकाला असलाच पाहिजे, पण हा अभिमान कृतीत उतरला तर? या नावांची केवळ उदाहरणं देण्यापेक्षा, त्यांच्या संघर्षाला आत्मसात करून या ''लिकी पाइपलाइन''चं ''वॉटर प्रूफिंग'' करता आलं तर क्या बात!